पाकिस्तानमध्ये कारवाई: भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईवर काय आहेत प्रतिक्रिया?

राहुल गांधी

फोटो स्रोत, EPA

भारतीय वायुदलानं भारत-पाक नियंत्रण रेषा (LOC) ओलांडून कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पाकिस्तानी सैन्यानं केला आहे.

भारताच्या लढाऊ विमानांनी पहाटे 3:30 मिनिटांनी बालाकोटजवळ जैश-ए-मोहम्मदच्या कँपवर हल्ला केल्याचं वृत्त माध्यमांनी भारतीय वायुसेनेच्या हवाल्यानं दिली आहे. केंद्रीय कृषी राज्य मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी कारवाईची पुष्टी देणारं ट्वीट केलं असून 'ही केवळ सुरूवात आहे. देश झुकणार नाही,' असं त्यांनी म्हटलं आहे.

भारतीय लष्कराच्या ट्विटर हँडलवरून 'क्षमाशील हो रिपु-समक्ष तुम हुए विनीत जितना ही, दुष्ट कौरवों ने तुमको कायर समझा उतना ही। या काव्यपंक्ती ट्वीट करण्यात आल्या आहेत. आपण 'जशास तसे' कारवाई केली असल्याचं या ट्वीटमधून अप्रत्यक्षरित्या सूचित करण्यात आलं आहे.

ट्विटरवर कारवाईच्या समर्थनार्थ प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'भारतीय वायुदलाच्या वैमानिकांना सलाम !' असं ट्वीट केलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्वीट करून वायुदलाच्या वैमानिकांचं अभिनंदन केलंय. 'मी भारतीय वायुदलाच्या शौर्याला सलाम करतो. त्यांनी पाकिस्तानमधील दहशतीच्या ठिकाणांवर हल्ला करून देशाचा गौरव वाढवला आहे,' असं ट्वीट केजरीवाल यांनी केलं आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही भारतीय वायुदलाचं अभिनंदन करणारे ट्वीट केले आहेत.

'कोणतं बालाकोट हे स्पष्ट व्हायला हवं'

जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मात्र कारवाईसंबंधी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे, की जर KPK (खैबर पख्तुनवा) येथील बालाकोटवर हा हल्ला झाला असेल तर त्याला आक्रमण म्हणता येईल आणि भारतीय वायुसेनेनं केलेली मोठी कारवाई असं आपण म्हणू शकतं. पण हे बालाकोट नियंत्रण रेषेपलीकडील पूँछ सेक्टरमधलं असेल तर हा हल्ला प्रतीकात्मक स्वरूपाचा आहे, असं मानावं लागेल. कारण या ऋतूत दहशतवाद्यांचे तळ रिकामे असतात.

जोपर्यंत हे कळत नाही की कोणतं बालाकोट आहे तोपर्यंत पाकिस्तानी लष्कराधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर चर्चा करणं हे निरर्थक आहे, असंही ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

जनतेला जे हवं होतं, तेच घडतंयः देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईवर वृत्तवाहिन्यांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांनी म्हटलं, "भारतीय म्हणून मला भारतीय सेनेचा अभिमान वाटतो. भारतीय सेनेनं एकप्रकारे आमच्या शहीद जवानांचं बलिदान वाया जाणार नाही, हे खऱ्या अर्थानं पाकिस्तानला दाखवून दिलं आहे. अजून सगळी अधिकृत माहिती माझ्याकडे नाहीये. पण मीडिया रिपोर्ट्स आणि जी काही माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार हवाई हल्ला करून जैश-ए-मोहम्मद किंवा अन्य संघटनांचे आतंकवादी कॅम्प जिथून पाकिस्तान आतंकवाद्यांना ट्रेनिंग देऊन पाठवत होते त्या कॅम्पना उद्धवस्त करण्याचं काम झालं आहे."

मुख्यमंत्र्यांनी वायुदलाचं अभिनंदनही केलं. त्यांनी म्हटलं, की देशाच्या पंतप्रधांनांनी पहिल्याच दिवशी अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं, की सैनिकांचं बलिदान वाया जाणार नाही आणि सेनेला सगळे अधिकार दिले होते. भारतीय सेनेनं आपली शक्ती काय असते, हे दाखवून दिलं आहे. भारतीय वायुदलाचे मी अभिनंदन करतो. प्रत्येक भारतीयाच्या मनात जे होतं, ते आता होतंय. भारत आता एक मजबूत देश म्हणून जगासमोर आला आहे आणि कोणताही हल्ला आपण सहन करणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)