'पाकिस्तानमध्ये कारवाई' : मिराज 2000 विमान ज्यांनी वाढवली वायुदलाची ताकद

मिराज-2000

फोटो स्रोत, AFP

पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी मंगळवारी सकाळी भारतीय वायुसेनेनं नियंत्रण रेषा ओलांडल्याचं ट्वीट केलं. त्यानंतर भारतानं पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली का, याबद्दल अनेक तर्क सुरू झाले. सकाळी 11.30 वाजता भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन हवाई हल्ल्यात बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचं प्रशिक्षण केंद्र उद्धवस्त केल्याची माहिती दिली.

भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनीही या कारवाईला दुजोरा दिला. भारतीय वायुसेनेनं या कारवाईसाठी मिराज-2000 विमानं वापरल्याचा दावा करण्यात येत आहे.

भारताला या हवाई हल्ल्यात यश मिळवून देणाऱ्या मिराज विमानांची काही खास वैशिष्ट्यं जाणून घेऊया.

 • मिराज-2000 ही फ्रेंच विमानं आहेत. ही अतिशय अत्याधुनिक लढाऊ विमानं आहेत. या विमानांची निर्मिती दसॉ एव्हिएशन या कंपनीनं केली आहे. ही तीच कंपनी आहे, जिनं राफेल विमानंही बनविली आहेत.
 • मिराज-2000 विमानाची लांबी 47 फूट आहे आणि त्यांचं वजन 7500 किलो आहे.
 • ताशी 2000 किलोमीटर हा मिराज-2000 विमानांचा कमाल वेग आहे.
 • मिराज-2000 हे विमान 13800 किलो स्फोटकांसह ताशी 2336 किलोमीटर या वेगानं उडू शकतं.
 • 1970 च्या दशकात ही विमान पहिल्यांदा आकाशात झेपावली होती. मिराज-2000 हे दुहेरी इंजिन असलेलं चौथ्या पिढीतील मल्टीरोल लढाऊ विमान आहे.
 • भारतानं 80 च्या दशकात पहिल्यांदा 36 मिराज विमानं खरेदी करण्याची ऑर्डर दिली होती.

फोटो स्रोत, Reuters

 • कारगिल युद्धात मिराज विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 • 2015 साली दसॉ कंपनीनं भारतीय वायुसेनेला अपग्रेडेड मिराज-2000 विमानं सोपवली होती. या अपग्रेडेड विमानांमध्ये नवीन रडार आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवण्यात आली होती. यांमुळे विमानांच्या मारक क्षमतेत अधिक सुधारणा झाली.
 • मात्र फ्रान्सनं ही विमानं केवळ भारताला विकलेली नाहीत. सध्याच्या घडीला नऊ देशांकडे मिराज-2000 विमानं आहेत.
 • सिंगल इंजिनमुळं विमानाचं वजन कमी राहतं आणि त्यामुळं विमानाला उड्डाण करताना कोणतीही अडचण येत नाही. मात्र एकच इंजिन असेल तर अनेकदा इंजिन फेल झाल्यावर विमान कोसळण्याची भीती असते. मात्र एकाहून अधिक इंजिनं असतील तर हा धोका कमी होतो. कारण एक इंजिन बंद पडलं तरी दुसरं इंजिन सुरू राहतं. यामुळे पायलट आणि विमान सुरक्षित राहतात. मिराज-2000 ला दुहेरी इंजिन आहे.
 • मिराज-2000 हे एक 'मल्टीरोल' विमान आहे. एकाच वेळी ते अनेक कामं करू शकते.
 • मिराज हवेतून निर्धारित लक्ष्यावर बॉम्ब हल्ला करू शकतं. त्याचबरोबर हवेतही शत्रूच्या विमानांसोबत लढू शकतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)