भारताच्या हल्ल्याचा पाकिस्तान प्रतिकार का करू शकला नाही?

विमानं Image copyright Getty Images

26 फेब्रुवारीला जेव्हा लोक सकाळी जागे झाले तेव्हा पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते असिफ गफूर यांनी ट्वीट करून माहिती दिली की भारताची लढाऊ विमानं नियंत्रण रेषेच्या पलीकडे मुजफ्फराबाद परिसराच्या तीन चार किलोमीटर आत घुसली होती.

गफूर म्हणाले की पाकिस्तानने तात्काळ उत्तर दिल्यामुळे भारताला माघार घ्यावी लागली. त्यानंतर भारताने दावा केला की पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारताच्या वायूसेनेनं कट्टरवाद्यांची ठिकाणं उद्धवस्त केली आहेत.

यावेळी पाकिस्तानने स्वत:च स्वीकार केलं आहे की भारताची लढाऊ विमानं पाकिस्तानच्या हद्दीत आली होती. सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी पाकिस्तानने त्या हल्ल्याचं खंडन केलं होतं.

Image copyright Twitter

अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की भारताची लढाऊ विमानं पाकिस्तानात घुसली आणि हल्ला करून परतलीसुद्धा तरी पाकिस्तान काहीच कसं करू शकला नाही?

इतकंच काय तर पाकिस्तानी लोकसुद्धा आपल्या लोकांना प्रश्न विचारत आहेत की त्यांच्या लष्कराने भारतीय विमानांवर आक्रमण का केलं नाही?

पाकिस्तानी नागरिक फवाद जावेद यांनी पाकिस्तानी लष्कराला प्रश्न विचारला आहे की, भारतीय विमान सीमा ओलांडून कसे आले?

जावेद यांनी ट्वीट करून विचारलं, "ते आमच्या क्षेत्रात घुसले आणि आमचे सैनिक काहीही करू शकले नाही. आता तुम्ही फक्त ट्विटरवर गोळीबार करा."

भारतीय सैन्याने हल्ला केला आहे पाकिस्तानच्या एअर सर्व्हिलन्स सिस्टिमला खरंच कळलं नसेल का? पाकिस्तान कोणतीच कारवाई का करू शकला नाही?

शस्त्रास्त्रांचा अभाव

'द इन्स्टियूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिस'चे संचालक लक्ष्मण कुमार बहेरा सांगतात की भारताच्या वायूसेनेच्या तुलनेत पाकिस्तानची वायूसेना फारच कमकुवत आहे.

बहेरा सांगतात, "पाकिस्तानचं वायूदल अशा प्रकारच्या हल्ल्यांचं प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम नाही. भारतीय वायू दलाची इतकी तयारी होती की पाकिस्तानला या हल्ल्याचा अंदाज लावणंच शक्य झालं नाही. भारताने अत्यंत कमी वेळात हा हल्ला केला. पाकिस्तानची हवाई देखरेख व्यवस्था अगदीच कमकुवत आहे. इतक्या कमी वेळात अशा हल्ल्यांना तोंड देणं सद्यपरिस्थितीत पाकिस्तानला शक्य नाही."

Image copyright Getty Images

भारतातील प्रसारमाध्यमं दावा करत आहे की 12 लढाऊ विमानं सीमारेषा ओलांडून गेले होते. 19 मिनिटांत हल्ला करून ते परत आले. 1971 नंतर गेल्या पाच दशकांत भारतने पाकिस्तानच्या सीमेत जाऊन पहिल्यांदाच हल्ला केला आहे.

भारताने रशियाकडून दोन A-50 AWAC (एयरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल) विमानं खरेदी केली होती. ही विमानं रडार आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देखरेखीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहेत.

भारताने जेव्हा ही विमानं खरेदी केली होती तेव्हाच पाकिस्तानचे रिटायर्ड एअर मार्शल अयाज अहमद खान यांनी ती पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक आहेत, असं सांगितलं होतं.

या व्यवस्थेमुळे भारत पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात देखरेख करण्यासाठी अधिक सक्षम होणार आहे, असं ते म्हणाले होते.

अयाज खान यांनी इशारा दिला होता की भारतीय वायूसेनेला पाकिस्तानच्या हालचाली आधीच कळतील.

खान म्हणाले होते, "A-50 AWAC मुळे पाकिस्तानचे रडार कुठे आहेत हे आधीच कळेल. तसंच मिसाईल कुठे आहेत, पाकिस्तानी वायू दलाच्या काय हालचाली आहेत या सगळ्या गोष्टी कळतील. हे पाकिस्तानसाठी धोकादायक आहे."

पाकिस्तानमधली संरक्षणविषयक बाबींवर माहिती देणारी वेबसाईट Defence.pk यांच्या एका अहवालानुसार पाकिस्तानचे एअरबॉर्न रडार्स आता कालबाह्य झाले आहेत.

Image copyright Getty Images

या अहवालानुसार, "भारताने एयरबॉर्न सर्व्हिलन्सवर भरपूर खर्च केला आहे. पाकिस्तानने याबाबतीत आधुनिकीकरण करण्याचा बराच प्रयत्न केला मात्र भारत पाकिस्तानच्या बराच पुढे आहे. त्यामुळे पाकिस्तानला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे."

अमेरिका सगळ्यांत पुढे

या तंत्रज्ञानात अमेरिका सगळ्यांत पुढे आहे. पाकिस्तान सुरक्षेसंबंधित विषयांवर चीनवर अवलंबून आहे. मात्र याबाबतीत चीनकडून पाकिस्तानला फारशी मदत मिळालेली नाही.

अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी मदत पूर्णपणे बंद झाली आहे. ओबामा प्रशासनाने एफ-16 लढाऊ विमानं विकण्यासाठी बंदी घातली होती.

इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये हत्यांरांच्या खरेदीचा करार एक अब्ज डॉलरवरून मागच्या वर्षी 2.1 कोटी डॉलर पर्यंत खाली घसरला आहे. त्याचवळी चीन आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या हत्यांरांच्या करारातही घट झाली मात्र त्याची गती फारच कमी आहे.

चीनबरोबर पाकिस्तानच्या हत्याराचा करार 74.7 कोटी डॉलरपासून के 51.4 कोटी डॉलरपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे पाकिस्तानला हत्यार विकण्यात चीनचा पहिला क्रमांक लागतो.

Image copyright Getty Images

अमेरिकेतील संरक्षणविषयक वेबसाईच ग्लोबल फायर पॉवरच्या मते पाकिस्तानकडे एकूण 1281 विमानं आहेत तर भारताकडे 2185 विमानं आहेत. लक्ष्मण कुमार बहेरा मानतात की पाकिस्तान भलेही अणुसंपन्न देश असला तरी भारताच्या तुलनेत तो बराच मागे आहे.

'आता आमची पाळी'

दरम्यान पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतानं केलेले दावे खोडून काढले आहेत.

भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "आम्ही याचं प्रत्युत्तर देऊ, आमचं प्रत्युत्तर वेगळं असेल, त्याची वेळ आणि काळ आम्ही ठरवू. तुम्हाला काय करायचं होतं ते तुम्ही केलं आहे आता आमची पाळी आहे."

"भारतानं जाणूनबुजून सामान्य लोकांवर हल्ला केला जेणेकरून त्यांना हा दशतवाद्यांवर केलेला हल्ला आहे असं दाखवता येईल आणि त्याचा निवडणुकीत फायदा घेता येईल," असंही त्यांनी म्हटलं आहे.

"भारतानं 4 बाँब टाकले, पण इथं काहीचं झालं नाही, 350 दशतवादी मारल्याचा भारताचा दावा आहे, पण तिथं काही नव्हतंच तर लोक मरणार कुठून. माणसं मेली असतील तर त्यांचे मृतदेह कुठे आहेत. त्यांची अंत्ययात्रा तर निघाली असती," असा दावा गफूर यांनी केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)