लोकसभा 2019: 'मी पात्र असतानाही मला माझ्याच देशात सन्मानाची नोकरी का नाही?'

पाहा व्हीडिओ

"एवढा पैसा खर्च करून, आईवडिलांच्या डोक्यावर कर्ज करून मी परदेशात जाऊ आणि का तर परक्यांची धुणीभांडी करायला?"

18 वर्षांची ननिता सोहेल तावातावात बोलत असते आणि माझ्या डोळ्यासमोर अनेक चेहरे सर्रकन सरकतात - नोकरी नसलेल्यांचे, त्यासाठी आंदोलन करणाऱ्यांचे, घरच्यांच्या जीवावर किती दिवस जगायचं म्हणून एकवेळ न जेवणाऱ्यांचे, उच्चशिक्षण घेऊनही नोकरी नाही म्हणून लहानसहान काम करणाऱ्या अनेकांचे.

राजकारण्यांना तरुणांच्या भविष्याची काही फिकीर नाहीये, असं तिचं म्हणणं आहे. "मीच नाही, माझ्या आसपास असे अनेक जण आहेत, ज्यांना त्यांच्या भविष्याच शाश्वती नाहीये. आपल्याच देशात त्यांना नोकरी मिळेल की नाही हे माहीत नाही. एवढं शिकूनही ते रिकामेच बसलेत.

"पण सरकार आमच्यासारख्यांसाठी काय करतंय? यंदाच्या निवडणुकीत मी त्यालाच मत देईन जो आमच्यासारख्या तरुणांना नोकरीची शाश्वती देईल. आणि नुस्ती आश्वासनं नाही तर खरंच काहीतरी करून दाखवेल."

ही चुणचुणीत मुलगी जेव्हा समाजाच्या, देशाच्या गप्पा मारते तेव्हा वाटतं की हिने शिक्षकच व्हावं. तिला बोलता फार चांगलं येतं.

पंजाबच्या बर्नालामध्ये छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये गेलो, तेव्हा दिसली ननिता आणि तिच्यासारख्या अनेकींची मोठी मोठी स्वप्नं. रोज सकाळी दुसऱ्या शहरात जायचं शिकायला, दुपारी एका सरकारी शाळेत ट्रेनी म्हणून काम करायचं आणि संध्याकाळी आईच्या घरगुती ड्रेस मटेरिअल्सच्या दुकानात तिला मदत करायची, असा ननिताचा दिनक्रम.

आम्ही गेलो तेव्हा पाहुणे येणार म्हणून पोपडे उडालेल्या भिंतीला वॉलपेपर लावायचं काम चाललं होतं. ते सोडून सगळं घरदार आमच्याजवळ जमा झालं. ननिताची आई तिचं कौतुक सांगत होती आणि वडील मात्र शांतपणे आपल्या मुलीचा कौतुकसोहळा पाहत होते.

छोट्या शहरात राहणाऱ्या भारतातल्या लाखो कुटुंबांपैकी एक सोहेल कुटुंब. चौकोनी, अगदीच हाता-तोंडाची गाठ नसली तरी महिना संपल्यावर हातात फारसं काही न उरणारं. आयुष्याकडून अपेक्षा एकच - मुलांनी चांगलं शिकावं, चांगल्या नोकऱ्या मिळवाव्यात आणि मार्गी लागावं.

मुलांच्या शिक्षणात काही कमी पडू नये म्हणून आईबाप मेहनत घेतात, मुलंही त्यांच्या कष्टांची जाण ठेवून सर्वतोपरी प्रयत्न करतात, परीक्षा पास करतात, मार्क मिळवतात आणि मग येतो आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा - नोकरी मिळवण्याचा.

बस्स! इथून जो संघर्ष सुरू होतो तो लाखो तरुणांच्या वाटेला येतो आहे. मग पंजाब तरी त्याला कसा अपवाद असेल.

पंजाब म्हणजे हिरवीगार शेतं, लस्सीचा भलामोठा ग्लास आणि 'सरसो'च्या शेतात वावरणाऱ्या 'सोण्या कुड्या', असं चित्र आपल्या डोक्यात फिट्ट आहे.

थोडी यश चोप्रांची कृपा आणि खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी न केलेला प्रयत्न, याला कारणीभूत. आताचं पंजाबचं चित्र बरंच बदललं आहे. आताची तरुण पिढी फक्त दोन गोष्टींमध्ये गुरफटलेलं आहे - एक तर ड्रग्स नाहीतर परदेशी जाण्याचं स्वप्न.

चोप्रांच्या सिनेमातल्या ललना जरी 'घर आजा परदेसी, तेरा देस बुलाए रे...' अशी हाळी देत असल्या तरी पंजाबातल्या तरुणाला मात्र 'परदेसी' व्हायचीच स्वप्नं पडत आहेत.

नुसती तरुण पिढीच नाही, त्यांच्या आईवडिलांचीही हीच इच्छा आहे. परदेशी जाण्याचं स्वप्न उराशी घेऊन इथले तरुण आणि त्यांचे आईवडील IELTS कोचिंग सेंटरचे आणि व्हिसा कन्सलटन्सीचे उंबरठे झिजवत आहेत.

तर काही परदेशी नोकरी मिळवून देऊ, अशी जाहिरात करणाऱ्या संस्थांना भुलून त्यांच्या दाराशी पैशांच्या राशी जमा करत आहेत.

बरं, हे सगळे खूप पैसेवालेही आहेत, असं नाही. आहे ती थोडीथोडकी जमीन विकून, घर गहाण टाकून परदेशी जाण्यासाठी पैसा जमा केला जातो आहे. एवढं करूनही परदेशी जायची संधी मिळेलच, याची खात्री नाही.

पण इथल्या कुणालाच या हिरव्यागार धान्याच्या कोठारात आपलं भविष्य सुखकर असेल, असं वाटतं नसेल का?

"माझ्या अवतीभोवतीच्या तरुणांना, माझ्या सीनिअर्सला पाहाते तेव्हा मी निराश होते. त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय, पण हातात नोकरी नाही. भविष्याची स्वप्नं पाहात भकास बसलेत ते. माझं भविष्य तसंच असेल का, याची मला भीती वाटते," ननिता सांगते.

आज देशात उच्चशिक्षित तरुण, तरुणींमध्ये बेरोजगारीचं प्रमाण सर्वांत जास्त म्हणजे 16 टक्के आहे. तर इतर अशिक्षित किंवा जेमतेम शिकलेल्यांमध्ये ते 5 टक्के आहे, असं एक अहवाल सांगतो.

अझीम प्रेमजी विद्यापीठातील Centre for Sustainable Employmentने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या State of Working India - 2018 (SWI) अहवालात देशातल्या रोजगाराच्या स्थितीबाबत काही निरीक्षणं मांडण्यात आली आहेत. हा अहवाल राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS), श्रम मंत्रालयाच्या नोकरी-बेरोजगारीचं सर्वेक्षण (EUS) आणि Centre for Monitoring Indian Economy (CIME) या खासगी संस्थेच्या आकडेवारीवर आधारित आहे.

काही दिवसांपूर्वी Centre for Monitoring Indian Economy ने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला. त्यानुसार 2018 साली जवळपास 1.10 कोटी भारतीयांनी आपली नोकरी गमावली. यात 88 लाख महिला तर 22 लाख पुरुष होते.

बेरोजगारीचा दरही 2018 साली 7.4 टक्के होता, जो गेल्या 15 महिन्यातला सर्वाधिक दर आहे. म्हणूनच कदाचित पंजाबातल्या प्रत्येक तरुणाला परदेशी जायचं आहे.

"मी शिक्षक बनण्याची तयारी करतेय. पण आमच्या आसपासचे लोक येऊन माझ्या आईवडिलांना सांगतात, 'काय गरज आहे हिला या कोर्सला टाकायची? त्यापेक्षा IELTS कोचिंगला घाला आणि परदेशी पाठवा," ननिता सांगते.

पण परदेशी जाणाऱ्या तरुणांचं भविष्य कुठे सुखकर आहे? "त्यांनाही दारोदारी भटकावं लागतंय. कुणी पिझ्झा शॉपमध्ये काम करतं, कुणी बीअर बारमध्ये तर कुणी एखाद्या मॉलमध्ये वाणसामानाची पुडकी बांधतंय. या कामात तरी प्रतिष्ठा कुठेय?" ती विचारते.

तसं पाहायला गेलं तर भारतातल्या इतर राज्यांतल्या तरुणांपेक्षा पंजाबातल्या तरुणांचे प्रश्न काही फारसे वेगळे नाहीत. बेरोजगारी, पारंपारिक व्यवसायात कमी कमाई, असमान संधी, परंपरांचं जोखड, स्वातंत्र्य नसणं, हे प्रश्न कमीअधिक फरकानं सर्वांचे आहेत.

पण पंजाबी तरुणांनाच परदेशी जाण्याचं सर्वांत जास्त आकर्षण का आहे? तिथल्या तरुणांशी आणि स्थानिक पत्रकारांशी बोललं की कारण लक्षात येतात.

बर्नाला कॉलेजमध्ये शिकणारा रजत मित्तल सांगतो, "इथली मुलं जे पाहतात, तसंच करतात. नोकऱ्यांचा अभाव इतर राज्यांमध्येही असेल, पण तिथे त्यांच्या घरच्यांच्या मालकीची एवढी शेती नसते. काहीही करून आपल्या परिस्थितीवर मात करायला शिकतात ती मुलं कारण जगण्यासाठी दुसरा पर्यायच नसतो. इथली मुलं काय शिकतात आणि घरच्यांच्या शेतीच्या जीवावर जगतात."

पंजाबातली जमीन एवढी सुपीक की बी नुस्तं फेकलं तरी पीक तरारून वर येणार. मग आईवडिलांची हीच शेतजमीन विकून IELTS कोचिंग सेंटरची फी भरली जाते. एजंटला पैसे चारले जातात.

"70-80च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तानची चळवळ जोरात होती. आपल्या मुलांनी अतिरेकी बनण्यापेक्षा परदेशी गेलेलं चांगलं, असं आई-वडिलांना वाटायचं. तिथं जाऊन मोलमजुरी का करेना, पण इतर काही धोका नाही ही सुरक्षितता त्यांना महत्त्वाची वाटायची," पंजाबमधले स्थानिक पत्रकार सुखचरण प्रीत माहिती देतात.

"दुसऱ्या बाजूला जे लोक परदेशात होते, ते भले कोणतही काम करो, पण डॉलर्समध्ये कमवत होते. त्या तुलनेत तेव्हा भारतात संधी कमी होत्या. असे परदेशी गेलेले लोक आपल्या गावी मोठी मोठी घरं बांधायचे तेव्हा इतर गावकऱ्यांना अप्रूप वाटायचं. तेव्हापासून ही परदेशी जाण्याची क्रेझ सुरू झाली. आता पंजाबला ड्रग्सचा विळखा पडला आहे. इथं राहून मुलांनी अंमली पदार्थांच्या नादी लागण्यापेक्षा परदेशी जाऊन गाड्या धुतलेल्या परवडल्या असंही आई-वडिलांना वाटतं," ते सांगतात.

म्हणूनच जेव्हा ननितासारखी एखादी म्हणते की तिला तिचा देश सोडून बाहेर जायचं नाहीये, तेव्हा सगळ्यांना अप्रुप वाटतं.

"मला TET (Teacher's Eligibility Test) मध्ये चांगले मार्क मिळाले, मी लायक असेन तर सरकारने मला नोकरी द्यावी. मला स्वतःच्या देशात काम करायचं आहे, सन्मानाने," ननिता ठामपणे सांगते.

तिला सरकारी शिक्षक बनायचं आहे. ती ज्या शाळेत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करते, तिथे गेलं की लक्षात येतं की सरकारी शाळेत शिकणाऱ्या वंचितांच्या मुलांसाठी तिच्या मनात किती कळकळ आहे. राहून राहून वाटतं, असे शिक्षक मिळाले तर त्या मुलांचंही भलं होईल.

पण ननिता म्हणते की कोणतंही सरकार येवो, त्यांच्यापैकी कुणालाही तरुणांची काळजी नाही. "सत्तेत येण्यासाठी ते नोकऱ्या देण्याची आश्वासनं देतात खरी, पण होत काहीच नाही. त्यांना (राजकारण्यांना) वाटत असेल की असं केल्याने आपल्या व्होट बँकेत काही वाढ होणार नाही, मग कशाला त्रास? पण यांच्या राजकारणाच्या नादात सगळ्या तरुणांचं भविष्य खराब होतं," ननिता उत्तरते.

ननिताच्या आईला तिला खूप मोठं झालेलं बघायचं आहे. "माझी मुलगी खूप हुशार आहे आणि खूप समंजस. तिला तिच्या आयुष्यात सगळं मिळायला हवं,"त्यांचे डोळे पाणावलेले असतात.

"माझं माझ्या देशावर खूप प्रेम आहे. मला हा देश सोडून कुठेही बाहेर जायचं नाही, पण ज्या देशावर माझं इतकं प्रेम आहे, त्या देशाचं सरकार माझ्यासाठी काय करतंय?" ननिताच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसतं आणि ज्याचं उत्तर माझ्याकडे नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)