IAF: याच महिला पायलटनी केली होती पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये ती कारवाई? – फॅक्ट चेक

सोशल मिडियावर महिला वैमानिकांचे फोटो शेअर होत आहेत. Image copyright Social media

भारतीय वायुदलाच्या या महिला वैमानिकांनी 26 फेब्रुवारीला सीमेपलीकडे जाऊन पाकिस्तानात हल्ला केला, असा मेसेज तुम्हालाही आला का?

कारण फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असा दावा करणारे अनेक मेसेज आणि फोटो शेअर होत आहेत. व्हॉट्सअॅपवर देखील हे फोटो शेअर केले जात होते.

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला झाल्यापासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमध्येच सोशल मीडियावर भारतीय लढाऊ वैमानिकांचे फोटो शेअर होत आहेत.

बीबीसीच्या टीमनं या फोटोंची पडताळणी केली. त्यांच्या असं लक्षात आलं आहे की हे फोटो आणि या घटनाचा काहीही संबंध नाही.

27 फेब्रुवारीला पाकिस्तानी सेनेनं सांगितलं की भारतीय सेनेने पाकिस्तानी हद्दीत येऊन हल्ला केला. त्यांच्या दोन विमानांना आम्ही पाडलं.

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी सांगितलं की एक विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडलं आणि एक वैमानिकाला आम्ही ताब्यात घेतलं. त्यानंतर भारताने हे जाहीर केलं की वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता आहे.

व्हायरल झालेली 'ती' पोस्ट

सोशल मीडियावर जी पोस्ट फिरत आहे, त्यात असा दावा केला आहे की या फोटोत दिसणारी महिला ही अनिता शर्मा आहे आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करणाऱ्या टीममध्ये असलेली ती एकमेव महिला आहे.

Image copyright Social media

"पाकिस्तानात घुसून 300 दहशतवाद्यांना ठार करणारी एकमेव महिला एअरफोर्स सैनिक. या वाघिणीचं अभिनंदन करा," असा मजकूर या फोटोसोबत फिरतोय.

अद्याप लष्कर आणि वायुदलाने या मिशनमध्ये सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांची नावं जाहीर केली नाहीत. अशा मिशनमध्ये काम केलेल्या जवानांची आणि अधिकाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाते.

खरं तर हा फोटो अवनी चतुर्वेदींचा आहे. त्या भारतीय वायुसेनेचं फायटर एअरक्राफ्ट उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. युद्धजन्य स्थितीमध्ये त्या सुखोईसारखं विमान चालवू शकतात, असं मीडियाच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

Image copyright Soial media

सोशल मीडियावर स्क्वॉड्रन लीडर स्नेहा शेखावत यांचेही फोटो देखील व्हायरल होत आहेत. शेखावत यांनी 2012च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला वायुदलाच्या एका तुकडीचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर 2015मध्ये प्रजासत्ताक दिनाला वायुदलाच्या महिला तुकडीचं नेतृत्व केलं होतं. परेडचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला फायटर पायलट आहेत.

पण 'उर्वशी जरीवाला' या नावासह त्यांचे फोटो, सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत, तसंच त्या सूरत भुल्का भवनच्या विद्यार्थिनी आहेत, असं देखील म्हटलं जात आहे.

Image copyright Social media

स्नेहा शेखावत यांनी 2007मध्ये NDAची परीक्षा देऊन वायुदलात प्रवेश मिळवला होता. त्यानंतर त्यांना हैदराबाद ट्रेनिंग सेंटरमध्ये सर्वोत्तम महिला वैमानिकाचा पुरस्कार मिळाला होता. स्नेहा या राजस्थानच्या शेखावती या भागातल्या आहेत.

याबरोबरच सोशल मीडियावर आणखी फोटो फिरत आहे. या फोटोत असा दावा केला आहे की वायुदलाच्या या 12 वैमानिकांनी पुलवामाच्या हल्ल्याचा बदला घेतला.

रिव्हर्स इमेज सर्च करून हे लक्षात आलं आहे की हे फोटो 2015चे आहेत आणि युनायटेड किंगडमच्या रॉयल एअर फोर्स आणि भारतीय वायुदलात 10 दिवसांचा युद्धाभ्यास झाला होता. त्यावेळचे हे फोटो आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)