लोकसभा 2019 : ‘मी आहे खेड्यातली पण मला शहरी विद्यार्थ्यांना टक्कर द्यायचीये’

बीनल
प्रतिमा मथळा बीनलला ग्रामीण भागात शिकण्याचा न्युनगंड आहे.

"I can talk English, I can walk English, because English is a very funny language," आरशात बघत ती अमिताभच्या डायलॉगची नक्कल करते आणि खळखळून हसते.

बीनल, 18 वर्षांची ही गुजराती मुलगी म्हणजे उत्साहाचा खळाळता झरा आहे. तिच्या वयाला शोभेलसा खेळकरपणाही तिच्यात दिसतो.

मी गुजरातमधल्या तिच्या गावी गेले होते ती येणाऱ्या निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार हे जाणून घ्यायला.

आम्ही भरपूर गप्पा मारल्या. तिने मला तिचं आवडतं आईस्क्रीम कोणतं ते सांगितलं, कॉलेज संपलं की तिला कुठे भटकावंस वाटतं ते सांगितलं, तिच्या भावाने तिला वाढदिवसाला दिलेला नवा मोबाईल दाखवला, तिच्या आयुष्याबद्दल सांगितलं आणि तिच्या मनातली भीतीही बोलून दाखवली.

तिला कॉलेजला जायला, मैत्रिणींबरोबर फिरायला जायला, तिचं मनपसंत चाट खायला खूप आवडतं, पण तिला वर्गात मात्र बांधल्यासारखं होतं.

शिक्षकांनी काही प्रश्न विचारला आणि उत्तर द्यायचं म्हटलं तर तिच्या पोटात गोळा येतो, कारण तिचं शिक्षण खेड्यात झालंय आणि तिला इंग्लिश बोलता येत नाही.

"मला माहितेय हा न्युनगंड आहे, पण मी काय करू? असं वाटतं माझा स्वतःशीच झगडा सुरू आहे. मी एक शब्दही बोलत नाही वर्गात, अगदी शिक्षकांनी एखादा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर मला येत असलं तरी."

इतकी बोलघेवडी मुलगी कधी गप्प बसत असेल यावर विश्वास बसत नाही. पण तिच्या वाटेला तोच त्रास आहे जो खेड्यातल्या होतकरू तरुणांना सहन करावा लागतो.

ते शिक्षणासाठी आणि चांगल्या संधीच्या शोधात शहरात येतात खरे पण इंग्लिश न बोलता आल्यामुळे किंवा तिथल्या वातावरणात जुळवून न घेता आल्यामुळे मागे पडतात.

बीनल म्हणते की ग्रामीण भागातल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळत नाही.

Annual Status of Education Report 2018 (ASER) या अहवालानुसार खासगी शाळा शैक्षणिक दर्जाच्या बाबतीत गेल्या दहा वर्षांपासून सरकारी शाळांच्या पुढे आहेत.

"मी गुजराती माध्यामच्या सरकारी शाळेत शिकले. शाळेत सगळे म्हणायचे की मुलगी हुशार आहे. पुढे मी Bachelor of Business Administration कोर्सला अॅडमिशन घेतली. नडियादला जायला यायला लागले आणि माझं सगळं विश्वच बदलून गेलं. खूप गोष्टी नव्याने कळाल्या, मी स्मार्ट नाही, शहरातल्या मुलांसारखं मला चांगलं बोलता येत नाही, त्यांच्या आणि आमच्या शिक्षणाच्या दर्जात प्रचंड फरक आहे," बीनल म्हणते.

आणि म्हणूनच येत्या निवडणुकांमध्ये बीनल त्याच प्रतिनिधींना मत देणार आहे जो ग्रामीण आणि शहरी भागातल्या शिक्षणाचा दर्जा एकसारखा करेल.

तिला वाटतं ग्रामीण भागातल्या मुलांच्या भविष्याशी सरकारला, किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला काही देणं घेणं नाहीये. "त्यांना काय, ते फक्त शाळा बांधतात हे दाखवायला की बघा आम्ही शिक्षणासाठी किती भरीव काहीतरी करत आहोत, पण प्रत्यक्षात काय होतं? गुजरातमधले जास्तीत जास्त विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये शिकतात. त्यांना अत्यंत वाईट दर्जाचं शिक्षण मिळतं."

आम्हाला जर चांगलं शिक्षणच मिळालं नाही तर आम्ही भविष्यातल्या स्पर्धेसाठी कसे तयार होणार हा तिचा मुख्य प्रश्न आहे.

बीनलचं गाव मोहोलेल नडियादपासून फक्त 14 किलोमीटर अंतरावर आहे. तिच्या गावाहून ती रोज नडियादला येते, कॉलेजसाठी.

नडियादच्या सगळ्यांत उच्चभ्रू रस्त्यावर तिचं मॅनेजमेंट कॉलेज आहे. इथेच तिच्या इच्छा आकांक्षांना पंख फुटतात. पण वर्गातल्या शिक्षकांसमोर काही बोलायची तिची हिंमत होत नाही. कारण तिच्या शिक्षणाने तिला नव्या युगाच्या स्पर्धेसाठी सक्षमच बनवलं नाही.

तीन भावंडांमध्ये सगळ्यांत धाकटी असणाऱ्या बीनलला तिच्या घरच्यांना अभिमान वाटेल असं काही करायचं आहे. "माझ्या घरच्यांनी मला शिकवण्यासाठी खूप कष्ट घेतलेत. मला वाटलं मी त्यांना काहीतरी करून दाखवेन, पण मी अभ्यासात मागे पडतेय," ती चिंतेने म्हणते.

ती सरकारच्या धोरणांवरही टीका करते. "सरकार गप्पा मारत स्कील इंडिया, डिजिटल इंडियाच्या. पण त्यातून ग्रामीण विद्यार्थ्यांना वगळून कसं चालेल? आम्हाला शिकवा ना, आम्हाला शिक्षणाच्या उत्तम सोयी उपलब्ध करून द्या."

ASER च्या रिपोर्टनुसार सरकारी शाळांमध्ये पाचवीत शिकणाऱ्या 44.2 टक्के मुलांना फक्त दुसरीच्या वर्गाच्या दर्जाचं वाचन आणि लेखन जमतं.

"आम्ही सरकारी शाळांमधली मुलं काय करतो, कसं शिकतो याच्याशी सरकारला कशाला देणंघेणं असेल. त्यांची मुलं तर मोठ्या मोठ्या शाळांमध्ये शिकतात," ती म्हणते.

"ते फक्त नावाला शाळा-कॉलेज उभारतात आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतात. म्हणूनच शिक्षणाचा दर्जा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे," असं बीनल सांगते.

"आम्ही गावाकडची पोरं शहरातल्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकत नाही, मग परदेशातल्या विद्यार्थ्यांशी काय स्पर्धा करणार. इथे एकाच देशात एक भारत आणि एक इंडिया राहातात. दोघांचं जगच वेगवेगळं आहे. माझी इच्छा आहे दोघांनी एकत्र पुढे जावं, दोघांचा सारखाच विकास व्हावा," ती म्हणते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)