लोकसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्राचं राजकीय चित्र कसं आहे?

निवडणूक Image copyright Getty Images

'लोकशाहीतील सर्वात मोठा इव्हेंट', या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीची घोषणा नुकतीच झाली. महाराष्ट्रात या निवडणुका 11, 18, 23 आणि 29 एप्रिल अशा चार टप्प्यांमध्ये होणार आहेत.

या घोषणेनंतर राज्यातल्या राजकीय हालचालींना वेग येईल. राज्यातील सत्ताकारणाची समीकरणं सोडवण्यासाठी वेगवेगळी सूत्रं बांधली जातील.

पण सध्या राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे, कोणता पक्ष कोणत्या पक्षाच्या हातात हात घालून लढणार आहे, वंचित बहुजन आघाडी या वेळी किती प्रभाव टाकेल, यावर एक नजर टाकू या.

Image copyright GettyImages/Hindustan Times
प्रतिमा मथळा सेना-भाजप युती अखेर झालीच

सेना-भाजप: अखेर जमलंच!

गेली साडेचार वर्षं सत्तेत सहभागी असूनही आपल्याच मित्रपक्षाला म्हणजे भाजपला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपशी युती केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. पण गेल्या महिन्यात भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर या दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचं ठरवलं आहे.

या बैठकीनंतर शिवसेना-भाजप लोकसभेत किती जागा लढवणार, याचीही घोषणा करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजप 25 जागांवर लढणार आहे. तर शिवसेना 23 जागांवर उमेदवार उभे करेल.

'जनभावनेचा आदर करत आम्ही एकत्र येत आहोत', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही युतीची घोषणा करताना म्हणाले होते. तर, स्वबळाची घोषणा करून 'यू टर्न' घेतल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले होते की, 'मी यू, वाय, झेड, कोणताही टर्न घेतला, तरीही शिवसैनिक माझ्याबरोबरच राहील.'

2014च्या लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाशी तुलना केली, तर यंदा भाजपच्या वाट्याला एक जागा जास्त आली आहे आणि शिवसेनाही तीन जादा जागांवर निवडणूक लढवणार आहे.

पहिला टप्पा 11 एप्रिल, गुरुवार 7 जागा वर्धा
रामटेक
नागपूर
भंडारा-गोंदिया
गडचिरोली-चिमूर
चंद्रपूर
यवतमाळ-वाशिम
दुसरा टप्पा 10 जागा बुलडाणा
18 एप्रिल, गुरुवार अकोला
अमरावती
हिंगोली
नांदेड
परभणी
बीड
उस्मानाबाद
लातूर
सोलापूर
तिसरा टप्पा 23 एप्रिल, मंगळवार 14 जागा जळगाव
रावेर
जालना
औरंगाबाद
रायगड
पुणे
बारामती
अहमदनगर
माढा
सांगली
सातारा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
कोल्हापूर
हातकणंगले
चौथा टप्पा 29 एप्रिल, सोमवार 17 जागा नंदुरबार
धुळे
दिंडोरी
नाशिक
पालघर
भिवंडी
कल्याण
ठाणे
मुंबई उत्तर
मुंबई वायव्य
मुंबई ईशान्य
मुंबई उत्तर-मध्य
मुंबई दक्षिण-मध्य
मुंबई दक्षिण
मावळ
शिरूर
शिर्डी

2014मध्ये भाजपने 48 पैकी 24 जागा लढवल्या होत्या. शिवसेनेच्या वाट्याला 20 जागा आल्या होत्या आणि उरलेल्या चार जागा या दोन्ही पक्षांनी मित्रपक्षांसाठी सोडल्या होत्या.

यंदा मात्र शिवसेना आणि भाजप यांनी कोणत्याही मित्रपक्षांसाठी जागा न सोडता लोकसभा निवडणुकीतील जागांची वाटणी केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष समसमान जागा लढवतील, असाही निर्णय झाला आहे.

Image copyright GETTYIMAGES
प्रतिमा मथळा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी

काँग्रेस-राष्ट्रवादी: 'तुझ्या गळा, माझ्या गळा'

गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेत महाराष्ट्रात पार पाचोळा झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांसमोर यंदाही एकत्र येण्यावाचून पर्याय नव्हता.

2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 26 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी हिंगोली आणि नांदेड या दोनच मतदारसंघातील मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेससाठीही ही निवडणूक फारशी आशादायी नव्हती. त्यांनी 21 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी फक्त चारच उमेदवारांना संसदेत आपल्या मतदारांचं प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली.

यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार का, याबाबतचा संभ्रम राष्ट्रवादी काँग्रेसने जानेवारीच्या सुरुवातीलाच एका ट्वीटद्वारे दूर केला.

त्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, 'आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. काँग्रेस पक्षासह समविचारी पक्षांशी आघाडी व्हावी, यासंदर्भात चर्चा सुरू आहे.'

हे दोन्ही पक्ष राज्यातील इतरही पक्षांबरोबर चर्चा करून त्यांनाही या आघाडीत सहभागही करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या घटक पक्षांना आपापल्या कोट्यातील जागा देण्याबाबतही त्यांचं एकमत झाल्याचं वृत्त आहे.

Image copyright GettyImages/Hindustan Times
प्रतिमा मथळा वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात तिसरा पर्याय ठरू पाहतोय

वंचित बहुजन आघाडी: तिसरा पर्याय?

राज्यातील चार महत्त्वाचे पक्ष सोडले, तर आणखी एक पर्याय उभा राहत आहे. हा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा!

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष असलेल्या प्रकाश आंबेडकर यांना गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. पण यंदा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांची एमआयएम यांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.

या आघाडीने घेतलेल्या सभांना आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरीही भाजपविरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत आंबेडकर यांनी जावं, यासाठीही प्रयत्न सुरू होते.

"आम्ही काँग्रेससमोर 12 जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर 22 जागांबाबतही चर्चा होती. पण तीदेखील बारगळली आहे," प्रकाश आंबेडकर यांनी 'बीबीसी'शी बोलताना सांगितलं.

तसंच आता थेट 48 जागांची तयारी करून ठेवली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Image copyright GettyImages/Hindustan Times
प्रतिमा मथळा आंबेडकर-ओवेसी राज्यातील राजकीय समीकरणं बदलू पाहत आहेत

त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिहेरी लढत होईल, असं सध्याचं चित्र आहे.

"वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लोकसभेवर निवडून येतील की नाही, हे आत्ताच सांगणं कठीण आहे. पण विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर अशा मतदारसंघांमध्ये नक्कीच प्रभाव पाडतील," असं लोकसत्ताचे सहसंपादक मधु कांबळे यांनी सांगितलं.

"मुंबईतही ईशान्य, दक्षिण-मध्य आणि उत्तर-पश्चिम या तीन मतदारसंघांमध्ये दलित आणि मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चांगली कामगिरी करू शकतात," असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं.

"वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांचा फटका सेना-भाजपपेक्षाही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बसेल," असंही त्यांनी सांगितलं.

Image copyright GettyImages/Hindustan Times
प्रतिमा मथळा राज ठाकरे

मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर...

"2009च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई, नाशिक, ठाणे या पट्ट्यात अनेक मतदारांना आकृष्ट केलं होतं. किंबहुना मनसेच्या या दणक्याचा फटका सेना-भाजप उमेदवारांना बसला होता," अशी माहिती लोकसत्ताचे सहसंपादक संदीप आचार्य यांनी दिली.

पण दहा वर्षांनंतर 2019मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परिस्थिती तशी राहिलेली नाही. पक्षबांधणीपासून अनेक गोष्टींमध्ये त्यांना अपयश आल्याचंही मत आचार्य यांनी व्यक्त केलं.

सध्या राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासाठी एक जागा सोडेल, अशीही चर्चा महाराष्ट्रात आहे. मात्र या चर्चेला मनसे किंवा राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून पुष्टी मिळालेली नाही.

Image copyright GettyImages/Hindustan Times
प्रतिमा मथळा खासदार राजू शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाणार का?

दुसऱ्या बाजुला गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी माढा आणि हातकणंगले या दोन मतदारसंघांमधील जागा दिल्या होत्या.

या दोनपैकी हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी निवडून आले. पण या वेळी त्यांनी सेना-भाजप यांच्याशी असलेली युती तोडली आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडून दोन जागांची अपेक्षा आहे. हातकणंगले, वर्धा, बुलढाणा अशा तीन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हव्या आहेत, अशी माहिती युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली. यावर दोन दिवसांत निर्णय झाला नाही तर आम्ही स्वबळावर लढू, असं तुपकर म्हणाले आहेत.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान संघ स्वतंत्र निवडणूक लढवणार असून शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभं करू असं राणे यांनी जाहीर केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)