सुजय विखे पाटील भाजपमध्ये दाखल, कुटुंबाच्या विरोधात जाऊन निर्णय घेतल्याचा दावा

सुजय विखे-पाटील Image copyright BBC Marathi

सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना भाजपकडून अहमदनगरची लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

पक्षात प्रवेश करताना सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसंच कायम देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आई आणि वडील तसंच कुटुंबाच्या विरोधात जाऊन मी हा निर्णय घेतला आहे, त्यांची किती सहमती आहे हे मला माहिती नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

सुजय विखे पाटील हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा सुजय विखे-पाटील यांच्यासाठी सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सुजय यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

"ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातली आहे. नगरच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये 2 आमदार राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेसचा एकही सदस्य गेल्या निवडणुकीत निवडून आलेला नाही. तसंच उरलेल्या चारही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला क्रमांक दोनची मतं आहेत. दुसरीकडे शिर्डीचा मतदासंघ काँग्रेसकडे आहे. त्यामुळे नगरची जागा काँग्रेसने मागण्याला काही अर्थच नाही. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवेल," असं शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात म्हटलं आहे.

कोण आहेत सुजय विखे-पाटील?

डॉ. सुजय विखे-पाटील हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांचे पुत्र आहेत. सुजय विखे पाटील हे पेशाने न्यूरोसर्जन आहेत.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. तसंच विखे-पाटील फाऊंडेशनचे ते प्रमुख आहेत.

२०१३ पासून डॉ. सुजय विखे-पाटील हे राजकारणात सक्रिय आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं युवक कॉंग्रेस अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे.

Image copyright FACEBOOK/Sujay Vikhe-Patil

बाळासाहेब विखे पाटील यांच्या जनसेवा फाऊंडेशनमार्फत त्यांनी मतदारसंघात 'लेक वाचवा' अभियान तसंच जलक्रांती अभियान राबवलं. त्याचबरोबर अपघात विमा योजना सुरू केली. त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील समीकरणं

२००४ ला राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख हे नगर दक्षिणमधून लोकसभा निवडून आले. त्यानंतर २००९ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळे सर्वांचंच लक्ष नगर दक्षिणच्या जागेकडे असतं. ही जागा राष्ट्रवादीतल्या गोटातली असली तरी २००९ पासून वारंवार या जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे.

२००४ ला राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख इथून निवडून आले. २००९ ला राष्ट्रवादीकडून शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार दिलीप गांधी निवडून आले.

२०१४ ला राष्ट्रवादीकडून राजीव राजळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांना पराभूत करत पुन्हा भाजपचे दिलीप गांधी विजयी झाले होते.

अहमदनगर मतदारसंघावर राष्ट्रवादीची चांगली पकड होती. पण मागच्या १० वर्षात स्थानिक तडजोडींमुळे ती कमकुवत झाल्याचं ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी यांनी सांगितलं.

२००९ नंतर नगरच्या दोन्ही मतदारसंघात शिवसेना-भाजपने वर्चस्व मिळवलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)