भारत-पाकिस्तान युद्ध: युद्धकैद्याची पत्नी एवढीच दमयंती तांबेंची ओळख नाही...

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
युद्धकैद्याची पत्नी एवढीच दमयंती तांबेंची ओळख नाही...

"तुमचे पती पकडले गेले असतील पाकिस्तानात, ते नंतर बघू. पण तुम्ही आधी अंबाल्याचं सरकारी घर रिकामं करा. अधिकाऱ्यांच्या घरांची सध्या फार कमतरता आहे. मग बोलू आम्ही तुमच्याशी," असं 23 वर्षांच्या दमयंती तांबेंना एका मंत्र्यांनी ऐकवलं होतं.

दुपारी बाराची वेळ, दिल्लीची ओसरत आलेली थंडी, हातात चहाचा कप आणि दमयंती तांबे मला त्यांच्या आयुष्यातल्या गमती-जमती सांगत असतात. हो, त्याच ज्या गेली 48 वर्षं आपल्या नवऱ्याला पाकिस्तानातून परत आणण्यासाठी संघर्ष, सॉरी प्रयत्न करत आहेत.

"संघर्षबिघर्ष नको म्हणू बाई, मग तो फारच मोठा शब्द वाटतो. मी प्रयत्न करतेय, कसोशीने आणि करत राहीन पण मला संघर्ष शब्द काही आवडत नाही," त्या सांगतात.

त्यांचे पती फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे भारतीय वायूसेनेत होते. 1971 च्या युद्धात लढताना त्यांचं विमान पाकिस्तानी सैन्याने मुलतानजवळ पाडलं आणि त्यांना ताब्यात घेतलं. त्यावेळी त्यांच्या लग्नाला फक्त 18 महिने झाले होते.

पाकिस्तानाच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन 50 तासात परतले, तशा दमयंती तांबेच्या बातम्या यायला लागल्या. एकटी बाई, आता तर सत्तरीच्या वरच्या असतील, गेली 48 वर्षं पाकिस्तानात अडकलेल्या नवऱ्याला परत आणण्यासाठी झगडतेय आणि तरीही तिच्या प्रयत्नांना यश आलं नाही हा बातमीचा विषय नसता तर नवलच.

मीही त्यांना त्यासाठीच तर भेटायला गेले होते, पण त्यांना भेटले आणि लक्षात आलं की या बाईंचं आयुष्य त्या एका घटनेपाशी थांबलेलं नाही (जसं अनेकांनी म्हटलं) तर तिथून सुरु होऊन पुढे अनेकांना प्रेरणा देणारं ठरलं.

दमयंती तांबे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी डेप्युटी स्पोर्टस डायरेक्टर, भारताच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू, अर्जुन पुरस्काराच्या मानकरी. पण त्यांची एकच ओळख सगळ्यांनी ठसवली आहे, गेली 48 वर्ष आपल्या नवऱ्याची वाट पाहाणारी स्त्री.

ऑफिसमधून त्यांना फोन केला, म्हटलं भेटायला कधी येऊ? पुढचे दोन दिवस त्या गडबडीत होत्या. तिसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता त्यांनी मला बोलावलं.

प्रतिमा मथळा दमयंती तांबे बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडू आहेत.

"आणि हो, तुझे प्रश्न लिहून आण," त्या फोनवर म्हणाल्या. "दुसरी गोष्ट, नेमके प्रश्न विचार, उगाच तुमच्या पतीच्या आठवणी सांगा, गेल्या 48 वर्षांत तुम्ही कसं जगलात ते सांगा, असे प्रश्न विचारू नको. तु माझ्याशी बोलणार तासभर, त्यात 48 वर्षांचा लेखाजोखा सांगणं मला जमणार नाही, आणि तुला समजणारही नाही," त्या उत्तरल्या. म्हटलं आजीबाई कडक दिसताहेत.

त्यामुळे भेटायला गेले तेव्हा थोड्या तयारीतच. दार बाईंनीच उघडलं. माझ्या हातात ट्रायपॉडची बॅग आणि माझा कॅमेरामन मिधतच्या हातातला कॅमेरा पाहून म्हणाल्या, तुमच्या आजकालच्या पोरांचं बरंय, तुमचं 'बॅगेज', मग ते कोणत्याही अर्थाने असेना, कमी झालंय. आणि गोड हसल्या. तिथूनच गट्टी जमायला लागली. पूर्वी अशा मोठ्या मोठ्या ओबी व्हॅन्स असायच्या. एकाला तर मी सांगितलं होतं की बाबारे तुझी ती मोठी व्हॅन घेऊन येऊ नकोस, कॉलनीच्या गेटमध्ये शिरणार नाही.

मग फोनवरच्या त्यांच्या स्पष्ट सूचनांचा अर्थही कळायला लागला. सतत तेच प्रश्न, लोक विचारणार पतीच्या आठवणी सांगा, मग म्हणणार तुमचं आयुष्य किती एकटं आहे ते सांगा, तुम्हाला झालेला त्रास सांगा.

"उणपुरं दीड वर्ष सोबत राहिलो आम्ही. आता 48 वर्षांनंतर त्यातलं आठवणार तरी किती आणि सांगणार तरी किती. त्यातही माझी फिरस्ती. मला सतत स्पर्धा खेळायला बाहेर जावं लागायचं. मी परत आले की विजय त्यांच्या सहकाऱ्यांना विनोदाने सांगायचे, अरे माझी बायको सुट्टीवर आलीये. इतर ऑफिसर्स सुट्टीवर जातात आणि त्यांच्या पत्नी वाट पाहातात, पण माझं उलटं आहे," त्या भूतकाळात रमतात.

71 वर्षांच्या दमयंती एकट्या राहातात. आजही त्यांची सगळी काम स्वतःच करतात. या वयातही त्या गाडी चालवतात, घरात हवं नको पाहातात, असंख्य संस्थांच्या कार्यकारिणीवर आहेत. "लोक मला विचारतात, की इतकी वर्ष एकट्या कशा राहिलात? पण मला कधी कोणाची गरज पडली नाही. कोणाच्या प्रत्यक्ष किंवा भावनिक आधारावर विसंबून राहावंस वाटलंच नाही. माझं करायला मी खंबीर आहे की," त्या ठणकावून सांगतात.

प्रतिमा मथळा त्यांच्या घरात गेलं की दिसतात डझनावारी ट्रॉफिज आणि मानचिन्ह

जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या समोर असणाऱ्या कॉलनीत त्यांच छोटेखानी घर आहे. घरात गेलं की नजरेत भरतात त्या ट्रॉफीज आणि मानचिन्ह. तीन-चार डझन तरी ट्रॉफीज असतील पण माझ्या नजरेत भरलं ते दाराजवळं असलेलं एक छोटं कपाट आणि त्यावर ठळकपणे मांडलेल्या तीन गोष्टी, अर्जुन पुरस्कार, वीरपत्नी पुरस्कार आणि दमंयती-विजय या दाम्पत्याचा सुंदरसा फोटो. जणूकाही बाईंचं संपूर्ण आयुष्य तिथे मांडून ठेवलंय.

आम्ही आमच्या शुटसाठी त्यांचा हॉल सगळा विस्कटला. अर्जुन पुरस्कार उचलून एकीकडे ठेव, वीरपत्नी भलतीकडे, त्या दांपत्यांचा हसरा फोटो आणखी तिसरीकडे. आणि आपण घातलेला धिंगाणा पाहून आम्हीच ओशाळलो, म्हणालो, आम्ही जाताना सगळं स्वच्छ आवरून घेऊ. त्या आमच्या गोंधळाकडे अगदी सौम्यपणे पाहत होत्या. म्हणाल्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला सवय आहे आवरायची. आपल्या आयुष्यात विस्कटलेल्या गोष्टी इतक्या वेळेस आवरल्या असतील दमयंती बाईंनी, त्यापुढे हा पसारा क्षुल्लक वाटावा त्यांना.

जवळच ठेवलेला अल्बम मला आणायला सांगितला. फ्लाईट लेफ्टनंट विजय आणि त्यांच्या लग्नाचा आणि हनिमूनच्या फोटोचा अल्बम हा. एकेक फोटो मला दाखवत होत्या. हा अल्बम विजय यांनी स्वतः बनवला होता. आणि प्रत्येक फोटोच्या खाली सुवाच्च अक्षरात काही ओळी लिहिलेल्या. "बघ, त्यांचं अक्षर किती सुंदर होतं."

एका फोटोमध्ये दमयंती बाईंनी छोटा स्कर्ट घातला आहे, त्यात त्या अगदी शाळकरी मुलगी दिसतात, आणि म्हणूनच त्याखाली विजय तांबेंनी लिहिलं होतं, "शाळकरी मुलींना कधीपासून हनिमूनला जायची परवानगी मिळायला लागली, कमाल आहे बुवा!"

49 वर्ष जुना रोमान्स, आजही तेवढाच ताजा वाटतो. त्या घरात ठिकठिकाणी विजय तांबेंचं अस्तित्व दिसत राहातं. त्यांना आवडणाऱ्या ग्रामोफोन रेकॉर्डस, कॅसेट, आणखी बरंच काही, असं वाटतं आत्ता आतल्या खोलीमधून स्वच्छ पायजमा घातलेले मिश्कील तांबे आजोबा बाहेर येतील.

तुमच्या घरात अँटिकचा खजाना आहे असं म्हटल्यावर "आमच्यासारखी माणसं अँटिक व्हायला लागली की आमच्या घरातल्या गोष्टी आपोआप अँटिक ठरतात," त्या खळाळून हसल्या.

एव्हाना त्याही आमच्या पसाऱ्याच्या खेळात सहभागी झालेल्या होत्या, मग हॉलमधल्या एका कपाटातून अजून काही फोटो काढले, काही पुस्तकं, कॅसेटस, कागदपत्रं. "बघ, किती धूळ आहे. हे कॅसेटला बांधलेले रबरबँड वितळले बघ." मिधतला म्हणल्या, "ए या धुळीचं शुटींग करू नको हा!"

मी हातातला अल्बम बारकाईने पाहात होते. दमयंती-विजय तांबेंचे काश्मिरातले फोटो. "ऑटोमॅटिक कॅमेऱ्याने काढले आहेत सगळे. त्यासाठी किती मेहनत करावी लागते. पंधरा-पंधरा वेळा पळून आम्ही प्रॅक्टिस करायचो आणि मग टायमिंग सेट करुन आमचा फोटो काढायचो," त्या सांगतात.

मी म्हटलं, हो मी तोच विचार करत होते की हे फोटो काढले. "आता हनिमूनला तिसरं कशाला कोणी घेऊन जाऊ आम्ही," त्या मिश्कील हसल्या.

माझ्या हातात एक फोटो दिला, आणि त्यामागे काय लिहिलं ते वाचायला सांगितलं. "हे फक्त तूच वाच आणि तुझ्याकडेच ठेव," त्या म्हणाल्या. फोटोमागे एक सुंदर, नवरा-बायकोच्या नात्याला समर्पित कविता लिहिलेली होती. विजय तांबेंनी दमयंतीसाठी लिहिलेली.

त्या सगळ्या फोटोतला एक फोटो न विसरता येण्यासारखा. पांढऱ्या साडीतल्या, कोणतेही दागिने न घातलेल्या दमयंती बाई व्हीव्ही गिरी यांच्या हातून अर्जुन पुरस्कार स्वीकारतानाचा.

हे सगळे फोटो डिजिटाईज्ड करुन घ्या, असं मिधतने म्हटल्यावर त्या म्हणाल्या, आता काय करायचं. आयुष्य तर सरत आलं, राहिलंच किती. पुढे यांचं जे होईल ते होईल.

हे असं आयुष्य जगताना कधी फ्रस्ट्रेशन नाही आलं? असं नाही वाटलं नवऱ्याची वाट पाहाणं थांबवावं, जे घडलं ते सोडून द्यावं आणि नव्याने आयुष्य सुरू करावं? मी विचारलं.

"अगं सुरूवातीची कित्येक वर्ष हेच वाटायचं की ते परत येणारच. भोळा आशावाद म्हण. पण परमेश्वराचे आभार की या आशावादाने मला तगवून ठेवलं. आणि नव्याने आयुष्य सुरु करायचं म्हणायचं तर माझं आयुष्य कुठे थांबलं होतं? माझी नोकरी चालू होती, बॅडमिंटन होतं, आणि माझा संसार विजयच्या आठवणीशी चालूच होता. माझ्या वाटेला जो दीड वर्षांचा सहवास आला तो माझ्य़ासाठी पुरेसा होता. खूप मुलांना शिकवलं, भरपूर खेळले, इतरांना ट्रेन केलं, संपूर्ण स्वावलंबी जगले. खरं म्हणशील तर मी जे केलं त्याचा मला आज अभिमान आहे," त्या उत्तरतात.

Image copyright Damyanti Tambe
प्रतिमा मथळा फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे

युद्ध संपलं तेव्हाच त्यांना परत आणण्यासाठी का प्रयत्न झाले नाहीत? मी विचारलं. "युद्ध संपलं होतं, आपण जिंकलो होतो, देशात आनंदाचं वातावरण होतं,मग त्या आनंदाच्या वातावरणात आमच्या दुःखाला कुठे जागा होती?" त्या कमालीच्या तटस्थपणे सांगतात. आवाजात जराही कडवटपणा नाही.

दमयंती बाईंनी विजय तांबेंना परत आणण्यासाठी सरकार दरबारी अनेक खेटे घातले. मुळात हे खेटे घालणं शक्य व्हावं म्हणून दिल्लीत नोकरी घेतली. इतर कुटुंब, ज्याचं कोणी ना कोणी पाकिस्तानातून परत आलं नाही, त्या परिवारांच्या संस्थेशी जोडल्या गेल्या. अनेकांना मदत केली, अनेक नकार पचवले पण डगमगल्या नाही.

"मी आहे तोवर विजयला परत आणण्यासाठी प्रयत्न करणार. मला माहीत नाही ते कुठे आहेत, कसे आहेत, आहेत की नाही. पण जर परत आले तर ते जसे असतील तसे मी त्यांना स्वीकारणार. 200 टक्के! त्यांची जागा माझ्या आयुष्यात कधी रिकामीच झाली नाही, मग पुन्हा त्यांना देऊ शकेन की नाही हा प्रश्नच नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)