लोकसभा 2019 : प्रकाश आंबेडकरांचं स्वबळ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार?

बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस सोबत त्यांची आघाडी होणार नसल्याचं मंगळवारी जाहीर केलं.

बहुजन वंचित आघाडी 15 मार्चला 48 जागांवरील उमेदवार जाहीर करणार असल्याची भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदे ते म्हणाले, "गेल्या तीन दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीची काँग्रेससोबत चर्चा सुरू होती. आम्ही ज्या 22 जागा जाहीर केल्यात त्याचं काय करायचं, हा मुद्दा होता. ते आमच्या पठडीतले नाहीत, असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यामुळे काँग्रेससोबत चर्चेचे मार्ग संपले आहेत, असं मी मानतो."

"आमची महत्त्वाची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्यघटनेच्या चौकटीमध्ये आणणे ही आहे. तसंच ज्या 22 जागा घोषित केल्या आहेत त्या मागे घेता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा, काँग्रेस पक्षाने 22 उमेदवार स्वीकारावेत, वंचित बहुजन आघाडीचा एबी फॉर्म लावण्याऐवजी काँग्रेसने आपला एबी फॉर्म लावावा, असा प्रस्ताव आम्ही दिला," असं ते पुढे म्हणाले.

महाराष्ट्रातलं राजकीय चित्र बदलतंय. बहुजन वंचित आघाडी विरुद्ध भाजप-सेना असा लढा महाराष्ट्राच्या अनेक मतदार संघात आम्ही बघतोय आणि म्हणून काही वृत्तवाहिन्यांनी आम्हाला 6 जागा दाखवल्या आहेत, असा दावा सुद्धा त्यांनी केला आहे.

22 जागा सोडणं शक्य नाही - काँग्रेस

काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी बहुजन वंचित आघाडीला 22 जागा देणं शक्य नसल्याचं म्हटलंय.

Image copyright Getty Images

ते म्हणतात "प्रकाश आंबेडकर यांनी आज ज्या पद्धतीने विचार मांडले त्याचा अर्थ त्यांची भूमिका सुरवातीपासूनच काँग्रेससोबत येण्याची नव्हती असं दिसतं. 'मनुवाद विरुद्ध संविधान' अशी लढाई आज देशात आहे. पण ते आले नाहीत, हे दुर्भाग्य आहे. बाळासाहेब इकडे नसल्याचा काँग्रेसला फारसा फटका पडणार नाही देशाला कळून चुकलंय. देशामध्ये संविधान जर वाचवायच असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लोकच स्वतःच निर्णय घेतील.

पण तरीही आम्ही उमेदवारी अर्ज भरेपर्यंत चर्चेस तयार आहोत. पण प्रकाश आंबेडकर चर्चेसाठी तयार आहेत का, यावर अवलंबून आहे, असं राऊत पुढे म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांच्या आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणा या मागणीवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, "संविधानाच्या चौकटीत संघाला आणा या मागणीला आम्ही नकार दिला नाही, त्याचा मसुदा तयार करा या भूमिकेचे आम्ही होतो. पण तुम्ही जेव्हा एखादा प्रश्न मांडता तेव्हा त्याचं उत्तर तुमच्याकडे असायला पाहिजे. संविधानाला संघाच्या चौकटीत कसं आणायचं याचं उत्तर त्यांच्याकडे असायला पाहिजे होत."

'वेगळे प्रयोग करण्याची वेळ नाही'

"बहुजन वंचित आघाडी स्वतंत्र लढल्यास मत विभाजन होईल यात शंका नाही. त्याचा फटका काँग्रेस, राष्ट्रावादी पक्षाला बसेल. त्यामुळे एकजुटीने लढायला पाहिजे अशी इच्छा राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही होती," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

Image copyright Getty Images

मलिक म्हणाले, "बहुजन वंचित आघाडीला चार जागा देऊनही ते इकडे यायला तयार नाहीत. म्हणून ते काय करू इच्छितात हे लोकांना कळते. वेगळे प्रयोग करण्याची ही वेळ नाही. आतापर्यंत त्यांनी केलेल्या प्रयोगाला त्यांना यश मिळालं नाही. हा प्रयोग जनता स्वीकारणार नाही."

'प्रकाश आंबेडकरांची मागणी अवास्तव'

याबाबत राजकीय विश्लेषक विलास आठवले यांच्याशी बीबीसी मराठीनं चर्चा केली.

त्यांच्या मते, "काही लोकांच्या हातात असलेली सत्ता सर्वांना मिळावी अशी प्रकाश आंबेडकरंची भूमिका आहे. पण राजकारणात विचारांना मतांची ताकद हवी असते ज्यामुळे सत्तेचे दरवाजे खुले होतात. या निवडणुकीत जरी वंचित बहुजन आघाडीला फारसा यश मिळत नसेल तरी एक संदेश मात्र यानिमित्ताने सगळीकडे गेला आहे. की सत्ता ही सर्वांना मिळाली पाहिजे."

Image copyright Getty Images

महाराष्ट्रात भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो. पण भविष्यत मात्र सामान्य ओबीसी आणि बहुजन यांची ऊर्जा वाढू शकते, असं आठवले यांना वाटतं.

"प्रकाश आंबेडकर यांची जागांची मागणी अवास्तव आहे, पण चर्चेने मार्ग काढता आला असता. 2014 मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला बाजूला ठेवल्याने काँग्रेस आणि राष्ट्रावादीचं नुकसान झालं होतं," याकडेही आठवले लक्ष वेधतात.

त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीचा मोठा प्रभाव दिसला नाही, तरी विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते, असं आठवले यांना वाटतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)