लोकसभा निवडणूक: सुशीलकुमार शिंदे 77व्या वर्षी मैदानात का उतरले?

सुशीलकुमार शिंदे Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गेल्या निवडणुकीमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा शरद बनसोडे यांनी पराभव केला होता.

सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार म्हणून सुशील कुमार शिंदे यांचं नाव घोषित झालं आणि राजकीय चर्चेला उधाण आलं. 77व्या वर्षी शिंदे यांना निवडणुकीत का उभं करण्यात येत आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

काँग्रेसकडे पर्यायच नाही का अशी देखील चर्चा आहे. सुशील कुमार शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे निदान काँग्रेसचं डिपॉजिट वाचू शकतं असं पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना वाटत असावं इतकी काँग्रेसची परिस्थिती भीषण आहे असं मत ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी व्यक्त केलं.

"शिंदे यांची एकेकाळी मतदारसंघावर जी पकड होती ती आता ढिली झाली आहे. त्यांचं वय पाहता सोलापूर सारख्या मोठ्या मतदारसंघाचा प्रचार ते करू शकतील का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे," असं मत जोशी यांनी व्यक्त केलं.

"2014मध्ये सुशील कुमार शिंदे यांचा पराभव शरद बनसोडे यांनी केला होता. त्या पराभवानंतर शिंदे त्यांच्या मतदारसंघात फारसे फिरलेले दिसत नाहीत. एखाद्या नवोदित लेखकाचं पुस्तक ते प्रकाशित करताना दिसतात. त्यापलीकडे त्यांचा मतदारसंघात संपर्क असल्याचे दिसत नाही," असं जोशी सांगतात.

सध्याची सोलापूर मतदारसंघातील परिस्थिती

सोलापूर लोकसभा मतदारसंघ सहा विधानसभा मतदासंघात विभागला गेला आहे. सोलापूर शहर-मध्य, सोलापूर शहर-उत्तर, सोलापूर शहर-दक्षिण, मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा हे ते मतदारसंघ आहेत.

यामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर मध्य- प्रणिती शिंदे- काँग्रेस, सोलापूर उत्तर- विजय देशमुख, भाजपा, सोलापूर दक्षिण -सुभाष देशमुख भाजपा, मोहोळ-रमेश कदम, राष्ट्रवादी, पंढरपूर मंगळवेढा - भारत भालके, काँग्रेस, अक्कलकोट- सिद्धराम म्हेत्रे, काँग्रेस यांचा विजय झाला आहे.

म्हणजेच 3 काँग्रेस, 1 राष्ट्रवादी तर भाजपाचे दोन आमदार या लोकसभा मतदारसंघात आहेत. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने सोलापूरमध्ये आपलं बळ वाढवलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे लोकसभा निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा होती.

एकेकाळी जिल्ह्याच्या सत्तेचं केंद्र असलेले सुशील कुमार शिंदे पराभूत कसे झाले असं विचारलं असता स्थानिक पत्रकार सागर सुरवसे सांगतात, "गेल्या २५ वर्षांपासून सोलापूर महापालिका काँग्रेसच्या हातात होती मात्र यावेळी महापालिकेवर भाजपाची सत्ता आली."

"काँग्रेसचे केवळ 14 नगरसेवक निवडून येऊ शकले आहेत. एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळल्यामुळे तसेच काँग्रेसमधील निष्ठावान कार्यकर्त्यांची कमतरता याचा फटका सुशीलकुमार शिंदे यांना बसला आणि ते 2014मध्ये पराभूत झाले," सुरवसे सांगतात.

सोलापूर मतदारसंघाचा इतिहास:

1952 ते 1957 पर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून शेकाप चे उमेदवार निवडून आले. तर 1962 ते 1991पर्यंत सलग काँग्रेसचे खासदार निवडून आले. त्यानंतर कोणत्याही पक्षाला सातत्य ठेवता आलेले नाही. 2014 मध्ये भाजपच्या शरद बनसोडे यांना 2 लाख 72 हजार 872 मते मिळाली होती. तर सुशीलकुमार शिंदे यांना 1 लाख 89 हजार 357 मते मिळाली आहे.

सुशीलकुमार शिंदे 1998 साली पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर 1999 मध्ये देखील दुसऱ्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले.

2003 मध्ये खासदारकीचा राजीनामा देऊन ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे प्रतापसिंह मोहिते पाटील निवडून आले. तर 2004 मध्ये सुभाष देशमुख यांना निसटता विजय मिळाला.

2004 च्या लोकसभेला सुशीलकुमार शिंदेंच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं आणि त्या 5 हजार मतांच्या फरकाने पराभूत झाल्या.

"2004 मध्ये काँग्रेसला पद्मशाली समाजातून उभा राहिलेल्या उमेदवाराचा फटका बसला. कारण पद्मशाली समाजानं त्या उमेदवाराला मतदान केलं आणि त्याचा फटका उज्ज्वला शिंदेंना बसला. काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी शह दिला," असं सुरवसे सांगतात.

2009 मध्ये सुशीलकुमार शिंदे खासदार म्हणून निवडून आले देशाचे गृहमंत्री झाले. मात्र 2014 मध्ये मोदी लाटेचा त्यांना फटका बसला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आव्हानं:

"भाजपामध्ये उमेदवार म्हणून लिंगायत समाजाचे धर्मगुरू डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी या मठाधिपती यांना तिकीट देण्याची चर्चा सुरू आहे. सोलापूर लोकसभा मतदासंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे. मठाधिपती हे दलित प्रवर्गातील आहेत. शरद बनसोडे यांच्या उमेदवारीला भाजपाच्या इतर गटातून विरोध आहे," असं ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी सांगतात.

"डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली आहे. सोलापूर उत्तर आणि दक्षिण या विधानसभेच्य़ा मतदारसंघांत भाजप मजबूत आहे. हे आव्हान शिंदेच्या समोर आहे. भाजपाने डॉ. सिद्धेश्वर महाराजांना उमेदवारी दिली तर लिंगायत समाजाची एकगठ्ठा मतं महाराजांना मिळतील असा अंदाज आहे," असं जोशी सांगतात.

भाजपकडे केवळ एकच पर्याय आहे असं नाही, तर दोन तीन नावांची चर्चा या ठिकाणी सुरू आहे असं ज्येष्ठ पत्रकार सांगतात.

"राज्यमंत्री विजय देशमुख यांचा डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांना पाठिंबा आहे तर दुसरा गट राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या नावाची शिफारस करत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार शरद बनसोडे यांनी मात्र या दोन्ही संभाव्य उमेदवारांना विरोध करत पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात," आहे असं ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसेन मुजावर सांगतात.

"लिंगायत समाज पहिल्यापासून भाजपच्या बाजूने उभा असल्याचं चित्र आहे. तर पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा हा राष्ट्रवादीचा पट्टा असून, सोलापुरातील दलित आणि मुस्लीम, धनगर काही प्रमाणात मराठा आणि ओबीसी मतांचा सुशीलकुमार शिंदे यांना फायदा होईल," असंही मुजावर म्हणाले.

Image copyright Getty Images

सुशील कुमार शिंदे यांचा अनुभव आणि कामगिरी पाहता ते पुन्हा निवडून येतील असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे.

"सुशीलकुमार शिंदे यांची राजकीय कारकीर्द समृद्ध आहे. सहावेळा ते आमदार म्हणून निवडले गेले, त्यानंतर खासदार, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय ऊर्जामंत्री, गृहमंत्री, राज्यपाल अशा अनेक पदांवर त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी केलेली असल्याने सुशीलकुमार शिंदे यांच्या मागे सोलापूरचा मतदार उभा राहील", असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केला.

प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळं मतविभागणीची शक्यता

सुशील कुमार शिंदे यांच्यासमोर फक्त भाजपचेच आव्हान आहे असं नाही. प्रकाश आंबेडकर जर या ठिकाणाहून उभे राहिले तर लढत आणखी अटीतटीची होऊ शकते असंही बोललं जात आहे.

"सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरमध्ये लोकसभा निवडणूक लढवली तर शिंदेंना मोठा फटका बसू शकतो," असं मुजावर सांगतात.

"त्यामुळे मुस्लीम-दलित मतांची विभागणी हे सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी निवडणुकीत अडथळे आणणारी ठरेल," असं मत मुजावर यांनी सांगितलं.

मात्र प्रत्यक्षात प्रकाश आंबेडकर अकोला या भारिप बहुजन महासंघाच्या बालेकिल्ल्यातून लढण्याची शक्यता अधिक आहे, असंही मुजावर सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)