अमृतसरमध्ये दोन मोठ्या आवाजांनंतर भीतीचं वातावरण

सुवर्ण मंदिर Image copyright RAVINDRA SINGH ROBIN/BBC

पंजाबमधील अमृतसर शहरात बुधवारी रात्री दीडच्या सुमारास दोन वेळा मोठे आवाज ऐकू आल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चाही सुरू आहेत.

अनेकांनी हे आवाज ऐकल्याचं सोशल मीडियावर म्हटलं आहे. तर पोलिसांनी शहरात कोणतीही अप्रिय घटना घडल्याचं वृत्त नाही, असं म्हटलं आहे.

अमृतसरचे पोलीस आयुक्त एस. एस. श्रीवास्तव बीबीसीशी बोलताना म्हणाले, "मीही हा आवाज ऐकला. आम्ही संपूर्ण शहरात चौकशी केली आहे. पण यासंदर्भात कोणतही वृत्त नाही. हा सॉनिक बूमही असू शकतो."

अमृतसरमधील सुल्तानविंड परिसरात राहाणारे गुर प्रताप सिंह टिक्का यांनी बीबीसीला माहिती दिली. ते म्हणाले, "मी हा तीव्र आवाज ऐकला. मला असं वाटलं की माझं घर हालू लागलं आहे."

सुवर्ण मंदिराजवळ राहाणारे सुमित चावला यांनी हा आवाज ऐकल्याचं बीबीसीला सांगितलं.

शहराचे पोलीस उपायुक्त शिव दुलार सिंह भुल्लर म्हणाले, "कोणत्याही अप्रिय घटनेची माहिती पोलिसांकडे नाही. लोक सोशल मीडियावर सांगत असलेल्या प्रत्येक बाबीची खातरजमा करणं शक्य नाही."

अमृतसरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त जगजीत सिंह वालिया म्हणाले, "आम्ही सुवर्ण मंदिर, सुल्तानविंड, छरहाटा, विमानतळ, रेल्वेस्टेशन अशा शहरातील सर्व भागांतून माहिती मागवली. पण कोणतीही घटना घडल्याची बातमी मिळालेली नाही."

पोलिसांच्या तातडीच्या सेवेसाठी असलेल्या दूरध्वनी क्रमांकावरही कोणत्याही घटनेची नोंद झालेली नाही.

असं जरी असलं तरी सोशल मीडियावर लोकांनी दोन आवाज ऐकल्याचं लिहिलं आहे.

भारत-पाकिस्तान तणाव

अमृतसर भारत-पाकिस्तान सीमेपासून जवळ असलेलं महत्त्वाचं शहर आहे. बालाकोट इथल्या हवाई कारवाईनंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. या आवाजाचा संबंध लोकांनी या तणावाशीही जोडला होता.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने सियालकोटमध्ये सैनिकी कारवाई केल्याची बातमी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती. ती खोटी असल्याचं नंतर सिद्ध झालं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या