CSMT दुर्घटना : 'एल्फिन्सटन' चेंगराचेंगरीनंतर मुंबईत खरंच काही बदललं का?

CSMT Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा CSMT इथं पादचारी पूल कोसळल्याने जीवितहानी झाली.

मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. कधीही न थांबणाऱ्या या शहरात स्वप्नांचा कधी चुराडा होईल आणि मुंबईने दाखवलेली स्वप्नं कधी दुःस्वप्नात बदलतील हे कुणीच सांगू शकत नाही. काल CSMT जवळ कोसळलेल्या पादचारी पुलाने 5 जणांचे बळी घेतले. रेल्वे क्राँसिंग आणि स्टेशनवरील पुलांचं काम युद्ध पातळीवर सुरू असलं तरी CSMTची दुर्घटना हा निष्काळजीपणा होता आणि तो टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

कट्टरवाद्यांचे हल्ले, बाँबस्फोट, आगी, अपघात, पूर असे किती तरी आघात सोसत दररोज घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांनी CSMTच्या निमित्ताने अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

मुंबईत आगी लागणे, इमारती आणि पादचारी पूल कोसळणे अशा आपत्तींमध्ये गेल्या काही वर्षांत सतत वाढ होत असल्याचे चित्र पुढं येत आहे. या मालिकेतील सुन्न करणारी घटना होती ती म्हणजे 'एल्फिन्सटन पूल' दुर्घटना.

या अपघाताने मुंबईच पुरती हादरून गेली. 23 बळी घेणाऱ्या या घटनेनंतर खरंच काही बदललं का, चौकशी होण्यापलीकडं काही झालं का?, व्यवस्था म्हणून खरोखर काही बदल झाले का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. यातील काही ठळक घटनांवर जरी नजर टाकली तर मुंबईचं अस्वस्थ करणारं चित्र डोळ्यांसमोर उभं राहातं.

1. 'एल्फिन्सटन' दुर्घटना : 23 जणांचे हकनाक बळी

29 सप्टेंबर 2017ला या एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा बळी गेला. या घटनेनंतर मुंबईतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं. त्यानंतर इथं लष्काराच्या मदतीनं नवीन पूल बांधण्यात आला.

नंतर स्टेशनचं नाव बदलून नंतर प्रभादेवी करण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इथल्या परप्रांतीय फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलनही केलं होतं. ही घटना पाऊस, गर्दी आणि अफवांमुळे घडल्याचा निष्कर्ष चौकशी अहवालात काढण्यात आला होता. या दुर्घटनेनंतर परळ येथे टर्मिनस उभारण्यात आलं असून नुकतंच या टर्मिनसचं उद्गाटन करण्यात आलं आहे.

2. साकीनाका फरसाण फॅक्टरी - 12 ठार

'एल्फिन्स्टन दुर्घटना होऊन काही आठवडे उलटले नसतील तोपर्यंत 18 डिसेंबर 2017ला साकीनाका इथं एका फरसाण कारखान्याला आग लागून 12 कामगारांचा बळी गेला. या आगीची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले.

3. कमला मिल हॉटेल आग - 14 ठार

'एल्फिन्सटन' चेंगराचेंगरी आणि साकीनाका इथली आग अशा दोन मोठ्या घटनांतून सावरणाऱ्या मुंबईकरांना आणखी एक धक्का बसला तो 29 डिसेंबर 2017ला. या दिवशी लोअर परळ इथल्या कमला मिल कंपाऊंडमधील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांना प्राण गमवावे लागले.

Image copyright AMOL RODE

या आगीनंतर 5 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

4. अंधेरीत पूल कोसळला : 5 जखमी

अंधेरील पूल कोसळण्याची घटना 3 जुलै 2018ला घडली होती. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. पण य घटनेनं पुलांच्या स्थितीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले.

5. क्रिस्टल टॉवर आग - 4 बळी

22 ऑगस्ट 2018ला हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवर या इमारतीला लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला होता.

6. अंधेरीतील ESIC हॉस्पिटलच्या आगीत 8 बळी

अंधेरी इथल्या ESIC कामगार हॉस्पिटलला मोठी आग लागण्याची घटना 18 डिसेंबर 2018ला घडली. यामध्ये 8 जणांचा बळी गेला होता.

Image copyright Getty Images

7. इमारत कोसळून 3 ठार

23 डिसेंबर 2018ला गोरेगाव पश्चिम भागात मोतीलाल नगरमधील म्हाडाच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून 3 लोक मृत्युमुखी पडले होते. यावेळीही चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

8. टिळकनगर आग - 4 बळी

28 डिसेंबर 2018ला टिळकनगर इथल्या सरगम सोसायटीमध्ये भीषण आग लागली होती. या घटनेत 5 जणांचा बळी गेला.

मुंबईतील सातत्याने घडणाऱ्या दुर्घटनांतील ही काही ठळक उदाहरणं आहेत. या घटनांतून मुंबईतील वाढती असुरक्षितता अधोरेखित होते, असं या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ सांगतात.

हा प्रकार निष्काळजीपणा : खासदार शेवाळे

'एल्फिन्स्टन' घटनेनंतर रेल्वे क्रॉसिंग आणि स्टेशनवरील पुलांची काम युद्धपातळीवर सुरू आहेत. एल्फिन्स्टननंतर काहीच बदल झाले नाहीत, ही टीका रास्त नाही, असं ते म्हणाले. मात्र CSMTजवळील कालची घटना मात्र निव्वळ निष्काळजीपणामुळे घडली असं ते म्हणाले. "हा पूल रोड क्रॉसिंगसाठी आहे. याची योग्य ती देखभाल दुरुस्तीवेळेवर व्हायला हवी होती. ही घटना टळली असती. याला अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे," असं ते म्हणाले. Mumbai Urban Transport Project 3A (MUTP)अंतर्गत एकूण 33 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, असं ते म्हणाले.

'जनतेचा पैसा जातो कुठं?'

सप्टेंबर 2017पासून मुंबईतील पुलांसंदर्भात हा तिसरा मोठा अपघात असल्याचं समीर झवेरी यांनी सांगितंल. झवेरी रेल्वेसंदर्भातील समस्यांवर काम करतात. ते म्हणाले, "लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकार त्यांच्या नातेवाईकांना मदत करत. हाच पैसा आधी खर्च केला असता तर हे हकनाक बळी गेले नसते. बीएमसी आणि रेल्वे सातत्याने स्ट्रक्चरल ऑडिट करत असेल तर अशा घटना कशा काय घडतात हा प्रश्न आहे. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतरही सर्व पुलांच्या स्ट्रक्टरल ऑडिटचे आदेश दिले होते. अशा घटना घडतात चार दिवस चर्चा होते, आणि नंतर सगळं विस्मृतीत जातं. नवीन घटना घडली की काही दिवस पुन्हा चर्चा होतात."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा CSMT इथं पादचारी पूल कोसळल्यानंतर बचावकार्य करताना...

मिलिंद देवरा यांनी या अनुषंगान ट्वीट केलं आहे. ते म्हणतात, "एल्फिन्सटन दुर्घटनेनंतर आणखी एक घटना घडली आहे. 6 महिन्यांपूर्वी ज्या पुलाचं स्ट्रक्टचरल ऑडिट झालं होतं, तो पूल कसा काय कोसळू शकतो?"

'पारदर्शी व्यवस्था उभी करावी'

मुंबईतील वाहतूक संदर्भांतील विषयांचे तज्ज्ञ अशोक दातार म्हणतात, "अशा घटना घडल्या की एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे प्रकार घडतात. हे थांबण्याची गरज आहे, त्यासाठी एक व्यवस्था उभी करावी लागेल. मुंबईतील फ्लायओव्हर, पादचारी पूल इत्यादी सेवा, पायाभूत सुविधा कुणाच्या मालकीच्या आहेत, त्यांची देखभाल दुरुस्ती कोण करतं याचा डेटाबेस बनवला पाहिजे आणि तो पारदर्शकपणे लोकांसाठी उपलब्ध असला पाहिजे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)