प्रकाश आंबेडकर: 'लढाई जातीअंतासाठी आहे तर उमेदवारांच्या नावासमोर जात कशासाठी?'

प्रकाश आंबेडकर Image copyright facebook@officialPrakashambedkar

बहुजन वंचित आघाडीने आपल्या 37 उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवाराच्या नावासमोर जातींचा उल्लेख करण्यात आला आहे. तुमचा लढा हा जातीअंतासाठी आहे तर उमेदवारांच्या नावासमोर जातींचा उल्लेख कशासाठी केला असा प्रश्न विचारला जात आहे.

या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी बीबीसीनं बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत घेतली तेव्हा ते म्हणाले,

"याआधी मराठ्यांशिवाय इतर कुणाला उमेदवारी दिलीच जायची नाही. म्हणून ते जाहीर करण्याची वेळच येत नसे. हे गृहितच धरलं जायचं की उमेदवार मराठाच आहे."

वंचित आघाडीने जी यादी जाहीर केली त्यात धनगर, कुणबी, भिल्ल, बौद्ध, कोळी, वडार, लोहार, वारली, बंजारा, मुस्लीम, माळी, कैकाडी, धिवर, मातंग, आगरी, शिंपी, लिंगायत, आणि मराठा अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे.

निरनिराळ्या समाजातील लोकांना उमेदवारीची संधी देण्यात आली असल्याचं आंबेडकर सांगतात. ही नवी पद्धत असून याने राजकारणाची दिशा बदलू शकते असं आंबेडकर यांना वाटतं.

ते सांगतात, "आज आम्ही जात जाहीर केली कारण ही प्रणाली कोणताही पक्ष स्वीकारत नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस हे लोक मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली."

"आमचं असं आहे की आम्ही एकदा निवडणूक जिंकलो की पुढे ते फक्त एक राजकीय कार्यकर्ता म्हणूनच काम करतील. आज आम्ही त्यांना फक्त कार्यकर्ता म्हणूनच तिकिट दिलं आहे. ही जातीअंताच्या लढाईचीच सुरुवात आहे," आंबेडकर सांगतात.

जातीय अस्मिता कमी व्हायला हवी

जातीअंतासाठी जातीय अस्मिता कमी व्हावी असं आंबेडकरांना वाटतं. आणि त्यासाठी समाजाची पुनर्रचना होणं आवश्यक असल्याचं ते सांगतात.

"जातीबद्दलची जी अस्मिता किंवा जाणीव असते ती जोपर्यंत आपण कमी करत जात नाही तोपर्यंत ती कमी होत नाही. जर ही अस्मिता आपल्याला कमी करायची असेल तर सर्व समाजातील लोकांना राजकारणात संधी देऊन या व्यवस्थेची पुनर्मांडणी होणं आवश्यक आहे आणि आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला आहे."

ब्राह्मण, मारवाडी, जैन उमेदवार का नाहीत?

या यादीत ब्राह्मण, कोमटी, जैन आणि मारवाडी यांचा समावेश का नाही? असं विचारलं असता आंबेडकर म्हणाले की "जैन आणि मारवाडी समाज हा भाजपबरोबर आहे. त्यामुळे आम्ही त्यांना गृहीत धरलं नाही. जर त्यांना वाटत असेल आमच्याकडे यावं तर खुल्या मनाने त्यांनी आमच्याकडे यावं."

"ब्राह्मण आणि कोमटी समाजातून कुणी आमच्याकडे उमेदवारी मागितली नाही. आम्हाला या समाजातून माणसंच मिळाली नाहीत," असं आंबेडकर म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)