पराभवाचा अंदाज आल्यानेच शरद पवारांची माघार - नितीन गडकरी #5मोठ्याबातम्या

नितीन गडकरी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नितीन गडकरी

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. पराभवाचा अंदाज आल्यानेच शरद पवारांची माघार-नितीन गडकरी

"शरद पवारांना पराभवाचा अंदाज आल्यानेच त्यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे," असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

राज ठाकरे यांच्याबद्दलही नितीन गडकरी यांनी मतं व्यक्त केली आहेत.

"राज ठाकरे माझे कालही मित्र होते आणि आजही आहेत. मात्र सध्या ते असं का वागत आहेत? मला सांगता येत नाही. एअर स्ट्राईकचं राजकारण आम्ही केलं नाही आणि करणारही नाही. रफाल विमान असते, तर एअरस्ट्राईक दुरून करता आले असते. दीडशे किलोमीटर दुरून अतिरेक्यांच्या ठिकाणावर वार करता आला असता," असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

"मी फारसा राजकारणी नाही. दुसऱ्या राजकीय पक्षातही माझे मित्र आहेत. माझ्या व्यक्तिमत्वावर संघाचा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पगडा आहे. मला घराची ओढ लागली आहे, आता नातवंडांची आठवण येते. शेतकऱ्यांसाठी मला काम करायचं, ज्या दिवशी विदर्भातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, त्या दिवशी माझं स्वप्न पूर्ण होईल," असंही गडकरींनी म्हटलं आहे.

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे भाऊ - उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी तर मोठे भाऊ वाटावे असंच व्यक्तिमत्व आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

"शिवसेना व भाजपमध्ये सत्तेत आल्यानंतर अनेक वाद झाले. दोन्ही पक्षातून मनात नसतानाही म्यानातील तलवारी काढण्यात आल्या. आता मनातील व म्यानातील तलवारी ठेवण्यात आल्या आहेत. युतीचा वाद संपुष्टात आला असून एकदिलाने लढायचे आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अमरावतीतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उद्धव ठाकरे

दरम्यान, मुंबईतील पूल दुर्घटनेतील पीडितांना न भेटता राजकीय प्रचाराला गेल्यामुळे ठाकरे यांच्यावर टीका होत आहे.

"मुंबई महापालिकेत दोन दशकांहून अधिक सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करायला आणि जखमींची विचारपूस करायला वेळ नाही," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी मात्र विरोधकांची टीका म्हणजे निव्वळ कांगावा असल्याचे म्हटलं आहे.

"दुर्घटना घडल्यानंतर शिवसेनेचे स्थानिक खासदार अरविंद सावंत, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी सर्व नेते मंडळी घटनास्थळी, रुग्णालयात पोहोचली. जखमींना वेळेत चांगले उपचार मिळावेत याकडे त्यांनी लक्ष ठेवले," असं त्यांनी म्हटलं.

3. महाराष्ट्रातील मोठी घराणी भाजपच्या संपर्कात - चंद्रकांत पाटील

"महाराष्ट्रातील मोठ-मोठी राजकीय घराणी भाजपच्या संपर्कात आहेत. रोज एक-एक घराणे भाजपसोबत येईल," असं मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ईनाडू इंडिया मराठीनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

"येत्या २ दिवसात उत्तर महाराष्ट्रातील काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत," असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

4. गेल्या 3 वर्षांमध्ये गंगेचं पाणी अधिक प्रदूषित झालं - अहवाल

गंगेच्या पाण्यात कॉलिफॉर्म आणि बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडमध्ये (बीओडी) वाढ झाल्यामुळे गंगेचं पाणी गेल्या 3 वर्षांत अधिक प्रदूषित झालं आहे, असा अहवाल वाराणसीतल्या संकट मोचन फाउंडेशननं (एसएमएफ) जारी केला आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीला स्वच्छ करण्यासाठी मे 2015मध्ये 'नमामि गंगे' योजनेला सुरुवात केली होती. यासाठी त्यांनी 2019पर्यंतच टार्गेट निश्चित केलं होतं. गेल्या वर्षी नितीन गडकरी यांनी ही मर्यादा 2020पर्यंत वाढवली.

एसएमएफ ही संस्था 1986पासून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुरू केलेल्या गंगा अक्शन प्लॅनअंतर्गत गंगेच्या पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवत आहे.

"गंगेच्या पाण्यात जिवाणूंमुळे होणाऱ्या प्रदूषणात वाढ झाली आहे. जानेवारी 2016 ते फेब्रुवारी 2019 दरम्यान बीओडीचा स्तर 46.8-54 मिलीग्राम प्रति लीटर वाढत 66-78 मिलीग्रॅम प्रति लीटर झाला आहे. याच कालावधीत डिसॉल्वड ऑक्सीजनचा (डीओ) स्तर 2.4 मिलीग्राम प्रति लीटर पासून कमी होत 1.4 मिलीग्राम प्रति लीटर राहिला आहे. याला प्रति लीटर 6 मिलीग्राम अथवा त्याहून अधिक असायला हवं. गंगेच्या पाण्यात कॉलीफॉर्म बॅक्टीरियाचं अधिक प्रमाण मानवी आरोग्यासाठी चिंतेची बाब आहे," असं संस्थेचे अध्यक्ष वी.एन मिश्रा यांनी म्हटलं आहे.

5. महाराष्ट्रात 1 कोटी 19 लाख तरुण प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क

राज्यातील 1 कोटी 19 लाख 95 हजार 27 तरूण मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती पुढे आली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

महाराष्ट्रात मतदारांची एकूण संख्या 8 कोटी 73 लाख 29 हजार 910 आहे.

राज्यात 18 ते 19 वर्ष वयोगटात अर्थात प्रथमच मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या तरुणांची संख्या 1 कोटी 19 लाख95 हजार 27 आहे. हे तरुण प्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

देशात 18 ते 19 वर्ष वयोगटातील मतदारांची एकूण संख्या 15कोटी 6लाख 4हजार 824 आहे, असंही बातमीत म्हटलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)