लोकसभा निवडणूक 2019 : प्रियंका गांधींची गंगा यात्रा काँग्रेसचं नशीब बदलवणार?

प्रियंका गांधी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रियंका गांधी

काँग्रेस सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी निवडणूक प्रचाराची सुरुवात प्रयागराज म्हणजे अलाहाबादमधून करणार आहेत.

त्या 18 ते 20 मार्च दरम्यान प्रयागरागपासून वाराणसीपर्यंत गंगा नदी मार्गातून यात्रा करतील. यादरम्यान त्यांचे इतरही कार्यक्रमही होतील.

प्रियंका गांधींच्या या दौऱ्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. तसंच या दौऱ्याला काही सांस्कृतिक संदर्भही आहेत.

प्रयागराजमध्ये यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम आहे. नेहरू-गांधी कुटुंबाच्या वारशाची गोष्ट हे शहर सांगतं. पण गेल्या काही वर्षांपासून इथे काँग्रेसची पकड कमकुवत झाली आहे.

प्रियंका गांधींनी फुलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे.

दुसरीकडे गेल्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीतून नरेंद्र मोदी विजयी झाले आहेत. नरेंद्र मोदींना टक्कर देता येईल अशापद्धतीनं मीडिया आणि लोकांमध्ये उत्सुकता जागृत करण्याची क्षमता प्रियंका गांधी यांच्यामध्येच आहे, असं काँग्रेस नेत्यांना वाटतं.

प्रियंका यांच्या या दौऱ्याचं काटेकोरपणे नियोजन करण्याचं हेच मुख्य कारण आहे. या दौऱ्यात गंगा, प्रयागराज आणि वाराणसी यांचा समावेश आहे. अशाच पद्धतीच्या सांस्कृतिक प्रतीकांचा वापर करून भाजप गेल्या काही वर्षांपासून भावनात्मक संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रियंका यांच्या माध्यमातून या आघाडीवर काँग्रेस भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे.

Image copyright Reuters

उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीनं निवडणूक आयोगाला पत्र लिहून प्रियंका गांधींच्या प्रयागराजपासून वाराणसीपर्यंत नदीमार्गानं मोटारबोटच्या साहाय्यानं यात्रा करण्याची परवानगी मागितली होती.

उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रवक्ते झिशान हैदर यांनी बीबीसीला सांगितलं, "प्रियंका गांधी 3 दिवसांच्या यात्रेत 140 किलोमीटरचा प्रवास करतील. यादरम्यान त्या वेगवेगळे कार्यकर्ते आणि समाजातल्या वेगवेगळ्या समुहातील लोकांशी चर्चा करतील."

यात्रेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 20 मार्चला वाराणसीच्या अस्सी घाटावर एका स्वागत समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीला निघण्यापूर्वी त्या काशी विश्वनाथचं दर्शनंही घेणार आहेत.

Image copyright Reuters

प्रियंका संगम तटावरून 18 मार्चला यात्रेला सुरुवात करतील. यादरम्यान त्या मार्गातील मंदिर आणि मशिदींमध्येही जातील, असं प्रदेश काँग्रेस कमिटीनं जारी केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत म्हटलं आहे.

प्रियंका सामाजिक संस्था यांना भेटी देतील. याशिवाय त्या धार्मिक स्थळांनाही भेट देईल. यादरम्यान अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

सरचिटणीसपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर 11 फेब्रुवारीला प्रियंका गांधी लखनऊला आल्या होत्या. तेथे रोड शो झाल्यानंतर त्यांनी 4 दिवस कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी पहिली पत्रकार परिषद रद्द केली होती. त्यानंतर आता त्यांच्या निवडणूक प्रचाराचा कार्यक्रम तयार आहे.

Image copyright RIYAZ HASHMI

त्यानंतर प्रियंका गांधी माध्यमांपासून दूर राहिल्या. मंगळवारी काँग्रेसच्या अहमदाबाद इथल्या कार्यकारिणीत त्यांनी भाग घेतला आणि त्या पुन्हा सक्रिया झाल्या.

त्या दिवशी झालेल्या रॅलीमध्ये प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर त्यांचा उल्लेख न करता जोरदार टीका केली. प्रियंकांचं हे भाषण फक्त 7 मिनिटांचं होतं. पण ते टीव्ही चॅनलवर वारंवार दाखवण्यात आलं.

त्यानंतर प्रियंका गांधी मेरठमध्ये गेल्या. तिथं त्यांनी भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर रावण यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय हालचालींना वेग आला. त्यानंतर प्रियंका गांधी प्रचारासाठी नवी तंत्र अवलंबतील असं दिसतं.

Image copyright AFP/GETTY IMAGES

असं सांगितलं जातं की, कुंभमेळ्यात राहुल गांधी आणि प्रियंका संगम स्नानासाठी जाणार होते. पण त्यांचा कार्यक्रम ठरू शकला नाही. पण ही शक्यता मात्र आहे की प्रियंका त्यांचा प्रचार प्रयागराज येथून करतील. प्रयागराज गांधी-नेहरू कुटुंबाचं मूळ गाव आहे आणि काँग्रेसच्या राजकारणाचा एकेकाळी गड ही होता.

प्रचारासाठी जलमार्गाचा वापर होण्याची ही पाहिलीच वेळ आहे.

प्रियंका गांधीचा हा प्रचार त्यांना चर्चेच्या केंद्रस्थानी आणेल, असं जाणकारांना वाटतं. नदीच्या काठी स्थायिक असलेल्या काही पांरपरिक समाजघटकांनाही त्या भेटू शकणार आहेत. निषाद आणि मल्लाह अशा मागास जातीजमातींचे लोक मोठ्या संख्येने नदी काठी राहतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)