मनोहर पर्रिकर: 'ज्यांनी आशेचा किरण दाखवला, त्यांनीच तो हिरावून नेला'

मनोहर पर्रिकर Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मनोहर पर्रिकर

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर त्यांच्या सहृदयानं जागवलेल्या या आठवणी.

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानं गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक परिघावर मोठा परिणाम होणार आहे. IITमधून उत्तीर्ण झालेले ते देशातील पहिले मुख्यमंत्री होते. प्रशासन आणि सुसंवाद यासाठी त्यांनी दिलेलं योगदान कधी विसरता येणार नाही.

'सॉफ्ट हिंदुत्वा'चा पुरस्कर्ता अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्याला प्राधान्य देणारे भाजपचे कदाचित देशातील पहिले राजकारणी असतील. त्यांनी गोव्यात धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी राजकारणाला पसंती दिली. पर्रिकरांना उत्तर प्रदेशसारख्या राज्यात राजकारण करायचं असतं तर ते असेच उदारमतवादी राजकारणी राहिले असते का? असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही.

सत्ता सगळ्यांमध्ये बदल घडवून आणते. त्यांच्या पक्षाचा पाठिंबा असलेलं सरकार जेव्हा उलथवण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्यासाठी सत्तेचा मार्ग पुन्हा मोकळा झाला. यावेळी त्यांनी स्वत:ला एक प्रामाणिक आणि धार्मिक नेता म्हणून स्वत:ला सादर केलं.

अस्थिरता आणि भ्रष्टाचाराच्या गर्तेत गेलेल्या राज्याला पूर्वपदावर आणण्याचं उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर होतं. लोकांनी पक्षावरील विश्वास गमावला तेव्हा पर्रिकरांनी प्रामाणिकपणाने जनतेत जीव ओतण्याचं काम केलं. मध्यवर्गीय आणि संरक्षित मतदारांची त्यांनी मनं जिंकली. पर्रिकर या वर्गाचे हिरो झाले होते.

त्यांच्या स्वत:च्या पक्षात त्यांना आव्हान देणारं कुणी नव्हतं ही त्यांच्याविषयीची आणखी एक महत्त्वाची बाब होती. गोवा विधानसभेत भाजपच्या तिकिटावर निवडून गेलेल्या पहिल्या 4 आमदारांपैकी ते एक होते. त्यांचं साहसी व्यक्तिमत्व आणि IITचा अनुभव यामुळे त्यांची देशात एक वेगळीच छाप पडली.

भाजपमधील कट्टर आवाजांना त्यांनी गोव्यापासून दूर ठेवणं पसंत केलं. त्यांनी स्वत:ची प्रतिमा अति-उजव्या विचारसरणीचा व्यक्ती अशी होऊ दिली नाही. "हे गोव्यातील भाजप आहे आणि इथे गोष्टी वेगळ्या पद्धतीनं होतात," असं ते नेहमी म्हणायचे.

पर्रिकर यांनीच मोदींचं नाव पंतप्रधानपदासाठी सुचवलं

असं असलं तरी, 2014च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींच्या नावाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोव्यातल्या एका बैठकीत ते म्हणाले होते, "पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी हे भाजपसाठी सर्वांत चांगला पर्याय आहे." दुसऱ्या दिवशी मी त्यांना भेटलो, तेव्हा ते म्हणाले, "कसंय ना काही गोष्टी बोलाव्या लागतात आणि त्याचं टायमिंग उत्तम असावं लागतं."

असामान्य राजकारणी

पर्रिकर एक असामान्य राजकारणी होते अथवा राजकीय अभियंता होते. त्यांच्या कार्यकाळात राजकारणातील सर्वांत विसंगत आवाजांना एकत्रित आणण्याचं काम पर्रिकरांनी केलं. मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अशी युक्ती योजली. पण यात ते अपयशी ठरले.

त्यांचं सरकार पडलं. ज्या लोकांना त्यांनी विश्वासाच्या आधारे स्वत:च्या पक्षात आयात केलं होतं, त्यांनी पर्रिकरांना पाठ दाखवली. पर्रिकरांचं शासन अथवा दुरदृष्टीवर या लोकांना काही एक निष्ठा नव्हती. ते स्वत:च्या फायद्यासाठी आले होते आणि स्वत:च्या फायद्यासाठीच त्यांनी पर्रिकरांना खाली ओढलं.

Image copyright Getty Images

विजय आणि पराजय

पाच वर्ष विरोधी पक्ष म्हणून काम केल्यानंतर, 2012च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं गोव्यात एकहाती सत्ता मिळवली. निकालाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना भेटायला गेलो होतो. पणजी इथल्या Hotel Mandoviमध्ये ते आराम करत होते. टेबलवर चॉकलेट केक ठेवलेला होता. त्यांनी मला केक ऑफर केला आणि आमची चर्चा सुरू झाली.

"तुम्ही 7 वर्षं या क्षणाची वाट पाहिलीत आणि शेवटी तुम्ही ते करून दाखवलं," असं मी त्यांचं अभिनंदन करताना म्हणालो. "सुरुवातीला मी उतावीळपणा केला. मी सरकार उलथवण्याचा प्रयत्न करायला नको होता. त्यानंतर राज्याचं रूपांतर प्रेशर कुकरमध्ये होत असल्याचं माझ्या लक्षात आलं. प्रेशर कुकरचा स्फोट होईपर्यंत मी वाट बघण्याचं ठरवलं आणि त्यानंतर विधानसभेच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही पातळ्यांवर कामाला सुरुवात केली."

त्याच रात्री मला एका अनुभवी काँग्रेस नेत्याचा फोन आला. "जर त्यांनी (पर्रिकरांनी) दिलेल्या आश्वासनांपैकी अर्धी जरी पूर्ण केली, तरी पुढचे 15 वर्षं त्यांना रोखणं शक्य नाही,"

आश्वासनं पूर्ण करण्यात अपयश

पुढची 5 वर्षं शिकवणीची होती. एखादी मोहीम कशी सुरू करायची, सत्तेत कसं यायचं आणि कसं तग धरून राहायचं, ही शिकवण.

पर्रिकरांच्या लोकानुनयानं राज्यावरील कर्जाची रक्कम तिपटीनं वाढलं. जी आश्वासनं पूर्ण करण्यासाठी पर्रीकरांना बहुमत दिलं होतं ती पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची सूत्रे हाती घेण्यासाठी आमंत्रित केलं तेव्हा ते द्विधा मनस्थितीत होते.

Image copyright Twitter

दिल्लीत राहण्यास उत्सुक नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्रिकर यांच्यात विश्वासू सहकारी दिसत होता. म्हणूनच मोदींनी पर्रिकरांना दिल्लीत येण्याचं निमंत्रण दिलं. मात्र पर्रिकरांना दिल्लीत नेहमीच उपऱ्यासारखं वाटलं. त्यांना संरक्षण मंत्रीपदी बढती देण्यात आली. मात्र ते या जबाबदारीसाठी उत्सुक नव्हते. म्हणूनच गोव्यात येण्याची पहिली संधी मिळतात त्यांनी त्यादिशेने कूच केलं.

संरक्षण मंत्री म्हणून सुरुवातीच्या काळात त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक झालं. मात्र त्यांच्याच कार्यकाळात वादग्रस्त रफाल करारावर औपचारिकदृष्ट्या शिक्कामोर्तब झालं. उरी सर्जिकल स्ट्राईकनंतरही पर्रिकर राजधानी दिल्लीत स्थिरावले नाहीत. दिल्लीच्या राजकारणाचा कठोर पिंड त्यांना मानवला नाही. कदाचित त्यामुळे त्यांनी गोव्यात परत येणं पसंत केलं.

रफाल कराराच्या फाईल्स पर्रिकर यांच्या घरात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. पर्रिकर यांनी हे आरोप फेटाळले. रफालप्रकरणी कोणत्याही गैरप्रकारात पर्रिकर यांचा सहभाग सिद्ध झालेला नाही. मात्र रफाल प्रकरणाचा तपास पर्रिकर यांच्या निधनानंतरही सुरूच राहणार आहे.

कामात संयम

यानंतर 2017मध्ये भाजपचा गोव्यातील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. तरीही पर्रिकरांनी एक अनपेक्षित पाऊल उचलत लोकांच्या मताविरुद्ध जात काही पक्षांसोबत आघाडी करून सरकार स्थापन केलं. यातल्या त्यांच्या सर्व सहकारी पक्षांनी भाजपविरोधी प्रचार करून ही निवडणूक जिंकली होती. यामार्गानं सत्ता काबीज करण्यात ते यशस्वी झाले असले तरी केडर आणि साथीदार मात्र गमावून बसले.

व्यक्तिमत्त्वात विरोधाभास

ते मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. त्यांच्या चारही कार्यकाळातलं हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. यावेळी मात्र आयुष्यानेच त्यांची साथ दिली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ते मुख्यमंत्रीपदी का होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांची प्रकृती टप्प्याटप्याने ढासळत गेली. आयुष्यातले शेवटचे क्षण त्यांना शांतपणे व्यतीत करू का देण्यात आले नाहीत? अशक्त, कृश अशा स्थितीत ते सार्वजनिक ठिकाणी का उपस्थित राहिले? सक्षम उत्तराधिकाऱ्याकडे त्यांनी राज्याचा कारभार का सोपवला नाही, जो गोवा राज्याचं भलं करू शकला असता.

त्यांच्या पक्षाची राज्यात शकलं झाली आणि नेमक्या याच वेळी ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले.

ज्या व्यक्तीने गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणला, गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यापासून पायाभूत सुविधांशी निगडीत अनेक प्रकल्प उभारले, अशा व्यक्तीची एक वेगळी ओळख निर्माण व्हायला हवी होती.

Image copyright Mint/GETTY Images

मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही राजकारणात सक्रिय राहायला आवडेल असं त्यांनी मला 2012 दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र प्रकृती खालावलेली असतानाही ते शेवटपर्यंत सक्रिय होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात विरोधाभास होता. ज्या व्यक्तीने गोव्याला आशेचा किरण दाखवला, त्यानेच तो हिरावून नेला. अलविदा पर्रिकर साहेब, तुमची उणीव सतत भासत राहील.

(लेखक हे प्रुडंट न्यूजचे संपादक आहेत. या लेखातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)