गोवा: मनोहर पर्रिकरांचे सरकार बरखास्त करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

मनोहर पर्रिकर Image copyright Getty Images

गोव्यामध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं सरकार बरखास्त करून सत्ता स्थापनेसाठी आपल्याला संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसने गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहून केली आहे.

गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते चंद्रकात कवळेकर यांनी आज सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र राज्यपालांकडे दिलं आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपाचे सदस्य फ्रान्सीस डिसूझा यांचे निधन झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे विधानसभेतील बळ कमी झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्यातील लोकांचा विश्वास गमावला आहे, आगामी काळात भाजपची सदस्यसंख्या आणखी कमी होईल असे सांगत अशा अल्पमतातील भाजपाला सरकार चालवण्यास परवानगी देऊ नये असे कवळेकर यांनी या पत्रात म्हटले आहे.

आपला काँग्रेस पक्ष विधानसभेतील सर्वांत मोठा पक्ष असल्याचे सांगत कवळेकर यांनी आम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी न बोलावणे किंवा राष्ट्रपती शासन लागू न करणे हे घटनादत्त जनादेशाचा अवमान केल्यासारखे होईल असं म्हटलं आहे.

या प्रकारचा प्रयत्न झाल्यास काँग्रेस त्या निर्णयाला आव्हान देईल असेही कवळेकर यांनी या पत्रात म्हटले आहे.

याबरोबरच राज्यपालांनी भाजप सरकार बरखास्त करून आम्हाला सत्ता स्थापनेसाठी बोलवावे अशी त्यांनी विनंती केली आहे.

गोवा विधानसभेसाठी 2017 साली निवडणूक झाली. त्यामध्ये काँग्रेसला 17 जागांवर विजय मिळाला. विधानसभेमध्ये सर्वांत मोठा पक्ष असूनही काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 3, गोवा फॉरवर्ड पार्टीचे 3 आणि 3 अपक्षांच्या मदतीने भाजपाने सत्ता स्थापन केली. संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा देऊन पर्रिकर यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मनोहर पर्रिकर

विधानसभा स्थापन झाल्यावर काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेले विश्वजित राणे यांनी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि ते पोटनिवडणुकीत पुन्हा विजयी झाले.

त्यानंतर गेल्या वर्षी सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे आता शिरोडा आणि मांद्रे मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्याचप्रमाणे डिसूझा यांच्या निधनामुळे म्हापसा मतदारसंघातही निवडणूक होणार आहे.

पोटनिवडणुकांमध्ये ठरणार भाजपाची दिशा

भारतीय जनता पार्टीला आता गोव्यामध्ये लोकसभेबरोबर पोटनिवडणुकांचीही परिक्षा द्यावी लागणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त लक्ष मांद्रे विधानसभा मतदारसंघाकडे आहे. या विधानसभेमध्ये भाजपातर्फे दयानंद सोपटे उमेदवार आहेत.

मांद्रे विधानसभा मतदारसंघ

येथे दयानंद सोपटे यांनी 2017 साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून भाजपाचे तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पराभूत केले होते. या मतदारसंघात लक्ष्मीकांत पार्सेकर सलग चारवेळा विजयी झाले होते हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. सोपटे यांच्याविरोधात पार्सेकर यांनी आपण अपक्ष निवडणूक लढवू अशी घोषणा केली. मात्र पार्सेकर यांची समजूत काढण्यात भाजपाला यश आल्याचे सांगण्यात येते. पण प्रुडंट मीडियाचे संपादक प्रमोद आचार्य यांच्या मते, "याबाबतीत कोणताही अंतिम निर्णय समजू नये. या मतदारसंघाबाबत अजूनही घडामोडी घडत आहेत."

शिरोडा विधानसभा मतदारसंघ

शिरोडा विधानसभा मतदारसंघात होणारी पोटनिवडणूकही भाजपासाठी अतिशय महत्त्वाची आहे. काँग्रेसच्या तिकिटावर 2017 साली विजयी झालेले सुभाष शिरोडकर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये भाजपात आले. त्यांनी भाजपाच्या महादेव नाईक यांचा पराभव केला होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी गेल्या वर्षी भाजपात प्रवेश केला.

आता पोटनिवडणुकीमध्ये सर्व चित्र पालटले आहे. महादेव नाईक यांना काँग्रेसतर्फे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. शिरोडकर यांच्या वाटेत मोठा अडथळा येण्याची शक्यता आहे तो म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दीपक ढवळीकर यांच्या घोषणेचा.

सत्ताधारी भाजपाचा घटक पक्ष असणाऱ्या मगोपने ही निवडणूक लढवण्याचे घोषित केले आहे. जर ढवळीकर खरंच निवडणुकीत उतरले तर शिरोडकर यांचं पोटनिवडणुकीत विजयी होण्याचं स्वप्न पूर्ण होण्यात अडथळे येतील. मात्र ढवळीकर यांची समजूत काढण्यात भाजपाला यश येईल असे स्थानिक वर्तमानपत्र द नवहिंद टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

म्हापसा विधानसभा मतदारसंघ

गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सीस डिसूझा यांचे या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी निधन झाले. डिसूझा म्हापसा मतदारसंघातून निवडून येत असत. 1999 साली गोवा राजीव काँग्रेसतर्फे जिंकल्यानंतर त्यांनी सलग चार निवडणुका भाजपाच्या तिकिटावर जिंकल्या होत्या.

आता त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जोशुआ डिसूझा यांना भाजपाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपातर्फे उमेदवारी मिळावी यासाठी म्हापशाचे माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकरही प्रयत्न करत आहेत तसेच मनोहर पर्रिकर यांचे खासगी सचिव रुपेश कामतही इच्छुक असल्याचे सांगण्यात येते.

भाजपाच्या उमेदवारास काँग्रेसच्या विजय भिके किंवा गुरुदास नाटेकर यांच्याशी लढत द्यावी लागेल. या सर्व पोटनिवडणुकांच्या निकालावरच भाजपाचं विधानसभेतील गणित ठरणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)