शरद पवार : 'नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाने शेतकरी उद्ध्वस्त' #5मोठ्याबातम्या

नरेंद्र मोदी-शरद पवार Image copyright Getty Images

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या अशा :

1. शरद पवार : नोटबंदीच्या एका निर्णयानं शेतकऱ्यांच्या घामाची किंमत उद्धवस्त

"नोटाबंदीचा निर्णय हा अनेकांना मोदींचा मास्ट्ररस्ट्रोक वाटला होता पण बँकेत चलन बदलून घेण्यासाठी ज्या रांगा लागल्या त्यात शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, शेतीवर परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक निर्णय घेऊन उद्ध्वस्त केली," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते नवी मुंबई इथं राष्ट्रवादीच्या बुथ कमिटी मेळाव्यात बोलत होते.

'लोकसत्ता'नं या मेळाव्याचं वृत्त दिलं आहे. रिझर्व्ह बँकेने सांगितलं होतं की नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था संकटात येईल. तरीही हा निर्णय घेण्यात आला. सर्व रक्कम परत आली तर काळा पैसा कुठे गेला, असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.

2. मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा : 19 मार्चला अधिकृत घोषणा

Image copyright Getty Images

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) स्पष्ट केले. तसेच याबाबतची अधिकृत घोषणा 19 मार्चला केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार का? तसेच मनसे कोणाला पाठिंबा देणार या सर्व बाबींवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'सकाळ'नं ही बातमी दिली आहे.

3. मुंबईमधील पुलांचं पुन्हा होणार स्ट्रक्चरल ऑडिट

सीएसएमटी येथील पादचारी पूल दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने शहरातील २५०हून अधिक पुलांचे पुन्हा 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणीचा अहवाल महिनाभरात सादर करावा, असा आदेशही पालिकेने दिला आहे. मुंबई पालिका प्रशासनाने शनिवारी सल्लागारांना पत्र पाठवून सर्व पुलांचे ऑडिट करण्यास सांगितले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'नं यासंबंधीची बातमी दिली आहे.

दादरच्या टिळक उड्डाणपुलासह महालक्ष्मी, सायन, धारावी, करी रोड या प्रमुख पुलांचे पुन्हा ऑडिट होणार आहे. मुंबई शहर आणि रेल्वे हद्दीत सुमारे ४०० हून अधिक पूल आहेत. मात्र या पुलांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी विशेष तज्ज्ञ नसल्याचे वृत्तही 'महाराष्ट्र टाइम्स'नं दिलं आहे.

4. 107 वर्षांच्या थिमक्का जेव्हा राष्ट्रपतींना आशीर्वाद देतात...

शनिवारी राष्ट्रपति भवनामध्ये पद्म पुरस्कारांच्या वितरणाचा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रपती भवनातील या कार्यक्रमासाठी ठराविक प्रोटोकॉल असतो. मात्र या सगळ्याची कल्पना नसलेल्या 107 वर्षांच्या थिमक्कांनी चक्क राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीवार्द दिला. त्यांच्या या कृतीने राष्ट्रपतींसह उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. 'एबीपी न्यूज'नं हे वृत्त दिलं आहे.

सालुमार्दा थिमक्का यांनी 8 हजारहून अधिक झाडं लावली आहेत. त्यांच्या याच कार्यामुळं त्यांना वृक्षमाता अशी उपाधी मिळाली आहे. थिमक्कांना पद्मश्री पुरस्कारही जाहीर झाला. या पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात थिमक्कांहून 33 वर्षांनी लहान असलेल्या राष्ट्रपतींनी त्यांना चेहरा कॅमेऱ्याकडे करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी राष्ट्रपतींच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला.

5. पक्षाचा जाहीरनामाही आता आचारसंहितेचा भाग, निवडणूक आयोगाची घोषणा

Image copyright Getty Images

निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना निवडणूक आयोगानं प्रचारासंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे निवडणुकीच्या 48 तास आधी कोणत्याही पक्षाला आपला जाहीरनामा प्रसिद्ध करता येणार नाही. 'हिंदुस्तान टाइम्स'नं ही बातमी प्रसिद्ध केलीये.

निवडणूक आयोगानं आता पक्षाच्या जाहीरनाम्याला आचारसंहितेचा भाग बनवलं आहे. आतापर्यंत जाहीरनाम्यावर अशाप्रकारची कोणतीही बंधनं नव्हती. 2014 मध्ये भाजपनं पहिल्या टप्प्यातील मतदानाच्याच दिवशी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रकार असल्याचा आक्षेप काँग्रेसनं घेतला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)