'मैं भी चौकीदार' : राजकीय चर्चेत नेपाळी लोकांचा अपमान होतोय का? ब्लॉग

मोदी Image copyright Dan Kitwood/GETTY

राहुल गांधींच्या "चौकीदार चोर है" या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मैं भी चौकीदार' असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. या मुद्द्यावरून राजकीय वाद-विवादही रंगायला लागले आहेत. या वादात आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबांच्या ट्वीटची भर पडली आहे.

अलका लांबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल ट्वीट करताना म्हटलं, की प्रिय भारतवासीयांनो, यावेळी कृपा करून पंतप्रधान निवडा. चौकीदार आपण नेपाळवरूनही मागवू शकतो. नेपाळचे चौकीदार चोर नसतात. पंतप्रधानांवर राजकीय टीका करताना आपण नेपाळी लोकांना कमी लेखत आहोत, हे कदाचित अलका लांबांच्या लक्षात आलं नसेल.

Image copyright ALKA LAMBA @TWITTER

चौकीदार आपण नेपाळहूनही मागवू शकतो, असं म्हणताना एकप्रकारचा अहंभाव व्यक्त होताना दिसतो. त्यातल्या 'मागवू शकतो' या शब्दाकडे लक्ष द्या. आम्ही मालक आहोत. आमच्याकडे पैसा आहे, सामर्थ्य आहे आणि आम्ही काहीही खरेदी करू शकतो असाच अर्थ त्यातून निघतो. आणि नेपाळवरून चौकीदारांशिवाय मागवण्यासारखं दुसरं आहे तरी काय, असा तुच्छतावादही.

लांबा यांना असं वाटत असावं, की भारत चौकीदारांची मागणी करेल आणि नेपाळ दारात उभ्या असलेल्या दरबानाप्रमाणे मान डोलवेल. दुसऱ्याच दिवशी आपल्या देशात चौकीदारांची रांग लागेल. नेपाळ एक स्वतंत्र राष्ट्र आहे. भारत आणि चीनच्या दरम्यान असलेला हा देश स्वतंत्र आहे आणि अलका लांबा यांच्यासाठी चौकीदार पुरविणं एवढचं याच काम नाहीये.

अलका लांबा सुशिक्षित आहेत. त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा होत्या. एकूणच त्या जबाबदार वाटतात. त्यामुळे त्यांना हे कळायला हवं, की नेपाळमध्ये केवळ चौकीदारच नाही तर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातले व्यावसायिक, अर्थशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, अभिनेते, मॉडेल्स, संगीतकार आणि इतरही क्षेत्रातले लोक राहतात. तिथे दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ किंवा देशातील अन्य भागात असतात त्याप्रमाणे सफाई कर्मचारी, मजूर, शेतकरी आणि शारीरिक श्रम करणारे अन्य लोकही राहतात.

Image copyright ALKA LAMBA @TWITTER

भारतातील वेगवेगळ्या राज्यांतून टॅक्सी चालक, सफाई कर्मचारी म्हणून किंवा कारखान्यात काम करण्यासाठी लोक आखाती देश, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन किंवा फ्रान्समध्ये जातात. तशाच प्रकारे नेपाळमधले लोकही जातात, हे अलका लांबा यांनी लक्षात घ्यायला हवं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 'न्यूयॉर्कमध्ये खूप घाण झालीये, चला काही भारतीयांना बोलवूया,' असं म्हणण्यासारखंच लांबा यांचंही विधान आहे.

नेपाळला आपली मालकी समजणाऱ्या अलका लांबा एकट्या नाहीयेत. कदाचित आपली चूक समजल्यामुळे त्यांनी हे ट्वीट काढून टाकलं आहे. पण त्यामुळे नेपाळला आपला मांडलिक समजण्याची मानसिकता नाही बदलू शकत. उत्तर भारतात असे अनेक लोक आहेत, जे नेपाळला आपली जहागिर समजतात, या गोष्टीची नेपाळी लोकांना पुरेपूर जाणीव आहे.

गेल्या महिन्यात काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात माझ्यासोबत बसलेल्या भारतीय प्रवाशाने बीअर मागितली. फ्लाइट अटेन्डन्टनं हसून म्हटलं, "सर, ही देशांतर्गत विमानसेवा आहे. यामध्ये आम्ही बीअर नाही देत."

मला त्या अटेन्डन्टला विचारावं वाटलं, की नेपाळला जाणारं विमान केव्हापासून देशांतर्गत विमान झालं? तुम्ही नेपाळला भारतात कधीपासून सामील करून घेतलं?

'नेपाळ कुणाची जहागिरी नाही'

नेपाळ एक स्वतंत्र देश आहे. या देशाची राज्यघटना आहे, संसद आहे, पंतप्रधान आणि लष्कर आहे. जसं फ्लाईट अटेंडन्टनं ही फ्लाईट देशांतर्गत असल्याचं सांगितलं, तसंच लांबा यांनाही वाटतं की 'चौकीदार तर आपण नेपाळवरूनही आणू.'

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नेपाळचं सैन्य

नेपाळच्या त्रिभुवन विमानतळावर कार्यरत नेपाळी इमिग्रेशन अधिकाऱ्याला बऱ्याच वेळा अशा भारतीयांना भेटण्याचा योग आला असेल. त्यानं माझ्याकडे एक कटाक्ष टाकत म्हटलं तुमचा देश मोठा आहे आणि अहंकारही त्यापेक्षा मोठा आहे. विमानाला उशीर झाल्याने मी त्याच्याकडे तक्रार करणार होतो, पण तो रागात होता.

नेपाळी लोकांना असं वाटतं की भारत मोठा देश आहे आणि भारतीयांचा अहंकारही फार मोठा आहे. अनेकवेळा भारतीय लोकांना हे लक्षात येत नाही, की आपण जे नेपाळबद्दल बोलतो ते नेपाळी लोकांना आवडत नाही. आपला निरागस प्रश्न असतो आम्ही नेपाळला आपलं मानतो तर मग समस्या काय आहे?

काठमांडूला पोहोचल्यानंतर मी नेपाळी सहकाऱ्यांना म्हटलं, की नेपाळमध्ये घरी असल्यासारखं वाटतं. क्षणात तो सहकारी म्हणाला, "होय तुमच्या पंतप्रधानांनाही असंच वाटतं."

मला लगेच लक्षात आलं, की पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या पहिल्या दौऱ्यात जे नेपाळी नागरिक 'मोदी-मोदी'च्या घोषणा देत रस्त्यावर उतरले होते, ते आज मोदींचं नाव निघताच प्रश्नांची मालिका का उपस्थित करतात.

Image copyright Getty Images

अशा प्रकारच्या वक्तव्यांतून नेपाळच्या नागरिकांना वाटतं की आपण नेपाळच्या नागरिकांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य न करता त्यांना आपल्या छायेखाली ठेऊ इच्छितो. नेपाळच्या लोकांना असं प्रेम आवडत नाही. उलट त्यांना यातून सांस्कृतिक विस्तारवादाचा दर्प येतो.

3 महिने काठमांडू इथं राहून काम केल्यानंतर तिथल्या शहरांत, गावांत फिरताना मला अनेक वेळा एकाच प्रश्नाचा सामना करावा लागला. लोक वारंवार विचार होते, की मोदींनी आम्हाला रक्ताचे अश्रू का दिले?

नेपाळी लोक, विशेषतः डोंगराळ भागातील नेपाळी नागरिक 2015चं वर्षं विसरू शकलेले नाहीत. मोदींनी तेव्हा नेपाळची अघोषित नाकाबंदी केली होती. लोकांनी पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस मिळवताना प्रचंड त्रास सोसला होता.

राजीव गांधी पंतप्रधान असतानाही अशी नाकाबंदी करण्यात आली होती.

काठमांडूपासून काही दूरवर असलेल्या चितलांगमध्ये एका प्राध्यापक म्हणाले, "अशा प्रकारे नाकाबंदी करून आम्हाला चीनच्या जवळ का ढकलत आहात?"

या प्रश्नाचं काही उत्तर आहे?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)