#MainBhiChowkidar: तुमच्यासारखे चौकीदार असतील तर महिला असुरक्षित-रेणुका शहाणे

रेणुका शहाणे आणि एम. जे. अकबर Image copyright Getty Images

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मी चौकीदार मोहिमेला समर्थन देणाऱ्या एम. जे. अकबर यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या #MainBhiChowkidar चळवळीला पत्रकार एम.जे.अकबर यांनी पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेल्या #metoo मोहिमेवेळी एम.जे.अकबर यांच्याविरोधात अनेक महिला सहकाऱ्यांनी आवाज उठवला होता.

म्हणूनच अकबर यांनी पंतप्रधानांच्या चौकीदार चळवळीला पाठिंबा देताच, अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.

तुमच्यासारखे चौकीदार असतील तर कुठल्याही महिलेला सुरक्षित वाटणार नाही असं रेणुका यांनी म्हटलं आहे. हे लिहिताना त्यांनी #BesharmikiHadd हा हॅशटॅग वापरला आहे.

रेणुका यांच्या या ट्वीटला 11हजार नेटिझन्सनी लाईक केलं आहे. त्याचवेळी 3.4 हजार नेटिझन्सनी रिट्वीट केलं आहे.

त्याबद्दल रेणुका शहाणे यांनी बीबीसी मराठीशी केलेली खास बातचीत पाहा इथे -

रेणुका यांच्या या ट्वीटला पंतप्रधान नरेंद्र मोदींची विचारधारा मानणाऱ्या एका व्यक्तीने प्रत्युत्तर दिलं.

शशी थरूर, दिग्विजय सिंह अशा नेत्यांचा समावेश असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात तुम्हाला सुरक्षित वाटत असेल तर भँवरी देवी आणि सुनंदा पुष्कर होण्यापासून देव तुमचं रक्षण होवो, अशा शब्दांत संजीव सिन्हा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

''पण त्यांनी स्वत:ला चौकीदार असल्याचं घोषित केलेलं नाही'' असं प्रत्युत्तर रेणुका यांनी दिलं. हे लिहिताना त्यांनी #AkalKiKami हा हॅशटॅग वापरला आहे.

निव्वळ कायद्याने काहीही होत नाही. सत्तेचा दुरुपयोग करून कायद्यातून पळवाट काढली जाऊ शकते. हे प्रत्येक भारतीय नागरिकाला माहिती आहे असं रेणुका यांनी ट्वीट केलं होतं.

चोर स्वत:ला चौकीदार घोषित करतो...? असा सवाल नेटिझनने केला. रेणुका यांनी 'अगदी आरामात' असं त्याला प्रत्युत्तर दिलं.

त्यांनीही चौकीदार मोहिमेला पाठिंबा दिला असता तर मी नक्कीच बोलले असते असं ट्वीट रेणुका यांनी केलं आहे.

तुम्ही प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवता आणि समाजाला खडबडून जागे करता म्हणजे तुम्ही पण या देशातील जागरूक चौकीदार आहात.... माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पण अभिमानाने म्हणा- #MainBhiChowkidar असं ट्वीट संदीपआबा गिड्डे-पाटील यांनी केलं. त्याला रेणुका यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिलं.

कुठल्याही हॅशटॅगमुळे मी ना तर माझं नाव बदलेन ना तुम्हाला एखादी गोष्ट ऐकायची आहे म्हणून मी म्हणेन. मी माझ्या स्वत:ची बुद्धी वापरून जर काही म्हणायचंच झालं तर अभिमानाने म्हणेन की मी एक जागरूक आई आणि अभिनेत्री आहे आणि एक कर्तव्यनिष्ठ नागरिक आहे. तुमचं चालू द्या. धन्यवाद असं रेणुका यांनी ट्वीटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)