मुकेश अंबानी धावले अनिल यांच्या मदतीला #5मोठ्याबातम्या

मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी Image copyright Hindustan Times/getty images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया -

1. मुकेश अंबानींमुळे टळला अनिल अंबानींचा तुरुंगवास

एका दशकानंतर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यातील दुरावा कमी झाल्याचं वृत्त आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सची एरिकसनकडे 453 कोटींची थकबाकी होती. ही थकबाकी चुकवण्यासाठी मुकेश अंबानी यांनी अनिल अंबानींना मदत केल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. जर ही थकबाकी भरता आली नाही तर अनिल अंबानी यांना तुरुंगवास भोगावा लागला असता.

त्यामुळे मुकेश अंबानी यांच्यामुळे अनिल अंबानींचा तुरुंगवास टळला अशी चर्चा सुरू आहे. अनिल अंबानी यांनी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे आभार मानले आहेत. मुकेश अंबानी यांनी नेमकी किती कोटींची मदत केली हे अनिल अंबानींनी जाहीर केलं नाही पण या कठीण काळात मुकेश आणि नीता माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून मी त्यांचा आभारी आहे असं त्यांनी म्हटलं.

2. CSMT पूल दुर्घटनेप्रकरणी ऑडिटर नीरज देसाईंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

CSMT पूल दुर्घटनेप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाई यांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असं वृत्त झी 24 तासनं दिलं आहे.

CSMT स्थानकाजवळील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जण दगावले होते तर ३१ जण जखमी झाले होते. यानंतर विरोधकांनी यावर कडाडून टीका केली होती. दुर्घटना घडल्यावर पालिकेने याची जबाबदारी रेल्वे प्रशासनावर टाकली होती. पण हा पूल आपल्याच अखत्यारित असल्याची उपरती नंतर पालिकेला सुचली. यामध्ये जो कोणी आरोपी असेल त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी होऊ लागली होती.

3. दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव हे युतीविरोधात लढणार

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्धार केला आहे. "होय, मी उभं राहणारच," असे म्हणत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त लोकमतनं दिलं आहे.

विशेष म्हणजे, याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी माझी बोलणी झाल्याचेही जाधव यांनी सांगितले. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. सत्तारजींनी मला काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासंदर्भात विचारणा केली, त्यामुळे मी निर्धार पक्का केला आहे, असे सांगत युतीच्या उमेदवाराविरुद्ध हर्षवर्धन जाधव यांनी रणशिंग फुंकले आहे.

4. मतदान करण्यासाठी सुटी, सवलत

लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुटी किंवा दोन तासांची सवलत देण्यात येणार असून, या संदर्भात शासनाने आदेश काढले आहेत ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

Image copyright Getty Images

मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते, मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले की संस्था, आस्थापना भरपगारी सुटी किंवा सवलत देत नाहीत.

5. लंडनमध्ये नीरव मोदी यांना विरोधात वॉरंट जारी, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

पंजाब नॅशनल बॅंकेला 14 हजार कोटी रुपयांच्या गैरप्रकारचा आरोप असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांना अटक करुन भारतात आणण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. नीरव मोदी यांच्या विरोधात लंडनमधील एका न्यायालयाने अटक वॉरंट जाहीर केले आहे. त्यामुळे नीरव मोदी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. नीरव आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्सनं दिली आहे.

Image copyright Getty Images

भारताच्या सक्तवसुली संचालनालयाने नीरव मोदींच्या हस्तांतरणाची मागणी भारतातर्फे सातत्याने करण्यात येत होती. या मागणीला दाद देत लंडनच्या वेस्टमिनिस्टर दिवाणी न्यायालयाने नीरव मोदींविरोधात वॉरंट जारी केलं आहे. स्थानिक पोलीस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता असल्याची माहिती संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. अटकेनंतर त्यांना न्यायालयात सादर केलं जाईल आणि नीरव मोदींना जामिनासाठी अर्ज करता येईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)