निवडणूक 2019: राज ठाकरे यांचा मनसेला आदेश – आता फक्त मोदी आणि अमित शाह यांचा विरोध

राज ठाकरे Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राज ठाकरे

"देशाचा विकास व्हायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना बाजूला करण्याची गरज आहे. यापुढे मी जे जे काही करेन ते मोदींच्या विरोधात, तुम्हीही तेच करायचं आहे," असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलं.

"इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिला, सर्वांशी खोटं बोलणारा पंतप्रधान आहे. यांनी गेली पाच वर्षं फक्त पं. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांना शिव्या दिल्या. आता यांना शिव्या देण्याची वेळ आमच्यावर आली.

"नरेंद्र मोदी वापरत असलेला प्रधानसेवक हा शब्दही जवाहरलाल नेहरू यांचा आहे. आता भाजपचं चौकीदार कॅम्पेन हा एक सापळा आहे. त्यात अडकू नका," असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांनी याआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं जाहीर केलं आहे.

राज ठाकरे मनसेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून पुढे म्हणाले, "भाजपच्या विरोधात प्रचार करणं, हे तुमचं काम. निवडणुकीत भाजपने थैल्या रिकाम्या केल्या तर त्या घ्या. त्यांना लुटायची हीच वेळ आहे."

"काहीही झालं तरी या पक्षाच्या विरोधात काम करा. तुमच्या कामाचा कोणत्याही पक्षाला फायदा होणार असेल तर होऊ दे, पण हे दोन लोक (नरेंद्र मोदी आणि अमित शाह) यांना बाजूला करण्याची गरज आहे," असं ते म्हणाले.

बीबीसी मराठीच्या लेखाचा उल्लेख

बालाकोट हल्ल्यासंदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी बीबीसी मराठीवर 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेला क्रिस्टीन फायर यांचा लेख जमलेल्या कार्यकर्त्यांना पडद्यावर दाखवून तो वाचण्याचं आवाहन केलं. IAF कारवाई : मोदी पुन्हा निवडून यावेत ही पाकिस्तानी लष्कराची इच्छा- क्रिस्टीन फायर हे शीर्षक वाचून दाखवत बालाकोट हल्ल्याचं आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी कसं विवेचन केलं आहे, ते पाहा, असं ते म्हणाले.

Image copyright MNS Adhikrut

त्याच प्रमाणे रिझर्व्ह बॅंकेकडे केंद्र सरकारनं 3 लाख कोटी मागितले होते आणि त्यातील 28 हजार कोटी सरकारला मिळाले. तसंच गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातही 40 हजार कोटी सरकारला मिळाल्याचे माध्यमांत प्रसिद्ध झाल्याचं राज यांनी पडद्यावर दाखवले.

तसेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी सहकार्य करण्यास नकार दिल्यामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला, असं त्यांनी सांगितलं.

'गुजरातचं खोटं चित्र उभं करण्यात आलं'

एकेकाळी राज ठाकरे यांनी गुजरातमध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. मात्र नंतर त्यांनी आपली भूमिका बदलल्यामुळे त्यांच्यावर टीकाही केली जाऊ लागली.

Image copyright Getty Images

याचं उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, "मी जेव्हा गुजरातला गेलो होतो तेव्हा माझ्यासमोर खोटं चित्र उभं केलं होतं. रतन टाटा यांनी मला गुजरातला जायला सांगितलं म्हणून मी गेलो होतो. तिकडचे IPS, IAS अधिकारी कामाची माहिती द्यायचे. परंतु दौऱ्याच्या शेवटी झालेल्या पत्रकार परिषदेत इतकं सगळं असूनही मी आमचा महाराष्ट्रच 1 नंबरला असल्याचं सांगितलं होतं."

"2014 नंतर वर्षभरात दाखवलेलं चित्र वेगळं होतं, हे कळलं. हा माणूस (मोदी) बदलला मग मीही माझी भूमिकाही बदलली," अशा शब्दांमध्ये त्यांनी स्वतःच्या सध्याच्या भूमिकेचं समर्थन केलं.

Image copyright Getty Images

शेतकरी प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, "2015 महाराष्ट्रात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 'शरद पवारांना मरणाऱ्या शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही,' अशी टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंतर अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांचं कौतुक केलं आहे."

त्यानंतर राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या विविध भाषणांच्या ध्वनीचित्रफिती दाखवल्या आणि "पंतप्रधानांच्या भूमिकेत किती विसंगती आहे पाहा" असं कार्यकर्त्यांना सांगितलं. "मी बोलल्यावर माझी स्क्रिप्ट बारामतीवरून येते, अशी टीका मुख्यमंत्री करतात मग 'हे' (पंतप्रधानांनी शरद पवारांची स्तुती केलेली भाषणं) कुठून येतं?" असा प्रश्नही त्यांनी कार्यकर्त्यांपुढे उपस्थित केला.

'मनसेने डिपॉझिट वाचवून दाखवावं'

राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावर उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, "आज रंगशारदामध्ये, जिथे अनेक नाटकं होतात, त्यात अजून एक नाटक पहायला मिळालं. परवा माननीय मुख्यमंत्री म्हणाले 'बारामतीचा पोपट', त्याला अधोरेखित करणारे आजचे भाषण होते."

"मला आता मनसेला म्हणायचं आहे की, तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढा आणि डिपॉझिट वाचवून दाखवा. सध्या मला आश्चर्य वाटतं की राज ठाकरे हे अतिशय सूज्ञ नेते आहेत, तरीसुद्धा आपल्या सैन्यांनी जी कामगिरी केली, त्यावर अशा पद्धतीने बोलणं हा सैन्यांचा अपमान आहे. खऱ्या अर्थाने पाकिस्तानचे ते हिरो होऊ इच्छितात का? अशा पद्धतीचा सामान्य माणसाच्या मनात प्रश्न येईल, असं आजच वक्तव्य होतं.

"पोपटाचा रंग हिरवा असतो तो पाकिस्तानचा तरी नाही ना, असं मला वाटतं," असा टोलाही तावडेंनी यावेळी लगावला.

'ही सभा भविष्यात भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते'

राज ठाकरे यांनी आज मांडलेल्या मतांबद्दल 'दगलबाज राज' या पुस्तकाचे लेखक आणि राज ठाकरे आणि मनसेच्या भूमिकेचे समर्थक कीर्तीकुमार शिंदे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते, खरंतर संस्थानिकच, सत्तेसाठी भाजपमध्ये प्रवेश करत असतानाच्या आजच्या काळात राज ठाकरे मात्र आपला मोदी-शहा विरोध कायम ठेवून आहेत. याचं महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे. आजच्या मेळाव्यात त्यांनी त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना दिलेला मोदी-शहा-भाजप विरोधात मतदान करण्याचा आदेश हा निश्चितच महत्त्वाचा आहे." देशातील मुख्य प्रवाहातील मीडिया भाजपच्या इशाऱ्यावर नाचत असताना राज मात्र आता सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर करणार आहेत, हे सुद्धा स्पष्ट झालं आहे, असं ते सांगतात.

"त्यांच्या व्यक्तिगत करिष्म्यामुळे ते करत-मांडत असलेला मोदी विरोध वाऱ्यासारखा पसरणार आहे. राज यांची ही सभा भाजपासाठी भविष्यात डोकेदुखी ठरू शकते," असंही शिंदे पुढे म्हणाले."BBC ज्याप्रमाणे Reality Check/ Fact-finding करते, त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी सत्य गोष्टी लोकांसमोर मांडण्याची भूमिका स्वतःहून स्वीकारली आहे. एका राजकीय नेत्याने निवडणुकीतील फायद्या-तोट्याचा विचार न करता अशी संपूर्ण नैतिक राजकीय प्रचाराची भूमिका स्वीकारणं, हे ऐतिहासिक आहे," असं ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)