प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 'साधनं' कुठून मिळतात? - रामदास आठवले

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीचा निवडणुकीमध्ये नक्की कोणत्या पक्षांना फटका बसेल, याबद्दल सर्वांनाच कुतुहल आहे. बीबीसी मराठीने आयोजीत केलेल्या राष्ट्रमहाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी तर यावर चर्चा केलीच, शिवाय, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या आघाडीबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं.

'आमची लढाई भाजपा-शिवसेना युतीशी'- प्रकाश आंबेडकर

"कोणत्याही परिस्थितीत आपण शिवसेना आणि भाजप या पक्षांबरोबर जाणार नाही. सेक्युलर विचारांच्या पक्षांना आमचा अजेंडा मान्य असेल तर त्यांच्याबरोबर जाऊ," असं मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी बीबीसी मराठीच्या 'राष्ट्र महाराष्ट्र' कार्यक्रमात व्यक्त केलं.

ते पुढं म्हणाले, "काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्पर्धेत आहेत, असं आम्ही मानत नाहीत. सध्या रा. स्व. संघप्रणित भाजप आणि शिवसेना विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असं चित्र निवडणुकीत आहे.

वंचित बहुजन आघाडी इतर दलित चळवळीतील पक्षांशी युती करणार का, असं विचारताच आम्ही कुणाशी युती करायची नाही, असा सामूहिक निर्णय घेतला आहे, असं आंबेडकर यांनी उत्तर दिलं. "वंचित बहुजन आघाडीची चळवळ निवडणुकीनंतरही कायम राहील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गर्दीचं मतांमध्ये रूपांतर होणार नाही- रामदास आठवले

"वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना सध्या गर्दी होत आहे. वंचित बहुजन आघाडीला माझ्या शुभेच्छा आहेत.

परंतु या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होईल की नाही हे सांगता येत नाही", असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं.

ते पुढं म्हणाले, "खासदार म्हणून निवडून येण्यासाठी 4 ते 4.5 लाख मते मिळवावी लागतात. त्यांना एवढी मतं मिळतील असं वाटत नाही. त्यांना साधनं कुठून मिळतात हे माहिती नाही. आमच्याकडं इतकी साधनं नाहीत. वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही."

'भाजपला मदत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत' - धनंजय मुंडे

"वंचित बहुजन आघाडीमुळे मतांमध्ये विभाजन होऊ नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी अनेकदा चर्चा केली असं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

जागा वाटपाच्या बोलणीबाबत ते म्हणाले, "आम्ही त्यांना 4 जागा देऊ केल्या होत्या. मात्र ते 12 जागांवर अडून बसले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांनी आणखी एकदोन जागांवर तडजोड करण्याची भूमिका घेतली होती. परंतु नंतर त्यांनी चर्चाच करायची नाही अशी भूमिका घेतली. ते निवडून येण्यासाठी मैदानात उतरले नसून भाजपाला मदत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांमधील अनेक उमेदवारांना त्यांच्या तालुक्यातही कोणी ओळखत नाही अशी स्थिती आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)