IPL 2019 | CSK vs RCB: धोनी विरुद्ध कोहली थराराला दमदार सुरुवात

विराट, धोनी Image copyright Getty Images

जगातील सर्वांत लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या IPLच्या 12व्या सीझनला आजपासून सुरुवात झाली.

या सीझनमधील पहिला सामना गेल्या वर्षीचा विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चँलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जातोय. धोनीने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे विराट कोहलीचा रॉयल चँलेंजर्स बेंगलोर सध्या बॅटिंग करतो आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 2010, 2011 आणि 2018, असं तीन वेळा IPL जिंकलं आहे. तसंच चार वेळा ते उपविजेतेही राहिले आहेत. म्हणजे 7 वेळा IPLच्या अंतिम फेरीत पोहोचलेला हा एकमेव संघ आहे.

अर्थात इतक्या यशस्वी संघाला वाद आणि बदनामीलाही तोंड द्यावं लागलं आहे.

BCCI, IPL आणि वाद

IPLमध्ये कथित स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मालक सहभागी असल्याच्या आरोपातून चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांना प्रतिबंधानाही तोंड द्यावं लागलं आहे. IPLमध्ये पैशाची चमक इतकी प्रखर आहे की यापासून BCCIही वाचू शकलेली नाही.

Image copyright AFP

एकेकाळी IPLची सुरुवात करणारे ललीत मोदी आज लंडनमध्ये आहेत. त्यांच्यावर मनीलॉड्रिंगचे आरोप असून त्यांचावर BCCIने निर्बंध लादले आहेत. BCCIला आज पदाधिकारी नाही तर सुप्रीम कोर्टाची समिती चालवत आहे. BCCIचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनाही BCCIने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अर्थात हा आता इतिहास झाला आहे.

धोनी विरुद्ध कोहली

चेन्नई सुपर किंग्ज शनिवारी जेव्हा एम. ए. चिदंबर स्टेडियमवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सामना होईल, तेव्हा गेल्या वर्षीच्या आठवणींना उजाळा मिळेल.

गेल्या वर्षी धोनीने स्वतःच्या जिवावर विजेतेपद मिळवत सर्वांनाच धक्का दिला होता. ज्या संघाला दोन वर्षं निर्बंधाचा सामना करावा लागला, त्या संघाला आत्मविश्वास मिळवून देणं सोप काम नव्हतं.

Image copyright AFP

चेन्नई सुपर किंग्जच्या शेन वॉटसनने चमकदार कामगिरी केली होती. सनराईज हैदराबाद विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात वॉटसनने नाबाद 117 धावा केल्याने चेन्नई सुपर किंग्जने 18.3 ओव्हरमध्ये दोन विकेट गमावत हा सामना जिंकला.

चेन्नईसोबत यावेळी धोनीच्या जोडीने सुरेश रैना, फॉफ डुप्लेसी, अंबाती रायडू, मुरली विजय आणि सॅम बिलिंग असे कसलेले फलंदाज आहेत. शिवाय केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा आणि शेन वॉटसन असे ऑल राऊंडरही आहेत. हरभजन सिंग अनुभवात कुणापेक्षा कमी नाही, शिवाय इमरान ताहीर कधीही बळी मिळवू शकतो.

दर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर गेल्यावेळी प्ले ऑफमध्येही आलेली नव्हती.

विराट कोहली, बी डिविलियर्स, पार्थिव पटेल, नाथन कल्टर नाइल आणि शिमरोन हेटमायर यांच्यावर या संघाची भिस्त आहे. उमेश यादव, टिम साउदी, स्पिनर युज्वेन्दर चहल आणि पवन नेगींवर सर्वांच लक्ष असेल.

यांच्यावर असेल लक्ष

IPL सुरू होण्याआधीच चेन्नईचा गोलंदाज लुइंगी एनगिडी फिटनेसमुळे स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

गेल्या सीझनमध्ये चेन्नईच्या अंबती रायडूने 16 सामन्यांत एक आणि 3 अर्धशतकांसह 602 धावा बनवल्या होत्या. तर शेन वॉटसनने 15 सामन्यांत 2 अर्धशतकं, दोन शतकं झळकवतं 555 धावा केल्या होत्या. तर बेंगलोरने 14 सामन्यांत 20 बळी घेतले होते.

Image copyright BCCI
प्रतिमा मथळा पवन नेगी

यंदा IPLचा संपूर्ण सीझन भारतात होणार आहे. हा सीझन 23 मार्च ते 12 मेपर्यंत चालणार आहे. तर 30 मेपासून 14 जुलैपर्यंत वर्ल्ड कपही होणार आहे.

त्यामुळेच या स्पर्धेत खेळाडूंनी जपून खेळावं आणि स्वतःला फीट ठेवावं असं कोहली आणि रवी शास्त्री यांना वाटतं. अर्थात कोणत्याही संघाला आपल्या खेळाडूंनी पूर्ण योगदान द्यावं असं वाटत असल्याने हे मोठं आवाहन असणार आहे. पंजाब इलेव्हनचे कोच माईक हेसन यांनी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला पुरेशी विश्रांती दिली जाईल, असं म्हटलं आहे.

चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी निलंबित झालेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले आहेत. स्टीव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्समधून तर डेव्हिड वॉर्नर सनराईज हैदराबादमधून खेळणार आहे. तर यावेळी दिल्ली डेअरडेव्हिल्स दिल्ली कॅपिटल्स या नावाने खेळणार आहे.

IPLमध्ये चेन्नई आणि बेंगलोर या दोन्ही संघांत 23 सामने झाले आहेत. त्यातील 15 सामने चेन्नईने जिंकले आहेत.

गेल्या सीझनमधील दोन्ही सामने चेन्नईने जिंकले आहेत. जगातील सर्वांत लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या IPLच्या 12व्या सीझनला आजपासून सुरुवात होत आहे. या सीझनमधील पहिला सामना गेल्या वर्षीचा विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चँलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जाईल.

Image copyright IPLT20.COM

आयपीएलमध्ये खेळणारे महाराष्ट्रातील खेळाडू

यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंची निवड झाली आहे. अजिंक्य राहाणे राजस्थान रॉयल्सकडून, केदार जाधव चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार आहे. धवल कुलकर्णी राजस्थान रॉयल्सकडून, पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्सकडून, श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटलकडून, शुभम रांजणे राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे.

तसेच ऋतुराज गायकवाड, शार्दूल ठाकूर चेन्नई सुपरकिंग्जकडून, रोहित शर्मा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहेत.

Image copyright IPL20.COM

शिवम दुबे आणि उमेश यादव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून दर्शन नळकांडे खेळणार आहे. तर कोलकाता नाइट रायडर्सकडून निखिल नाईक आणि श्रीकांत मुंढे खेळणार आहे.

IPL जेतेपदाचे मानकरी

2008 साली राजस्थान रॉयल्सने ही स्पर्धा सर्वात प्रथम जिंकली होती. त्यानंतर डेक्कन चार्जर्सने ही स्पर्धा जिंकली होती. 2010 आणि 2011 अशी सलग दोन वर्षे चेन्नई सुपरकिंग्जने या स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले होते. 2012 साली कोलकाता नाईट रायडर्सने ही स्पर्धा जिंकल्यानंतर 2013 मध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवला.

2014 साली पुन्हा कोलकाता नाईट रायडर्स, 2015मध्ये मुंबई इंडियन्स, 2016 साली सनरायझर्स हैदराबादने विजय मिळवला. 2017 साली पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स विजयी झाली तर गेल्या वर्षी चेन्नई सुपरकिंग्जने अजिंक्यपद मिळवले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)