नितीन गडकरी: 'वाढत्या वयामुळे अडवाणींऐवजी अमित शहांना संधी' #5मोठ्याबातम्या

नितीन गडकरी Image copyright Twitter / nitin_gadkari
प्रतिमा मथळा नितीन गडकरी

सर्व महत्त्वाची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:

1. वाढत्या वयामुळे अडवाणींऐवजी अमित शहांना संधी- नितीन गडकरी

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पहिल्या यादीत लालकृष्ण अडवाणींना स्थान दिलेले नाही. त्यावरून भाजपवर टीका होऊ लागली आहे. मात्र वाढतं वय आणि प्रकृतीचं कारण देत भाजपच्या केंद्रीय संसदीय निवडणूक समितीने हा निर्णय घेतला असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.

अडवाणी आमचे मार्गदर्शक आहेत आणि कायम मार्गदर्शक राहतील. लालकृष्ण अडवाणी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यामुळे पक्ष त्यांचा आदर करतं. मात्र अडवाणी यांनी वयाची नव्वदी ओलांडली आहे. त्यामुळे वाढतं वय लक्षात घेता त्यांच्या जागी दुसऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं ते म्हणाले.

2. काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटवर बंदी

जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी विचारसरणीला चालना देणारी सगळ्यात जुनी संघटना असलेल्या जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या यासिन मलिकच्या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

Image copyright AFP

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतर्गत सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 1988 पासून फुटीर चळवळीद्वारे काश्मीर खोऱ्यात घातपाती कारवायांना बळ दिल्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचं केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दहशतवादाविरोधातील केंद्राच्या कठोर धोरणानुसार हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.

3. भाजपा नेत्यांना येडियुरप्पांकडून 1800 कोटींची लाच

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांना 1800 कोटींची लाच दिल्याचं वृत्त प्रसिद्धीमाध्यमांनी दिलं आहे. या घटनेची चौकशी लोकपालतर्फे व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. लोकसत्ताने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

Image copyright Getty Images

कॅराव्हॅन मासिकाने एका डायरीतील सविस्तर तपशिलाचा हवाला देत हा आरोप केला आहे. सदर डायरी प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासकट भाजपच्या सर्व नेत्यांची चौकशी करावी असं हे प्रकरण दिसत असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. येडियुरप्पा यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

4. पाकिस्तान नॅशनल डे वर भारताचा बहिष्कार, मोदींकडून संदेश

पाकिस्तान नॅशनल डे च्या निमित्ताने पाकिस्तान उच्चायुक्ताने आयोजित केलेल्या समारंभावर केंद्र सरकारने बहिष्कार घातला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मात्र मोदींनी पाकिस्तानी नागरिकांना संदेश दिल्याचं उघड केलं आहे. इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

नॅशनल डे ऑफ पाकिस्तानच्या निमित्ताने पाकिस्तानच्या नागरिकांना मी शुभेच्छा देत आहे. एक प्रागतिक, संपन्न आणि लोकशाहीवादी, प्रांत विकसित करण्यासाठी तसंच दहशतवाद विरहित वातावरण विकसित करण्याची हीच खरी वेळ आहे असं ते म्हणाले.

5. पुण्यात हेल्मेटसक्तीचा डबल बार

गेल्या तीन महिन्यांत उसळलेला गदारोळ आणि राजकारण काहीसे शमले असतानाच शहरात पुन्हा हेल्मेटसक्तीने डोके वर काढले आहे. आता तर दुचाकी चालकांबरोबरच मागे बसणाऱ्या प्रवाशांनाही हेल्मेट घालावे लागणार आहे. दुचाकीवरील सहप्रवाशांनीदेखील हेल्मेट वापरावे, असे आवाहन वाहतूक पोलिस शाखेने केले आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

या आवाहनाला प्रतिसाद न देता, सहप्रवाशांनी हेल्मेटचा वापर केला नाही, तर येत्या काळात त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या तोंडावरच हा हेल्मेटसक्तीचा 'डबल बार' फुटणार असून नागरिकांच्या संतापाचा सामना सत्ताधाऱ्यांना करावा लागणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)