लोकसभा 2019 : पुण्यात भाजपने दाखवला अनिल शिरोळेंना 'कात्रजचा घाट'

अनिल शिरोळ, बापट Image copyright Facebook

पुणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना डावलण्यात आलं असून अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना तिकीट देण्यात आलं आहे. पुणे हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ असल्याने इथल्या लढतीकडं राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

2019 च्या निवडणुकीतील धामधुमीत उद्योगपती आणि खासदार संजय काकडे यांनी बंडाचा झेंडा रोवला होता. त्यामुळे पुण्याचं तिकीट कुणाला मिळणार याबदद्ल उत्सुकता होती. मात्र कालच आपण भाजपमध्ये राहणार असल्याचं काकडे यांनी घोषित केल्याने या वादावर पडदा पडला. त्यातच काल रात्री उशिरा जाहीर झालेल्या यादीत गिरीश बापटांचं नाव जाहीर झाल्यामुळे तिथलं चित्र स्पष्ट झालं आहे.

पारंपरिक बालेकिल्ल्यात काँग्रेसची दमछाक

पुणे मतदारसंघ हा पारंपरिकरित्या काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला होता. 1952 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत नरहर विष्णु गाडगीळ यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांचे सुपुत्र विठ्ठल गाडगीळ यांनी 1980 ते 1991 या काळात सलग तीन वेळा पुण्याचं खासदारपद भूषवलं होतं. त्याआधी मोहन धारिया यांनी एकदा काँग्रेसतर्फे आणि एकदा जनता पक्षातर्फे निवडणूक लढवत विजय मिळवला होता.

1996 ते 1998 या काळात आणि त्यानंतर 2004 ते 2014 या काळात सुरेश कलमाडी यांनी खासदारपद भूषवत काँग्रेसचा वरचष्मा पुण्यावर कायम ठेवला.

Image copyright Getty Images

1952 ते आजतागायत भाजपला अण्णा जोशी, प्रदीप रावत आणि विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यारूपात तीनदा पुण्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

शिरोळेंना उमेदवारी का नाकारली?

खा. अनिल शिरोळे 2014 मध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आले असले तरी गेली पाच वर्षं ते निष्क्रिय राहिल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, "त्यांनी लोकसभेत हजेरी लावली तरी ते लोकांमध्ये मिसळले नाही. आपला खासदार काहीतरी करतोय अशी भावना निर्माण करण्यातही ते अपयशी ठरले. पक्षाअंतर्गतही त्यांना बराच विरोध होता. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी महापालिकेत आपल्या मुलाच्या नावासाठी आग्रह धरला. त्यांचं चार जणांचं पॅनेल निवडणुकीला उभं होतं. त्यात शिरोळेंच्या मुलाला सगळ्यात कमी आघाडी होती. ज्या अनिल शिरोळेंनी एवढी आघाडी घेतली त्यांना मुलाला आघाडी मिळवून देता आली नाही त्यामुळे अनिल शिरोळे हे मोदी लाटेत निवडून आले हे सिद्ध झालं."

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनिल शिरोळे हे मुंडे गटातील मानले जातात. 2014 च्या निवडणुकांनंतर मुंडेंचं निधन झाल्यामुळे त्यांना कुणाचाही फारसा पाठिंबा उरला नाही हेही त्यांची उमेदवारी नाकारण्याचं एक कारण असल्याचं बीबीसी मराठी प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी सांगितलं.

अनिल शिरोळे यांनी बापटांना सहकार्य करू असं जाहीर केलं आहे. "मी भाजपच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांपैकी एक आहे. पक्षाने माझ्या उमेदवारीबद्दल घेतलेला निर्णय मला मान्य आहे. गिरीश बापट यांना निवडून आणण्यासाठी सहकार्य करू." पुण्यातील बरीचं काम केंद्र सरकारकडून मार्गी लावली आहेत, असं ते म्हणाले. मी 1992पासून भाजपचा सदस्य आहे आणि पक्षाने मला विविध जबाबदाऱ्या आजवर दिल्या आहेत, पण जी जबाबदारी देईल ती मी पूर्ण करेन असं ते म्हणाले आहेत.

गिरीश बापटांची शक्तिस्थळं

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार गिरीश बापट यांनी पुणे शहरात कामाचा धडाका लावला आहे. बापटांच्या शक्तिस्थळांविषयी शैलेंद्र परांजपे यांनी अधिक माहिती दिली.

"बापट पाचवेळा आमदार आहेत. ज्या काळात भाजपला कोणतीही पदं मिळाली नाही त्यावेळी बापटांनी महत्त्वाची पदं भूषवली आहेत. भाजपमधून पाचवेळा आमदार झालेले बापट यांनी जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला. त्यांचे सर्वपक्षीय संबंध चांगले आहेत. विशेषत: अजित पवार आणि शरद पवार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत."

Image copyright Facebook@Girish Bapat

गिरीश बापटांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांची काम करण्याची शैली विशेष आहे. त्यांच्या कार्यालयात एक पाटी आहे. त्यावर, "तुमचं काय काम आहे ते सांगा, ते कसं करायचं ते मी पाहतो" असं लिहिलं आहे. गेली अनेक वर्षं ते वाढदिवसाला शुभेच्छापत्रं पाठवतात, असं परांजपे म्हणाले.

निवडणुकीचे मुद्दे कोणते?

पुणे लोकसभा मतदारसंघात विकास हा मुद्दा सध्या जोरावर आहे. अनिल शिरोळे यांना फारशी छाप पाडता आली नाही, त्याचा नकारात्मक परिणाम बापट यांच्या उमेदवारीवर होऊ शकतो, असं काही विश्लेषकांना वाटतं. पुणे महापालिका भाजपकडे आहे. त्याचा जसा बापट यांना लाभ होईल, तसंच महापालिकेतील राजकारणातून निर्माण होणारी नाराजीही बापटांना सोसावी लागणार आहे.

पुणे महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना, पिंपरी चिंचवड येथे पोलीस आयुक्तालय, पुणे मेट्रोचं, पाणीपुरवठा, रस्त्याची कामं, तसंच सार्वजनिक वितरण व्यवस्था हे मुद्दे बापट प्रचारात प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करतील.

Image copyright Pune Metro
प्रतिमा मथळा मेट्रो हा पुणे लोकसभा मतदारसंघात महत्त्वाचा मुद्दा आहे.

असं असलं तरी एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून बापट यांना स्वतःची प्रतिमा अजूनही निर्माण करता आलेली नाही, असं विश्लेषण बीबीसी प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर करतात.

काँग्रेससमोर आव्हानं कोणती?

पुण्यात काँग्रेसची ठरलेली व्होटबँक आहे. दोन तीन लाख मतं त्यांना मिळतात. गेल्यावेळी विश्वजीत कदम हे बाहेरचे उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकदही काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर असेल. शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काही हक्काची मते या मतदारसंघात आहेत. राज ठाकरे यांनी भाजपला विरोधाची भूमिका घेतली आहे. त्याचाही फायदा काँग्रेसला होऊ शकतो, असं विश्लेषकांना वाटतं.

Image copyright Facebook@Arvind Shinde
प्रतिमा मथळा काँग्रेसतर्फे अरविंद शिंदेचं नाव आघाडीवर आहे.

काँग्रेसतर्फे पुण्यातून मोहन जोशी, अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड यांची नावं चर्चेत आहे. मात्र मोहन जोशी यांचा एकदा पराभव झाला आहे. तसंच ते राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य आहेत. सध्याची स्थिती पाहता अरविंद शिंदेचं पारडं जड असल्याचं बोललं जातं. अरविंद शिंदे ते पुणे रेल्वे स्थानक परिसराचे नगरसेवक आहेत.

काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)