मनोहर पर्रिकर यांचे भाऊ किराणा मालाचं दुकान चालवतात?

सुरेश पर्रिकर Image copyright SM VIRAL POST

भारताचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला जात आहे. मनोहर पर्रिकर यांचे भाऊ गोव्यामध्ये एक साधं किराणा मालाचं दुकान चालवतात असं त्यात म्हटलं आहे.

परंतु फेसबुक आणि शेअरचॅटवर काही ग्रुप्समध्ये हा फोटो शेअर करून हा केवळ प्रचार असून फोटोतील व्यक्ती पर्रिकर यांचा भाऊ नसल्याची दावा करण्यात आला आहे. यापूर्वी काही लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाऊ चहा विकतात असा फोटो शेअर केला होता. मात्र या व्यक्तीचा योगी आदित्यनाथ यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्रिपद चार वेळा भूषवणाऱ्या मनोहर पर्रिकर यांचे 17 मार्च रोजी वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. त्यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर होता.

Image copyright SM VIRAL POST

गोव्याच्या प्रशासनावर पर्रिकरांचा ठसा कायम राहील, असं त्यांचे प्रशंसक म्हणतात. त्यांच्या साध्या राहाणीबद्दल पक्षातील लोक आणि विरोधकही त्यांचा आदर करत होते. एखाद्या रांगेत उभ्या असलेल्या पर्रिकरांची छायाचित्रे सोशल मीडियावर पाहाता येतात.

आता शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये एक तरुण मुलगा दिसत असून त्याच्या मागे किराणा दुकानामध्ये एक व्यक्ती बसलेली दिसते. ही व्यक्ती म्हणजे मनोहर पर्रिकर यांचे भाऊ असल्याचा दावा केला जातो.

उजव्या विचारांच्या काही गटांनी हा फोटो प्रसिद्ध करून काँग्रेसच्या नेत्यांचे परिवार आणि भाजपा नेत्यांचे परिवार यांच्या जीवनशैलीची तुलना केली आहे.

Image copyright SM VIRAL POST

परंतु काही लोकांनी या फोटोबरोबर केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. एका व्यक्तीने "पर्रिकर बंधूंचा कोट्यवधी रुपयांचा व्यापार आहे. 2014 मध्ये त्यांच्या परिवाराकडे साडेतीन कोटी रुपये होते. फोटोमधील व्यक्ती मनोहर पर्रिकर यांची भाऊ नाही. हा लोकांची फसवणूक करणारा प्रकार आहे," असं लिहिलं आहे.

या दाव्याची पडताळणी

या दाव्याची पडताळणी केल्यावर तो सत्य असल्याचं दिसून आलं. या फोटोतील किराणा मालाच्या दुकानात बसलेली व्यक्ती मनोहर पर्रिकर यांचे भाऊ सुरेश पर्रिकर आहेत.

Image copyright AKHIL PARRIKAR
प्रतिमा मथळा मनोहर पर्रिकर

बीबीसीने या फोटोची सत्यता पडताळण्यासाठी सुरेश पर्रिकर यांचे पुत्र अखिल पर्रिकर यांच्याशी चर्चा केली. 61 वर्षांचे सुरेश पर्रिकर उत्तर गोव्यातील म्हापसा मार्केटमध्ये 'गोपाळकृष्ण प्रभू पर्रिकर' नावाचं किराणा मालाचं दुकान चालवतात असं अखिल यांनी सांगितलं. पूर्वी त्यांचे आजोबा म्हणजे मनोहर यांचे वडील हे दुकान चालवायचे असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)