लोकसभा 2019: काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राजू शेट्टी आल्याने कुणाला जास्त फायदा?

राजू शेट्टी
फोटो कॅप्शन,

राजू शेट्टी

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'संयुक्त पुरोगामी महाआघाडी'ची घोषणा शनिवारी करण्यात आली. यात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमान पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि इतर काही पक्ष आणि संघटना मिळून एकूण 56 घटक आहेत, असं यावेळी सांगण्यात आलं.

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही पत्रकार परिषद घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ आणि राजू शेट्टींसह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.

"केंद्रात आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारनं शेतकरी, कष्टकरी यांना फसवलं आहे. सामाजिक आणि धार्मिक ऐक्य धोक्यात आणलं आहे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही या आघाडीत सामील झालो आहोत," असं शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी यांच्या युतीत सामील होण्याबद्दल भाजप नेते विनोद तावडे म्हणाले, "केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला, असं राजू शेट्टी म्हणतात. प्रत्यक्षात केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला.

"असं असताना ज्या राजू शेट्टींना शरद पवार अविश्वासू वाटायचे, चोरांचा राजा आणि जातीयवादी वाटायचे, त्या शरद पवारांच्या महाआघाडीमध्ये आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या शरद पवारांच्या मांडीला लाऊन शेतकऱ्यांचा नेता म्हणणारा नेता का बसला? अशी कोणती मजबुरी होती, हे त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना स्पष्ट केले पाहिजे.

"बारामतीला शेतकऱ्यांच्या प्रश्नी आंदोलन करणारा शेतकऱ्यांचा नेता त्या बारामतीच्या चरणी जात आहे, असे शेतकऱ्यांचे वाईट चित्र कधीही नव्हते. ते राजू शेट्टींच्या कृतीमधून दिसते आहे," अशी टीका तावडेंनी केली.

'राजू शेट्टींमुळे आघाडीलाच फायदा'

यावर बोलताना महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणाले, "ज्यावेळी राजू शेट्टी हे भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणाचं कारण सांगून NDA मधून बाहेर पडले आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोर्चे काढले, तेव्हाच राष्ट्रवादीसह आघाडीतल्या सर्व नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. म्हणजे शेट्टींना साथ द्यायची, हे आघाडीच्या नेत्यांमध्ये तेव्हाच स्पष्ट झालं होतं."

"प्रश्न होता तो राजू शेट्टींच्या दोन जागांच्या मागणीचा. त्यांची ही मागणी काही अवास्तव नव्हती. दोन्ही जागा निवडून आल्या तर आपल्या पक्षाला निवडणूक चिन्ह मिळेल, अशी त्यांना आशा आहे. म्हणून त्यांचा दोन जागांचा हट्ट होता, जो आघाडीने पुरवला," असंही ते सांगतात.

पण महाआघाडीकडून राजू शेट्टींना हातकणंगलेशिवाय दुसरी जागा कुठली असेल, हे अद्याप स्पष्ट नाही. ही दुसरी जागा सांगलीची असू शकते, अशी शक्यता सर्वत्र वर्तवण्यात येत आहे.

पण सांगलीची जागा पारंपरिकरीत्या काँग्रेसची राहिली आहे, त्यामुळे या जागेचं काय करणार, हा प्रश्न उरतोच, असंही चोरमारे म्हणाले.

राजू शेट्टी महाआघाडीत आल्यामुळे फायदा कुणाचा, यावर ते म्हणाले, "पश्चिम महाराष्ट्रात हातकणंगले ही जागा राजू शेट्टींची आहेच. शिवाय सोलापूर, माढा, सातारा आणि अगदी बारामतीसारख्या काही जागांवर राजू शेट्टींमुळे महाआघाडीला फायदा होईल."

आघाडीच्या घोषणेत सरकारवर टीका

या आघाडीमधील जागावाटपाबद्दल सांगताना चव्हाण म्हणाले, काँग्रेस 24 जागांवर लढत आहे तर राष्ट्रवादी 20 जागांवर लढत आहेत. त्यापैकी प्रत्येकी दोन-दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत.

"महाआघाडीत न आलेले पक्ष भाजपची बी-टीम असल्याची आणि त्यांना भाजप-सेनेला फायदा करून द्यायची, अशी शंका उपस्थित होते. महाआघाडी हेऊ नये, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. काहींनी तर टोकाची भूमिका घेतल्या," अशी टीका यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.

"भाजप-सेनेनं इतर पक्षांतील उमेदवार घेण्याचं कारण काय होतं, या उत्तर द्यावं," असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Facebook पोस्टवरून पुढे जा, 1

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त, 1

"समाजात भांडणं लावायचं काम भाजप-सेना सरकारनं केलं आहे. राज्यात पुन्हा एकदा चांगले दिवस आणण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत," असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

या पत्रकार परिषदेत सामील झालेल्या नेत्यांनी एकेक करून सरकारवर यावळी घाणाघाती टीका केली.

  • भाजप आणि संघ परिवार साम-दाम-दंड-भेदाचं राजकारण करत आहे. काही जण याला बळी पडत आहे. भाजपनं एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. या सरकारनं जनतेचा विश्वासघात केला आहे. या सर्व कारभाराला सामान्य माणूस कंटाळला आहे.
  • सरकारनं उद्योगधंदे बुडीत काढून बेरोजगारीत वाढ झाली आहे. कृषीव्यवस्था उद्ध्वस्त झाली असून शेतकरी आत्महत्यांत वाढ झाली आहे.
  • ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ करण्यात आला आहे. सरकारच्या कर्जमाफीचा फायदा झालेला नाही. कर्ज माफ झालेल्या 89लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, अशी आमची मागणी आहे.
  • मराठा, धनगर, मुस्लीम समाजाची फसवणूक. मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा भविष्य चिंतेत आहे.
  • आदिवासींच्या सवलती लागू करू, असं म्हणून धनगर समाजाची फसवणूक करण्यात आली आहे. मुस्लीम समाजाला सरकारनं जाणीवपूर्वक आरक्षण दिलेलं नाही.
  • विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, महिलांवरी अत्याचारात दुपटीनं वाढ झाली आहे.
  • घटनात्मक संस्थांवर घाला घालण्याचं काम सरकार करत आहे, माध्यमांवर प्रचंड दडपण आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महाआघाडीच्या घोषणेविषयी बोलताना म्हणाले, "काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची आज पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेतूनच कळलं 56 इंच छाती असणाऱ्या नेत्याच्या विरोधात 56 पक्ष आणि संघटना महाराष्ट्रात एकत्र आल्या आहेत. पण असं झालं तरी महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचा कुठेही टिकाव लागणार नाही, हे वास्तव आहे."

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांसाठी चार टप्प्यांमध्ये - 11, 18, 23 आणि 29 एप्रिल रोजी - मतदान होणार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)