नरेंद्र मोदींविरोधात 111 तामीळ शेतकरी लढणार : #5मोठ्याबातम्या

नरेंद्र मोदी, भाजप Image copyright EPA
प्रतिमा मथळा पंतप्रधान नरेंद्र मोदी

महत्त्वाची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:

1. पंतप्रधान मोदींविरोधात 111 शेतकरी निवडणूक लढवणार

विविध मागण्यांसाठी राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या तामिळनाडूतील शेतकऱ्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून 111 शेतकरी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

तामिळनाडूतील शेतकरी पी.अय्यकन्नू यांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली. अय्याकन्नू हे नॅशनल साऊथ इंडियन रिव्हर्स इंटरलिंकिंग फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. शेतमालाला योग्य किंमत मिळावी या मागणीसाठी शेतकरी उत्तर प्रदेशातून लढणार आहेत.

दोन वर्षांपूर्वी अय्याकन्नू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. शेतमालासंदर्भात मागण्या पूर्ण केल्या जातील असं आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात घेतल्यास वाराणसीतून लढण्याचा निर्णय मागे घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं.

2. बाहेरून आलेल्या नेत्यांमुळे पक्षाची ताकद वाढणार-पंकजा मुंडे

इतर पक्षातील मोठे नेते भाजपमध्ये आल्याने पक्षाची ताकद वाढण्यास मदतच होणार आहे अशा शब्दांत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपमधील आयाराम संस्कृतीचे समर्थन केलं. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

प्रतिमा मथळा पंकजा मुंडे

पक्ष संघटना अपयशी ठरण्याचा प्रश्न नाही. निवडून येऊ शकतील असे इतर पक्षातील चांगले नेते भाजपमध्ये येत असल्याने पक्ष संघटनेचीच ताकद वाढत आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील चांगल्या नेत्यांना घेण्याचं धोरण आहे असं पंकजा यांनी स्पष्ट केलं.

3. आमचा युतीला उघड पाठिंबा, आंबेडकर छुपी मदत करतात- आठवले

राज्यात भाजप-शिवसेना सत्तेत असूनही आम्हाला सत्तेत पुरेसा वाटा मिळालेला नाही. सत्तेत वाटा मिळायला हवा पण त्यासाठी आम्ही युतीतून बाहेर पडणार नाही असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं.

प्रतिमा मथळा रामदास आठवले

आम्ही युतीमध्ये आहोत. त्यामुळे आमचा शिवसेना-भाजप युतीला उघड पाठिंबा आहे. पण प्रकाश आंबेडकरही छुप्या पद्धतीने युतीलाच मदत करणारी भूमिका घेत आहेत असं त्यांनी पुढे सांगितलं. 'लोकमत'ने याबाबत बातमी दिली आहे.

4. औरंगाबादेत आमदार सत्तार यांचे बंड

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. आता माझा काँग्रेसशी संबंध नसून, अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 'पुढारी'ने ही बातमी दिली आहे.

''मी कोणावरही नाराज नाही, लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. मीही अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार नाही. मनधरणी करण्यासाठी वरिष्ठांचे निरोप येतील, पण आता माघार घेणार नाही. आमखास मैदानावर लवकरच समर्थकांचा मेळावा घेऊन निवडणुकीचं बिगुल फुंकणार आहे'', असं त्यांनी सांगितलं.

5. राज्यातली भूजल पातळी जानेवारीतच खालावली

राज्याला येत्या काही महिन्यात दुष्काळाचे चटके जाणवू शकतात याचा प्रत्यय भूजल सर्वेक्षणातून आला आहे. निम्म्या राज्यात भूजल पातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत जानेवारीतच घटल्याचं स्पष्ट झालं आहे. ग्राऊंडवॉटर सर्व्हे अँड डेव्हलपमेंट एजन्सीने गोळा केलेल्या माहितीनुसार 178 तालुक्यांमध्ये भूजल पातळी सरासरीच्या खाली गेल्याचं स्पष्ट झालं आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे. मराठवाड्यातील गावांना सर्वाधिक फटका बसला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)