शिवसेना, भाजप युतीच्या प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातून का होते?

भाजप, शिवसेना, युती, कोल्हापूर Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बाळासाहेब ठाकरे

'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो...' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या शैलीत भाषणाला सुरुवात करायचे आणि उपस्थितांतून घोषणा आणि टाळ्यांचा पाऊस सुरू व्हायचा. हे चित्र राज्यातील सर्वच भागांत दिसायचे. कोल्हापूर त्याला अपवाद नव्हतं.

किंबहूना शिवसेना आणि भाजप युतीने प्रचाराचा आरंभ करण्यासाठी नेहमी कोल्हापूरच निवडलं आहे. यावेळच्या निवडणुकीतही युतीने ही परंपरा कायम राखली आहे. यंदा ही सभा तपोवन मैदानावर होत आहे. 'तपोवन'सारख्या विस्तिर्ण माळावर सभा घेणं म्हणजे आव्हानचं असतं. शहरातील बिंदू चौक ते तपोवनवर सभा घेण्याइतकं बळ शिवसेना भाजपला जिल्ह्यात मिळालं आहे.

कोल्हापूर जिल्हा पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता, नंतर शहर शिवसेनेकडे आणि बाकी जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकहाती वर्चस्व अशी स्थिती पुढे बरीच वर्षं होतं.

सध्या कोल्हापुरात 6 आमदार शिवसेनेचे, 2 भाजपचे आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसचा अशी राजकीय परिस्थिती आहे. युतीच्या सभांना गर्दी होते, पण मतं मिळत नाहीत, अशी स्थिती कोल्हापुरात बरीचं वर्षं होती. तरीही इथं याच जिल्ह्यात युतीने सभा घेऊन प्रचाराचा प्रारंभ करण्याची प्रथा कायम ठेवली आहे.

बाळासाहेबांची पहिली सभा

6 मे 1986 रोजी शिवसेना पक्षाची कोल्हापूरमध्ये स्थापना झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांनी कोल्हापूर मध्ये अंबाबाई मंदिरात देवीचं दर्शन घेतले. त्याच दिवशी कोल्हापूरमधल्या बिंदू चौक इथं बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा झाली. बिंदू चौकात बाळासाहेबांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. बिंदू चौकातील सर्व वाहतूक यावेळी बंद करण्यात आली होती, अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार वेठे यांनी सांगितली. बाळासाहेबांबद्दल कोल्हापूरमध्ये वेगळेच आकर्षण होतं सुरुवातीला एक आमदार असलेल्या कोल्हापूर मध्ये आता शिवसेनेचे सहा आमदार आहेत. बिंदू चौकानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठीच्या आणि युतीच्या प्रचाराच्या सभा शहरातल्या गांधी मैदानावर होऊ लागल्या.

बाळासाहेबांची सभा उधळण्याचा प्रयत्नही कोल्हापुरातच

कोल्हापुरातील बाळासाहेब ठाकरेंच्या सभा प्रचंड गाजल्या. पण 1967मध्ये बाळासाहेबांची एका सभा उधळण्याचा प्रयत्न झाला होता, अशी नोंद आहे. महागाईविरोधात झालेल्या आंदोलनात प्राण गमावलेल्या कार्यकर्त्यांबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर 1967ला बिंदू चौकात झालेली त्यांची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला होता. 2018मध्ये यांतील एक कार्यकर्ते एम. बी. पडवळे यांचा सत्कारही झाला होता. त्याकाळी कोल्हापूर जिल्ह्यात डाव्या पक्षांचं मोठं वर्चस्व होतं.

कोल्हापूरच का?

युतीच्या प्रचाराची सुरुवात कोल्हापूरमधून करण्याची आता प्रथाच झाली आहे, असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. करवीरनिवासिनी अंबाबाई ही बाळासाहेब ठाकरे यांचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी प्रचाराची सुरुवात कोल्हापूरमधून करण्याचा आग्रह केला तसंच भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचीही अंबाबाईवर श्रद्धा आहे त्यामुळं कोल्हापूरमधून प्रचाराचा नारळ फोडण्याचा मानस आम्ही व्यक्त केला, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

प्रतिमा मथळा सेना-भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटणार आहे.

श्रद्धा आणि वारसा

"महाराष्ट्र भावनिक आहे. त्यामुळं श्रद्धा ही राजकारणाची केंद्रबिंदू झालीय. युतीची पहिली जाहीर सभा कोल्हापूरमध्ये होण्यामागं दोन गोष्टी असू शकतात," असं राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांना वाटतं.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि शाहूची नगरी म्हणून कोल्हापूरला महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन युती कोल्हापुरात प्रचाराची सुरुवात करते, असं ते म्हणाले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अमित शहा, नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी

दुसरी गोष्ट म्हणजे अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळं हे शहर लोकांच्या श्रद्धाशी जोडलं आहे. कोल्हापूरमध्ये राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लोक येतात. त्यामुळं प्रचाराची सुरुवात कोल्हापूरमधून झाली हे अप्रत्यक्षपणे लोकांच्या चर्चेत राहू शकतं. कोल्हापूरमधून प्रचाराची सुरुवात करणं ही राजकीय पायंडा पडला आहे, असं ते म्हणाले.

त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादीकडूनही प्रचाराची सुरुवात कोल्हापूरमधून करण्याची घोषणा केली तर आश्चर्य वाटू नये, असं प्रकाश पवार यांना वाटतं.

कोल्हापूरातील दोन्ही जागा शिवसेनेच्या वाटेला

कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. यातील कोल्हापूर मतदारसंघात शिवसेनेची उमेदवारी संजय मंडलिक यांना मिळाली आहे. त्यांची लढत राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्याशी आहे. 2014मध्येही या दोन नेत्यांत लढत झाली होती. संजय मंडलिक माजी खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र आहेत. सदाशिवराव मंडलिक सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि 2009ला ते अपक्ष म्हणून निवडून आले. तर हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने शिवसेनेचे उमेदवार आहेत. धैर्यशील माने राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र आहेत. धैर्यशील माने यांची लढत विद्यमान खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी आहे. शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाठबळ आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)