गुरुग्राम ग्राउंड रिपोर्ट: 'मी मुसलमान आहे आणि भारतच माझा देश आहे'

दिलशाद
प्रतिमा मथळा दिलशादच्या डोक्याला दोन टाके पडले आहेत. हाताला फ्रॅक्चर आहे आणि त्याच्या अंगावर गंभीर जखमांच्या खुणा आहेत.

21 मार्च रोजी हरियाणातील गुरुग्रामच्या भूपसिंह नगरमध्ये मोहम्मद साजिद यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी भरदिवसा हल्ला केला आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. या घटनेचं व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर देशभरातून त्यावर आक्रोश व्यक्त करण्यात आला. बीबीसी हिंदीच्या कीर्ती दुबे यांनी भूपसिंह नगरला भेट दिली आणि त्या दिवशी तिथे नेमकं काय घडलं आणि या घटनेचे पडसाद कसे उमटले, यांचा आढावा घेतला.

"मी हे घर सोडून माझ्या गावाला निघून जाईन. माझ्यासमोर माझ्या लहानलहान मुलांना त्यांनी मारलं, मी फक्त पाहू शकलो, मी काहीच करू शकलो नाही. मला इथं राहायचंच नाही. या घरासाठी मी लोकांकडून कर्ज घेतलं आहे. पण मला असं दहशतीत इथं राहायचं नाही," असं सांगता सांगता बाजेवर झोपलेले मोहम्मद साजिद यांना रडू कोसळलं.

त्यांच्याजवळ बसलेला एकजण त्यांचे डोळे पुसले. साजिद यांच्या हाताला प्लॅस्टर घातलं आहे आणि त्यांच्या पायांवरही मोठ्या जखमा आहेत. त्यांची अशी अवस्था का झाली? त्यांची काय चूक झाली हे त्यांनाही माहिती नाही.

21 मार्च देशभरात होळीचा सण साजरा केला जात होता. एकमेकांमधला बंधुभाव आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा सण मानला जातो. पण जेव्हा लोक एकमेकांना रंग लावून गळामिठी घेत होते, तेव्हा मोहम्मद साजिद यांनी मात्र समाजाचं एक हिंसक रूप पाहिलं.

पण पोलीस याला धार्मिक द्वेषातून घडलेली घटना मानत नाही आहेत.

प्रतिमा मथळा मोहम्मद साजिदच्या हाताला फ्रॅक्चर घातलं आहे, तसंच अनेक जखमा झाल्या आहेत. या घरात राहायचंच नाही असं त्याचं म्हणणं आहे.

गुरुग्रामच्या भौंडसी ठाण्यांतर्गत येणाऱ्या भूपसिंह नगरमध्ये साजिद आणि त्याच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा व्हीडिओ तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियावर पाहिला असेल.

या मारहाणीत जखमी झालेले मोहम्मद साजिद यांचे भाचे दिलशाद यांनी सांगितलं की, गुरुवारी संध्याकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास 'नया गाव'मधून 25-30 लोक लाठ्या-काठ्या आणि भाले घेऊन त्यांच्या घरात आले. तिथे त्यांनी दिलशाद, समीर, शादाब यांच्यासह 12 जणांना मारहाण करत रक्तबंबाळ केलं.

साजिद यांचा मुलगा शादाबवर सफदरगंज हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

या व्हीडिओमध्ये काही लोक मोहम्मद साजिदला काठीने मारहाण करताना दिसतात. त्यात एक महिला साजिदला वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसते आणि त्याचवेळेस लोक तिलाही मारताना दिसतात. काही मुलं गच्चीचा दरवाजा बंद करून स्वतःला वाचवताना दिसतात आणि एका मुलीच्या किंकाळ्याही ऐकू येतात.

21 वर्षांच्या दानिस्ताने हा व्हीडिओ तयार केला, तेव्हा हा व्हीडिओ शेअर करता येईल की नाही, हेसुद्धा तिला माहिती नव्हतं. दानिस्ता आपल्या काकांकडे होळीचा सण साजरा करायला आली होती. ती स्वयंपाक करत असताना लोक त्यांच्या घरात घुसले, त्यावेळेस तिच्या भावाचा म्हणजे इर्शादचा फोन तिच्या हातात होता.

प्रतिमा मथळा 21 वर्षांच्या दानिस्ताने व्हीडिओ तयार केला

दानिस्ता सांगते, "जेव्हा ते लोक मारहाण करत होते तेव्हा माझ्या हातात फोन होता. या घटनेचा व्हीडिओ तयार केला पाहिजे, असं मला वाटलं. आम्ही बहीण-भाऊ दुसऱ्या मजल्यावर छतावर गेलो आणि रेकॉर्डिंग सुरू केलं. मी व्हीडिओ तयार करत असल्याचं दिसल्यावर ते लोक ओरडले 'त्या मुलीला फोनसकट फेकून द्या!'.

"मी घाबरले. मला काहीही करून फोन वाचवायचा होता. मी जवळ पडलेल्या दोन विटांमध्ये फोन लपवला. मला मारलं तरी व्हीडिओ पुरावा म्हणून राहिल असा मी विचार केला. परंतु ते दरवाजा तोडू शकले नाहीत.

मोहम्मद साजिद आपल्या कुटुंबीयांसह 15 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून रोजगार मिळवायला गुरुग्राममध्ये आले. इथल्या घसोला गावात त्यांचं गॅस रिपेअरिंगचं दुकान आहे. चांगलं आयुष्य मिळावं, यासाठी ते गाव सोडून शहरात आले. पण त्यामुळं मनात खोलवर अशी दहशत बसेल, असं वाटलं नव्हतं.

'इथं का खेळत आहात? पाकिस्तानात जाऊन खेळा'

गुरुग्रामचे पोलीस आयुक्त मोहम्मद अकील यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "हा सगळा वाद क्रिकेटमुळे सुरू झाला. नंतर हा वाद वाढत गेला आणि मारहाणीपर्यंत गेला. दोन्ही बाजूंनी मारहाण केली. हो, एका बाजूनं जास्त मारहाण केली आहे आणि आम्ही अज्ञात लोकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. एका व्यक्तीला अटक केली आहे. तपास सुरू असून आणखी काही लोकांना अटक होऊ शकते."

प्रतिमा मथळा तोडफोड झालेलं साजिदचं घर

गुरुग्राम पोलीस विभागाचे जनसंपर्क अधिकारी सुभाष बोकेन यांनी सांगितलं, "दिलशाद नावाच्या व्यक्तीनं अज्ञात लोकांविरोधात तक्रार नोंदवली आहे. पुरावे आणि व्हीडिओच्या आधारे महेश नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

हे प्रकरण भादंविच्या 147 (दंगल भडकवणे), 148 (बेकायदेशीर सभा), 452 (अतिक्रमण), 506 (धमकी देणे) आणि 307 (हत्येचा प्रयत्न) या नियमांतर्गत नोंदवले गेले आहे.

हरियाणाचे पोलीस महासंचालक मनोज यादव सांगतात, "हे अत्यंत दुर्दैवी आहे. पण हे प्रकरण धार्मिक आहे, असं मला वाटत नाही. दोन गटांच्या आपसातील भांडणाला धार्मिक प्रकरण म्हणणं चूक ठरेल."

पोलिसांनुसार क्रिकेट खेळताना दोन गटांमध्ये बाचाबाची झाली आणि हे प्रकरण मारहाणीपर्यंत गेलं. दोन्ही गटांनी मारहाण केली आहे. परंतु एका गटानं घरात घुसून मारहाण केली आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

परंतु पोलिसांचं म्हणणं आणि पीडित कुटुंबाची कहाणी यांच्यात तफावत आहे.

प्रतिमा मथळा घराच्या तुटलेल्या काचा

मारहाणीत जखमी झालेला दिलशाद सांगतो, "घरात एकूण 17 लोक होते. आम्ही सगळे घराबाहेर क्रिकेट खेळत होतो. इतक्यात मोटरसायकलवरून दोन लोक आले आणि 'मुल्ले, इथं का खेळत आहात? पाकिस्तानात जाऊन खेळा!' असं म्हणाले.

"आम्ही बॉल आणि बॅट त्यांना दिली. इतक्यात माजिदचाचा तिथं आले आणि काय झालं, असं त्यांनी विचारलं. त्यांनी हे विचारताच मोटरसायकलस्वारानं त्यांना थप्पड लगावली आणि म्हणाला, 'तू कोण आहेस? घर कुठं आहे तुझं?'

"आम्ही इथंच राहातो, असं त्यांनी उत्तर दिलं आणि त्यानंतर आम्ही घरात आलो. थोड्याच वेळात दोन मोटरसायकलवर 6 लोक आले. त्यातील एकानं चाचांकडं बोट दाखवून 'हाच तो' असं म्हणाला. हे सांगताच त्यांनी आम्हाला मारायला सुरुवात केली. त्यांच्यामागे अनेक लोक होते. त्यांच्याकडे काठी-भाल्यांसह दगडही होते. त्या लोकांनी घरावर दगडफेक सुरू केली."

व्हायरल व्हीडिओमध्ये दिसणारे आणि मुख्य पीडित मोहम्मद साजिद सांगतात, "ते लोक लोखंडी दरवाजावर जोरजोरात धक्के मारत बसले. दरवाजा उघडत नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी खिडकीचं ग्रील तोडलं आणि छतावर आले. या लोकांनी मला काठीनं असं काही मारलं की त्याची आठवण आली तरी थरकाप उडतो. आम्ही मुसलमान आहोत आणि भारतात राहाणारे आहोत. पाकिस्तानशी आमचं काय नातं आहे?"

"मला एक फोन आला आणि केस मागे घेण्यासाछी दबाव येत आहे. प्रकरण आपापसात सोडवा, असं सांगितलं जात आहे. मी काहीच निर्णय घेणार नाही. जर प्रशासनानं मला मदत केली नाही तर मुलांसकट मी आत्महत्या करेन. ही जागा सोडून जाईन," ते म्हणाले.

प्रतिमा मथळा पाच वर्षांची अफिफा होळीसाठी आजोबांकडे आली होती.

वरच्या बाजूस एक मुलगी खेळताना दिसली. तिच्या चेहऱ्यावर एक जखम होती. ही जखम कशी झाली, असं विचारल्यावर ती म्हणाली, "होळीवाल्या काकांनी सगळ्यांना मारलं. मलाही मारलं. ते अंकल लोक परत येणार का?"

पाच वर्षांची अफीफा आपल्या आजोबांच्या घरी आली होती. ती सांगते, "ते काकालोक वर आले आणि कडी तोडून ते इथं आले. त्यांनी आजोबांना मारलं. हे लागलेलं रक्त आजोबांचंच आहे. मी तिथं लपले होते. काकांनी मला आणि मुन्नीला मारलं. गेटही तोडलं."

'गावात बदमाश मुसलमानांना राहू देणार नाहीत'

या प्रकरणात एका व्यक्तीला अटक झाली आहे. त्याचं नाव महेश आहे. महेश जवळच्याच नया गावचा रहिवासी आहे. आम्ही त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याची 17 वर्षांची बहीण तिथे होती. तिने आमच्याशी बोलायला नकार दिला.

यानंतर आम्ही आजूबाजूच्या स्थानिक लोकांना विचारलं, तेव्हा सुरुवातीला त्यांनी बोलायला नकार दिला. परंतु नंतर नाव न सांगण्याच्या अटीवर ते सांगू लागले.

एक स्थानिक तरुण म्हणाला, "हे लोक गुंड-बदमाश आहेत. आजपर्यंत मुसलमान राहात होते. कधीही वाद झाला नाही. हे बदमाश यात घुसले आहेत. सर्वांची मुलं पळून गेली आहेत, लपून बसले आहेत. दोन दिवसांनंतर पंचायत भरेल.

"या गावात बदमाश मुसलमानांना राहू देणार नाही, असं गावातला प्रत्येक मुलगा म्हणेल. या लोकांनी घरांमध्ये शस्त्र ठेवली आहेत. या गावात राहायचं असेल तर पंचायतीची माफी मागावी लागेल. जो माफी मागणार नाही, त्याच्यावर गाव बहिष्कार टाकेल आणि त्यांचं हुक्का-पाणी बंद होईल."

प्रतिमा मथळा नया गावचे स्थानिक

दुसऱ्या एका स्थानिकाशी बोलल्यावर त्याने सांगितलं, "साजिद यांचा परिवार क्रिकेट खेळत असताना दोन मुलांच्या गाडीने त्यांना थोडीशी जखम झाली. त्यावरून त्यांना मारहाण करण्यात आली. मग इथल्या एका ज्येष्ठ नागरिकाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही त्या मुसलमानांनी बॅटने मारलं. यानंतर गावातली पोरं तावातावात त्यांच्या घरी पोहोचले."

नया गाव परिसर गुर्जरबहुल आहे. इथल्या लोकांचं म्हणणं आहे की हे भांडण मुलांमधलंच होतं आणि याला उगाचच धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण तेवढ्यात तिथे उपस्थित एक आजोबा म्हणाले, "या देशात हिंद देशद्रोही आहेत आणि मुसलमानच चांगले. देशात हिंदूंचा आवाज दाबला जातोय आणि फक्त मुसलमानच सत्य बोलत आहेत, असं वाटतंय."

यावरून खरंच हा पेच पडतो की ऐन होळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेला धार्मिक रंग कोण लावू पाहत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)