लोकसभा 2019: कोल्हापुरात युतीची तर कराडमध्ये आघाडीची सभा, बड्या नेत्यांची एकमेकांवर आगपाखड

अंबाबाईचं दर्शन घेताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस Image copyright Twitter / Dev_Fadnavis
प्रतिमा मथळा अंबाबाईचं दर्शन घेताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

आज कोल्हापुरातून भाजप-शिवसेना युतीच्या प्रचाराची सुरुवात झाली तर दुसरीकडे साताऱ्यात 'संयुक्त पुरोगामी महाआघाडी'ची जाहीर सभाही पार पडली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर प्रचंड आगपाखड केली आणि अशा प्रकारे महाराष्ट्रात अखेर लोकसभेची रणधुमाळी जोरात सुरू झाली.

शिवसेना आणि भाजप युतीने प्रचाराचा आरंभ करण्यासाठी नेहमी कोल्हापूरच निवडलं आहे. यावेळच्या निवडणुकीतही युतीने ही परंपरा कायम राखली आहे.

कोल्हापूरातल्या सभेपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकात पाटील, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे तसंच अन्य नेत्यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

यानंतर तपोवन मैदानावर झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

युतीच्या सभेत कोण काय म्हणालं?

"'गली गली में चोर है', असं म्हणणारे आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत," अशी टीका सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री, यांनी सभेत बोलताना, नाव न घेता राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे. "आपला उमेदवार नरेंद्र मोदी आहे, देवेंद्र फडणवीस आहेत, असं समजून मत द्या," असंही ते म्हणाले.


कोल्हापूरचे पालकमंत्री आणि भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, "मागच्या वेळेस आम्ही 42 जागा जिंकल्यात. चार जागांच्या आधारावर शरद पवार दिल्लीत राजकारण करत आहेत.

Image copyright Swati Patil-Rajgolkar

"शरद पवारांनी पोरीला आणि नातवाला राजकारणात ढकलू नये. अजूनही वेळ गेलेली नाही. पश्चिम महाराष्ट्रात युतीचे 10चे 10 उमेदवार निवडून येतील," असं ते म्हणाले.


यानंतर, मंचावर आले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीतून युतीसाठी प्रचार केला.

भाजप आणि सेनेचा जमलाय सूर,म्हणून आज माझं भरून आलंय ऊर.

फडणवीस आणि ठाकरे यांची जमलीय जोडी,पण माझ्याकडे कुठे आहे लोकसभेची गाडी.


यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "एकीकडे आमची युती झाली आम्ही पुढे निघालो. त्यांचं मात्र काय सुरू आहे, त्यांचं त्यांनाच कळत नाही. 56 पक्ष अस्तित्वात तरी आहेत का? कुणीही रस्त्यावर भेटलं त्याला यांनी स्टेजवर बसवलं आणि सोबत घेतलं. 56 पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही, त्यासाठी 56 इंचाची छाती लागते." 

"आम्ही 5 पांडव आहोत, पण इतके मजबूत आहोत की कुणी तोडू शकत नाही," अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केली.

शरद पवार यांच्यावर हल्ला चढवत फडणवीस म्हणाले, "त्यांच्या कॅप्टनने देखील माढ्यातून माघार घेतलीय. त्यांना उमेदवारही मिळत नाहीये. तिकिटं बदलली जात आहेत.

Image copyright Twitter / @BJP4Maharashtra
प्रतिमा मथळा सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस

"केवळ नावामध्ये राष्ट्रवादी असून राष्ट्रवाद येत नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. आमचं हिंदुत्व संकुचित नाही," असंही ते म्हणाले.

"गेल्या 15 वर्षांत त्यांनी जितकं काम केलं नाही, तितकं आम्ही गेल्या 5 वर्षांत केलं. आम्ही विदर्भ, मराठवाडा कुणावरही अन्याय केला नाही. पश्चिम महाराष्ट्रासाठीही सर्वाधिक निधी आणला." 

"'जाणत्या राजा'नं उसाकरिता जेवढे निर्णय घेतले नाही, तेवढे मोदींनी घेतले. आमच्या चार वर्षांच्या काळात FRPसाठी आंदोलन करावं लागलं नाही. आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना FRP मिळतेय," असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांना लक्ष्य करताना फडणवीस म्हणाले, "अलीकडच्या काळात बारामतीचा पोपट बोलायला लागलाय. आमचे कपडे कुणी उतरवू शकत नाही. विधानसभा, महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमचे कपडे उतरलेत. मुंबईतही उद्धव ठाकरेंनी तुमची लंगोट उतरवलीय. कुणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा दुपारी शांत घरी बसा आणि मोदी पंतप्रधान कसे होतात, ते पाहा."


युतीच्या पहिल्याच जाहीर सभेत बोलताना शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांच्याकडे सत्ता दिली तर त्यांच्याकडे चेहराही नाही. अभिमानानं सांगा, आम्ही युतीचे मतदार आहोत, कारण आमच्याकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरलाय, ते म्हणजे नरेंद्र मोदी.

Image copyright Twitter / @ShivSena
प्रतिमा मथळा शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे

"काँग्रेस राष्ट्रवादीतील बडे नेते आज शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना मात्र आता भाजपमध्ये घेऊ नका," असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

"शरद पवारांना फक्त खुर्ची दिसतेय, बाकी त्यांना काही नको. आम्हाला सत्ता, खुर्ची पाहिजे, ती गोरगरीब जनतेचं भलं करण्यासाठी. देव, देश आणि धर्माच्या भल्यासाठी सत्ता पाहिजे. आम्ही सत्तेत आल्यावर राम मंदिर उभारल्याशिवाय राहणार नाही. हे राम राज्य आहे, हे सांगण्यासाठी मला राम मंदिर हवं आहे," असं ठाकरे म्हणाले.

"मुख्यमंत्र्यांनी कामासंबंधी शब्द दिला, तो पार पाडलाय. मला त्यांचा अभिमान वाटतोय," असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

तर दुसरीकडे कराडमध्ये शनिवार घोषणा झालेल्या 'संयुक्त पुरोगामी महाआघाडी'ची सभा होत आहे. या सभेला काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, जोगेंद्र कवाडे आणि इतर नेते उपस्थित आहेत.

आघाडीच्या सभेत कोण काय म्हणालं?

या सभेत बोलताना महाआघाडीतल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतेराजू शेट्टी म्हणाले, "'अच्छे दिन' काही आलेले नाही. लुच्च्या माणसाचे दिन आमच्या वाट्याला आले. मोदींनी शेतकरी सन्मान नाही तर शेतकरी अवमान योजना आणली. प्रत्यक्षात या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांची दमछाक झाली. दुसरीकडे बँकांनी सहकार्य केलं नाही."

"महाराष्ट्र दुष्काळ जाहीर करून तीन महिने झाले. पण त्यासाठीच्या उपाययोजना होताना दिसत नाही," असंही ते म्हणाले. 


साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे.

या सभेत मग माईक हाती घेतला साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी. त्यांनाच यंदाही उमेदवारी देण्यात आली आहे. "या व्यासपीठावर उपस्थित सर्व जण एका विशिष्ट विचाराने उपस्थित आहेत. जेव्हा लोक एका विचाराने एकत्र येतात, तेव्हा त्यांचं उद्दिष्ट एकच असतं, म्हणून त्यांना एकत्र ठेवायला कुठल्या ताकदीची गरज भासत नाही."

"पण जेव्हा लोक आपापल्या स्वार्थासाठी एकत्र येतात, तेव्हा ते त्यांच्या स्वार्थापुरतेच एकत्र असतात, स्वार्थ पूर्ण झाला की त्यांच्या वाटा वेगळ्या होतात," असं ते म्हणाले.

"हायटेक पद्धतीचा वापर करून सरकारनं लोकांची दिशाभूल केली. याला देशातली जनता बळी पडली,"

"अन्यायकारक GST लागू केला, पण व्यापारी हतबल झाले आहेत. जोपर्यंत सत्तांतर होत नाही, सरकारचे अन्यायकारक निर्णय बाजूला करता येणार नाही. उद्योगांची दुरवस्था झाली आहे," असंही ते म्हणाले.

"एक म्हण आहे, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो में अपने आप की भी नहीं सुनता," असं म्हणत भाषणाचा शेवट केला. 


यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेला संबोधित केलं. "सैनिकांच्या शौर्याचा लाभ तुम्ही स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी घेत आहात. त्यामुळे तुम्हाला तुमची जागा दाखवायची वेळ आता आलेली आहे." 

"सत्ता दिल्यास आठवड्याभरात धनगर आरक्षण देऊ, असं या सरकारनं म्हटलं होतं. मुस्लीम, मराठा, धनगर, जवान असं सगळ्यांना फसवलं." 

ज्याच्या मनगटात दम आहे, असा उमेदवार आज उदयनराजेंच्या रूपानं तुम्हाला दिलाय. तेव्हा देशाच्या संसदेत छत्रपतींचा आवाज पाठवा," असं आवाहन यावेळी पवारांनी केलं. 

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)