लोकसभा 2019: प्रतीक पाटील यांचा काँग्रेसला रामराम, पण वसंतदादा घराण्याची अधोगती कुणामुळे?

  • मोहसीन मुल्ला
  • बीबीसी न्यूज मराठी
फोटो कॅप्शन,

प्रतीक पाटील

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

"मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे. काँग्रेस पक्षाशी माझं नातं संपलं आहे," अशी घोषणा प्रतीक पाटील यांनी सांगलीतील एका मेळाव्यात बोलताना केली.

"काँग्रेसला आज वसंतदादांची गरज वाटत नाही. इथून पुढे वसंतदादांच्या नावानं सामाजिक क्षेत्रात काम करणार आहे आणि अद्याप तरी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

"दिल्लीत राहुलजींनी मी मंत्री झाल्यापासून आम्हाला भेट दिली नाहीये. त्यांना आता वसंतदादा काय समजणार. माझा संबंध सोनिया गांधींपर्यंत होता. आता त्यांनीही निवृत्ती घेतली म्हणून मीही रिटायर होतोय," असे ते वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.

Twitter पोस्टवरून पुढे जा, 1

Twitter पोस्ट समाप्त, 1

ABP माझा शी बोलताना प्रतीक पाटील म्हणाले, "काँग्रेसने आमच्या घराण्याला तीनदा संधी दिली आहे, दोन वेळा आम्ही निवडून आलो आहे. कधीच सांगलीची सीट अजूनतरी गेली नाही. पण मागच्या मोदींच्या वादळामध्ये आम्ही सीट गेलेली आहे. नाहीतर सांगली आम्ही कधीच हरलो नाही, तो बालेकिल्ला आहे आमचा."

"आज तिथे जायची गरज वाटत नाही आणि आम्ही जाऊही शकत नाही. वसंतदादांनी कधीच असं पाऊल घेतलं नाही. आमचे संबंध सर्वच पक्षांशी 100 टक्के चांगले राहिले आहेत. वसंतदादांनीही कुठल्याच पक्षाला वेगळं मानलं नाहीये. त्यामुळे आम्ही आमचं काम करत असताना दुसरीकडे जाण्याची गरज नाही. आमचं घर कधीच काँग्रेस सोडू शकत नाही."

"आम्ही लोकांसाठी काम करतोय आणि आम्ही सर्व एकजूट आहोत, यात कुठल्या ना कुठल्या चर्चेतून काही ना काही राजकीय घटना घडत असतात. आमचा अंतर्गत वाद वेगळा, पण पक्षासाठी काम करत असताना विश्वजीतही तेच करतो, मीही तेच करतो आणि माझा भाऊही तेच काम करतो. पक्ष म्हटलं तर आम्ही आमचे वाद मिटवून एकत्र येतो," असं ते म्हणाले.

सांगलीच्या जागेचा वाद

सांगलीचे खासदार राहिलेले प्रतीक पाटील यांनी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री अशी मंत्रिपदं भूषविली आहेत.

सांगलीच्या लोकसभेची जागावाटपावरून पाटील यांची नाराजी होती. शेतकरी संघटनेला जागा सोडण्यास त्यांचा विरोध होता. या मतदारसंघावर गेल्या 60 वर्षांपासून काँग्रेसची एकहाती सत्ता होती. यात 35 वर्षं माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचं सांगली लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व राहिलं आहे.

2014च्या निवडणुकीत भाजपच्या संजय पाटील यांच्याकडून प्रतीक पाटील यांचा पराभव झाला होता आणि काँग्रेसचा हा गड भाजपनं काबीज केला.

हा पराभव प्रतीक पाटील यांच्या एवढा जिव्हारी लागला की त्यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात फारसा संपर्क ठेवला नाही, असं जाणकार सांगतात.

पण वसंतदादा घराण्याची अधोगती कुणामुळे?

ही गोष्ट 1985 सालची आहे. त्या वेळी राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या आणि ती निवडणूक 187 जागा घेत जिंकली. वसंतदादांचा झंझावात फक्त सांगली जिल्हाच नाही तर सारा महाराष्ट्र पाहात होता.

फोटो कॅप्शन,

वसंतदादा पाटील

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद 4 वेळा भूषवलेल्या वसंतदादांचे राज्यातील आणि काँग्रेस पक्षातील वजन साऱ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. पण मग त्यांच्या निधनानंतर ३० वर्षांतच सांगलीतील काँग्रेस आणि त्यानिमित्ताने वसंतदादा कुटुंबाचा राजकीय ऱ्हास का झाला, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला नसेल तर नवलच.

काँग्रेस पक्षाला रामराम ठोकताना प्रतीक पाटील यांनी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही, हे स्पष्ट केलं आहे. काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले असून यापुढे वसंतदादा पाटील साखर कारखान्याद्वारे समाजकार्य करत राहणार असल्याचं त्यांनी गटाच्या मेळाव्यात जाहीर केलं.

त्यांचे बंधू विशाल पाटील यांनी मात्र आपल्याकडे उमेदवारीसाठी अजूनही 10 दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर काही निर्णय झाला नाही तर अपक्ष निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय जेव्हाचा तेव्हा घेऊ, असं ते रविवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

सांगली लोकसभा मतदारसंघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडला जाईल, अशी चर्चा आहे. तर काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी याला विरोध केला आहे.

"जर प्रतीक पाटील काँग्रेस सोडत असतील तर ती काँग्रेसची एक प्रकारे सुटकाच म्हणावी लागेल," अशी प्रतिक्रिया 'लोकमत'च्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

"सांगलीतील काँग्रेसच्या आणि वसंतदादा कुटुंबाच्या राजकीय अधोगतीला वसंतदादा यांची पुढची पिढीच जबाबदार आहे. दादा यांनी सुरू केलेली एकही संस्था नीट चालत नाही, वसंतदादा यांचं संघटन, लोकांशी नातं पुढच्या पिढीला जपता आलं नाही. काँग्रेसने महत्त्वाची पदं आणि सत्तास्थानं देऊनही त्यांना काँग्रेस बळकट करता आली नाही.

"काँग्रेस सांगलीत अजेय होती, पण 2014 च्या पराभवानंतर प्रतीक पाटील यांनी काँग्रेससाठी काय केलं, हा प्रश्नच आहे," असं ते म्हणाले.

प्रतीक पाटील - पक्षात उदय आणि अस्त

राज्यातील सहकार चळवळीत वसंतदादाचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यसैनिक असलेले दादा 1952 पासून सक्रिय राजकारणात होते. सांगलीत दादांनी फक्त "याला गुलाल लावा" असा संदेश दिला की लोक त्या उमेदवाराला निवडून द्यायचे. दादांच्या निधनानंतर दादांचा वारसा सांगूनच निवडणुका लढवल्या जायच्या.

फोटो कॅप्शन,

प्रतीक पाटील आणि जयंत पाटील

वसंतदादाचे पुत्र प्रकाशबापू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे पाच वेळा नेतृत्व केलं. त्यांच्या निधनानंतर प्रतीक पाटील 2006ला झालेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.

2009ला प्रतीक यांनी पुन्हा विजय मिळवला. 2014साली त्यांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी प्रचंड मताधिक्याने पराभव केला. तर वसंतदादा यांचे चुलत भाऊ विष्णू अण्णा पाटील, त्यांचा मुलगा मदन पाटील यांनी सांगलीवर बराच काळ वर्चस्व गाजवलं आहे.

ऑक्टोबर 2016 मध्ये मदन पाटील यांचं निधन झालं. त्यानंतर वसंतदादा गटाची मोठ्या प्रमाणावर वाताहत झाली.

1989 ला वसंतदादा यांचं निधन झालं. आता ३० वर्षांनंतर जी नवी पिढी आली आहे, तिच्या अपेक्षा वसंतदादांच्या वारसदारांना समजून घेता आल्या नाहीत, असंही भोसले म्हणाले.

गट जिवंत ठेवण्यासाठीची खेळी?

विशाल पाटील आणि मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील सांगली विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तर लोकसभा निवडणुकीसाठी प्रतीक पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट होतं. पण आता जर दावा सोडला तर नंतर काही मिळणार नाही, या भावनेतून प्रतीक पाटील यांनी खेळलेली ही खेळी असू शकते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसशी संबंधित एका व्यक्तीने दिली.

सांगलीच्या काँग्रेसमध्ये मदन पाटील यांच्या निधनानंतर आमदार विश्वजीत कदम आणि मोहन कदम यांचा गट अधिक प्रबळ झाल्याचं त्यांनी सांगितलं.

दादा घराणे आणि दादाविरोधक

जनता पक्षाच्या राजवटीत काँग्रेसविरोधी वातावरणात काँग्रेसच्या बाजूने राहिलेले दादा काँग्रेस नेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर रेड्डी काँग्रेससोबत राहिले. 1978ला रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे संयुक्त आघाडीचे सरकार सत्तेत आले होते.

पण मंत्रिमंडळातील सहकारी शरद पवार यांनी बंडखोरी केल्याने वसंतदादांचे सरकार कोसळले. त्यातून वसंतदादा विरुद्ध यशवंतराव चव्हाण, शरद पवार, राजारामबापू पाटील असा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आहे. हा संघर्ष पुढच्या पिढ्यांतही दिसला.

सांगलीच्या राजकारणात आजही हे प्रवाह ठळक दिसतात. राजारामबापू पाटील यांचे पुत्र जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा दादा कुटुंबीयांशी झालेला टोकाचा संघर्ष जिल्ह्याने पाहिलेला आहे.

2008 साली सांगली कुपवाड, मिरज महापालिकेत मदन पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा पराभव जयंत पाटील यांनी केला होता. त्यासाठी जयंत पाटील यांनी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधली होती, यात भाजप आणि शिवसेनाही सहभागी झाली होती.

2013 ला मदन पाटील यांनी एकहाती महापालिका जिंकली होती. त्यानंतर 2018ला मात्र भाजपने महापालिकेत सत्ता मिळवली आहे.

जिल्ह्यातील वसंतदादा विरुद्ध वसंतदादा विरोधक हा टोकाचा संघर्ष, हा पदरही या राजकीय घडामोडींमागे आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)