लोकसभा निवडणूक 2019: अमरावतीत नवनीत राणा की पुन्हा आनंदराव अडसूळ?

अमरावती

अमरावती लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात महाआघाडीकडून नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना आणि महाआघाडीच्या लढतीत दिल्ली कोण गाठेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

विकास आणि लोकाभिमुख उमेदवार अशा दोन मुद्द्यांवर ही लढत होईल. तेलगू चित्रपट अभिनेत्री नवनीत राणा आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात थेट लढत होणार आहे.

मतदारसंघाची रचना

अमरावती लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी धामणगाव रेल्वे आणि मोर्शी, हे दोन विधानसभा मतदार संघ वर्धा जिल्ह्याशी जोडले गेले आहेत. तर बडनेरा, अमरावती, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर, तिवसा या मतदारसंघाचा समावेश अमरावती लोकसभा मतदार संघात आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. राखीव मतदार संघ होऊन 10 वर्ष पूर्ण झालीत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत अमरावती राष्ट्रवादी काँग्रेस साठी सोडण्यात आलंय.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. त्यांना 3 लाख 29 हजार 280 मते मिळाली होती. 1 लाख 36 हजाराच्या फरकाने नवनीत राणा यांचा पराभव करत आनंदराव अडसूळ लोकसभेत पोहचले. आनंद अडसूळ यांना 4 लाख 67 हजार 212 मते मिळाली होती.

अमरावती लोकसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्वातंत्र्यानंतर तब्बल 7 टर्म अमरावती लोकसभा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र 25 वर्षांपासून या मतदार संघात शिवसेनेने आपले पाय बऱ्यापैकी रोवले आहे. गेली दोन टर्म शिवसेनेचे आनंदराव अडसूळ लोकसभा खासदार आहेत.

अमरावती मतदारसंघाचा इतिहास पाहता 1957 मध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1980 च्या लोकसभा निवडणुकीत उषा चौधरी काँग्रेसच्या खासदार म्हणून निवडून आल्या. काँग्रेसला मात देत 1989 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुदाम देशमुख यांनी विजय मिळवला. मात्र 1991 मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यानंतर 1998 मध्ये तत्कालीन भारतीय रिपब्लिकन पक्षाचे रा.सु.गवई यांनी विजय मिळवला.

गेल्या 20 वर्षांपासून अमरावती लोकसभा मतदारसं शिवसेनेच्या ताब्यात आहे. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नवनीत राणा लढल्या होत्या. खासदार आनंद अडसूळ यांना टक्कर देत त्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या.

सध्याची स्थिती काय आहे?

याविषयी अधिक माहिती देताना ज्येष्ठ पत्रकार संजय पाखोडे म्हणाले, "2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत खासदार आनंदराव अडसूळ यांचा विजय झाला. तरी त्यातही नवनीत राणा यांनी निकराची झुंज देत 3,29,280 एवढी मते मिळवली. या लोकसभा निवडणूक नवनीत राणा घडयाळ चिन्हावर निवडणूक लढल्या होत्या. यावेळी मात्र नवनीत राणा या त्यांच्या युवा स्वाभिमानी या पक्षाकडून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे पक्षाचं चिन्ह नसल्याचा फटका राणा यांना बसू शकतो"

निवडणुकीत पराभूत झाल्यावर नवनीत राणा पाच वर्षे स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी जनतेशी कायम जनसंपर्क सुरू ठेवला. मात्र विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ हे जनसंपर्क राखण्यात कमी पडल्याचं मत पाखोडे व्यक्त करतात.

तर पत्रकार मोहन अट्याळकर यांच्या मते, "गेल्या 10 वर्षांपासून हा मतदारसंघ राखीव झालाय. त्यामुळे इथले मतदार संभ्रमात होते.मात्र यावेळी वातावरण बदलल्याचं चित्र आहे. कारण मतदारांमधील संभ्रम दूर झालाय. यावेळी मतदार स्थानिक आणि जवळचा उमेदवार शोधतील अशी परिस्थिती आहे. हा मतदारसंघ कुणबी बहुल मतदार संघ असल्याने त्यांची भूमिका निर्णायक असते"

Image copyright BBC Sport

अट्याळकर पुढे सांगतात, "गेल्यावेळी पक्षापेक्षा मोदी लाट मोठ्या प्रमाणात होती. शेतमालाचा भाव आणि स्वामिनाथन आयोगाकडे झालेलं दुर्लक्ष आणि सत्ताधारी पक्षावर असलेला नाराजीचा फटका हा उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निवडणुकीमध्ये स्थानिक आमदारांचा प्रभाव लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर जास्त असतो तो यावेळी कसा आहे हे कळायला मार्ग नाही. कारण प्रत्येक जण स्वतंत्र काहीतरी घेऊन समोर येत आहे. पाच वर्षात स्थानिक राजकारणात अडसूळांचा हस्तक्षेप राहत नाही. त्यामुळं नेते कार्यकर्त्यांपर्यंत आणि कार्यकर्ते मतदारांपर्यंत ते कसे पोहोचतात यावरच सगळ्याच भवितव्य असणार आहे. नवनीत राणा आणि अडसूळ यांच्यामध्ये टक्कर होईल. वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि मुस्लिम मतदारांमधील मत विभागणी यावर राणांच गणित अवलंबून आहे".

शेतकऱ्यांसोबत मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचाही प्रभाव मतांवर होईल असं ज्येष्ठ पत्रकार दिलीप एडतकर यांना वाटतं.

"जवळपास पाऊण ते एक लाख धनगर समाज शिवसेनेला मतदान देण्याच्या मूड मध्ये नाही. सोबतच बुद्धिस्ट मतांची विभागणी राणांच्या विजयामध्ये अडथळा निर्माण करू शकतो. कारण बुद्धिस्ट मतं फुटलीत किंवा एकत्रित झालीत त्याचा सरळ फटका राणांना बसू शकतो"

मात्र यावेळी महाआघाडीत आरपीआय गवई गट सहभागी आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गवई यांना अडीच लाखांच्या जवळपास मते पडली होती. 2014 मध्ये गवई यांना केवळ 54,178 मते मिळाली. त्यामुळं या निवडणुकीत गवई गट परिणामकारक ठरेल असे वाटत नसल्याचं अनेकांचं मत आहे.

याविषयी अधिक माहिती देताना दिलीप एडतकर सांगतात,"लोकसभा लढवणार नसल्याचं जाहीर करून राजेंद्र गवई यांनी एकप्रकारे पक्ष विसर्जित केलाय. ऐन निवडणुकीच्या काळात त्यांची भूमिका हे पक्षाचं श्राद्ध घालण्यासारखं आहे. त्यांचा फारसा फायदा किंवा तोटा नाही. पण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे,रिंगणात शेवटपर्यंत कायम राहिले तर नवनीत राणा यांना निवडणूक कठीण जाणार आहे. पण पाठिंब्याच्या लाटेत वंचित बहुजन आघाडीची भूमिका अद्यापही तळ्यात मळ्यात आहे. त्यांच्या भूमिकेवर सगळं अवलंबून आहे. एक अभिनेत्री म्हणूनही नवनीत राणांची जिल्ह्यात क्रेज आहे. त्याहून त्या जनसामान्यांत पटकन मिसळतात. अनेकांना त्या आपल्या कुटुंबातल्या सदस्या सारखी वाटते"

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी नवनीत राणा तेलगू चित्रपट सृष्टीतल्या अभिनेत्री होत्या. अनेक तेलगू चित्रपटात मुख्य भूमिकेतुन त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या. आमदार रवी राणा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरु लागली. 2011 मध्ये अमरावती सामूहिक विवाह सोहळयात 3001 जोडप्यासोबत त्यांनी लग्न केल.

राणा विरुद्ध अडसूळ

राजकारणाचा जराही गंध नसणाऱ्या नवनीत राणांनी राजकारणातील खाचखळगे अल्पावधीतच आत्मसात केले.

2014 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अडसूळ विरोधात त्या लढल्या. एका खासगी न्यूज चॅनेलच्या कार्यक्रमात खासदार आनंदराव अडसूळ यांनी राणा यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. नवनीत राणा यांनी अडसूळ याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात केला होता. त्यानंतर खासदार अडसूळ आणि राणा यांच्यात खटके उडतच राहिले. या घटनेमुळे 2014 ची लोकसभा निवडणूक राणा आणि अडसूळ यांच्याच भोवती फिरत राहीली.

नवनीत राणा यांच्यावर खोट्या जातप्रमाणपत्र तयार केल्याचेही आरोप अडसूळ यांच्याकडून करण्यात आला. मात्र न्यायालयात हा आरोप टिकू शकला नाही. त्याविरोधात नवनीत राणांनी विनयभंग प्रकरणात पुनर्विचार याचिका अमरावती न्यायालयात दाखल केली होती.

"निवडून आल्यानंतर पाच वर्षे खासदार अडसूळ यांचा स्थानिक राजकारणामध्ये जराही हस्तक्षेप रहात नाही. अडसूळ मूळचे मुंबईचे आहेत. त्यामुळे स्थानिक उमेदवार डोक्यावर बसवण्यापेक्षा बाहेरच्या उमेदवाराच्या बाजूने अनेक नेते असतात. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या बहुजन वंचित आघाडीला फारसा प्रतिसाद मिळेल असही वाटत नाही. दलित आणि मुस्लिम मतदार काँग्रेसच्या बाजूला राहतील. पण वंचित बहुजन आघाडीच नेमक काय चाललय हे कळण्यापलीकडचं आहे. वंचित बहुजन आघाडी तिसऱ्या क्रमांकावर राहील, बीएसपीचे कॅडर बेस मत त्यांना मिळतीलच" देशपांडे यांच मत आहे .

"काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फटका आघाडीच्या उमेदवाराला पडू शकतो. तसेच नवनीत राणा यांच्या राजकीय वाटचालीला काँग्रेसच्या-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधून छुप्या मार्गाने विरोध होईल तो वेगळाच. परंतु रिपाई चे राजेंद्र गवई यांनी या निवडणुकीत आपला पाठिंबा नवनीत राणा यांना जाहीर केल्याने नवनीत राणा यांच पारडं थोडं जड झालं आहे. काँग्रेस मधील दुखावलेले नेते हे शिवसेनेला साथ देतील असं चित्र गेल्या लोकसभेत पाहायला मिळाल होत. नेमकी तीच मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी आनंदराव अडसूळ निष्णात राजकारणी म्हणून ओळखले जातात.

पण शिवसेनेपासून दुखावलेले, शिवसेनेचे अनेक नेते बंड करण्याच्या मार्गावर आहेत, त्यांची मनधरणी करण्यात आनंदराव अडसूळ यापूर्वीही अनेकदा यशस्वी झाले आहेत. कॅडर बेस मत असणारी बीएसपी आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या वाट्याला येणारी दलित मतांवर सगळ्याच राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे" अस मत पत्रकार संजय शेंडे यांनी व्यक्त केलं

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)