लोकसभा निवडणूक 2019: सुप्रिया सुळे यांना आव्हान देणाऱ्या कांचन कुल कोण आहेत?

कांचन कुल Image copyright HALIMA KURESHI

बारामती लोकसभा मतदारसंघ प्रत्येक निवडणुकीमध्ये विशेष चर्चेचा असतो. पवार कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळख असली तरी पवार कुटुंबीयांना निवडणुकीत कोण आव्हान देणार याकडेही सर्वांचे लक्ष असते.

भाजपाने बारामती मतदारसंघातून कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे या मातब्बर उमेदवाराच्या विरोधात त्या रिंगणात उतरल्या आहेत. दोन्ही माहेरवाशिणी मधली ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळे यांची ही तिसरी लोकसभा निवडणूक आहे. याआधी सलग दहा वर्षं त्या खासदार आहेत.

२०१४ मध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले होते. पण त्यांनी कपबशी चिन्हावर निवडणूक लढविली होती. यंदा कांचन कुल या युतीच्या उमेदवार (भाजपाच्या) उमेदवार आहेत. कुल कुटुंबीयांचा दौंड, भोर, इंदापूर तालुक्यात प्रभाव आहे.

तर पुरंदरमध्ये शिवसेना प्रभावी असून भाजपाचे भीमराव तापकीर खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे यापूर्वी दिल्या गेलेल्या उमेदवारांपेक्षा कांचन कुल या भाजपाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना आव्हान देऊ शकतात.

Image copyright Getty Images

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून कुल कुटुंबीय २००९ पासून दुरावलं. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राहुल कुल यांच्याविरोधात काम केल्याने पराभव पत्करावा लागल्याची नाराजी होती. त्यामुळे २०१४ मध्ये राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला.

"राहुल कुल यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. यंदा राष्ट्रीय पातळीच्या नेत्याची सभा झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली टक्कर भाजपा देईल", असं मत दौंड तालुक्यातील स्थानिक पत्रकार नरेंद्र जगताप यांनी दिली.

Image copyright HALIMA KURESHI

कुल कुटुंबीयांवर भाजपाने दाखविलेल्या विश्वासाला साजेसे काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं कांचन कुल म्हणाल्या. "याआधी प्रचारात सहभागी झाले असल्यानं आता दडपण नाहीए. तसंच राहुल कुल आणि कुटुंबीयांचा जनसंपर्क आणि पूर्वी केलेले काम याच्या आधारावर ही निवडणूक लढवणार आहे" असं कांचन कुल यांनी स्पष्ट केलंय.

दोघीही माहेरवाशिणी निवडणूक रिंगणात असण्यावर सुप्रिया सुळे यांनी, ही 'भावनिक लढाई नसून प्रोफेशनल लढाई असल्याचं' म्हटलं. आम्ही २२ लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून दिल्लीला निवडून जातो. आम्ही या मातीत जन्म घेणं आमचं भाग्य आहे" असं खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

सुप्रिया सुळे यांनी मागील पाच वर्षांमध्ये लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सायकलवाटपाच्या उपक्रमातून, तसेच ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबीर, महिलांचे विविध कार्यक्रम यातून त्या सतत लोकसभा मतदारसंघात राहिल्या. संसदेत अतिशय अभ्यासू भाषणातून त्यांनी उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार दोनवेळा पटकावला आहे. २०१४ च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पुरंदर, खडकवासला मतदारसंघात फटका बसला होता. यंदा सुळेंच्या समोर अंतर्गत गटतट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग ही आव्हाने असल्याचं नरेंद्र जगताप म्हणाले.

महादेव जानकर यांनी देखील बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण २०१४ च्या निवडणुकीनंतर कोणतंही विकासकाम, जनसंपर्क नसल्याने मतदार नाराज असल्याच नरेंद्र जगताप म्हणाले .

कांचन कुल आणि कुटुंबीय :

कांचन कुल या कुल कुटुंबीयांच्या सून असून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावातील आहेत. त्यांचं शिक्षण बी ए हिंदी , शारदानगर महाविद्यालयातून झालेलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या त्या नातेवाईक आहेत.

कुल कुटुंबीय १९६२ पासून राजकारणात आहे. कांचन कुल यांचे सासरे सुभाष कुल हे १९९० ते २००१ दरम्यान आमदार होते त्यांच्या अकाली निधनानंतर कांचन कुल यांच्या सासू रंजना कुल या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. तर कांचन कुल यांचे पती राहुल कुल हे २०१४ साली आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

बारामती जिंकण्यासाठी भाजपाचे प्रयत्न

दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, खडकवासला या मतदारसंघांत बारामती मतदारसंघ विभागला गेला आहे. यंदा बारामती लोकसभा मतदार संघ जिंकण्याचा निश्चय मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. महिन्याभरापूर्वी ४३ वी विजयी जागा बारामतीची असेल असं वक्तव्य त्यांनी पुण्यात केलं होतं.

त्यामुळे आता बारामतीच्या दोन माहेरवाशिणींमध्ये निवडणुकीच्या आखाड्यात कोण बाजी मारतं हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)