लोकसभा 2019 : काँग्रेसमध्ये इनकमिंग आऊटगोईंग नवं नाही आता फक्त स्पीड वाढला - राजीव सातव

"राजकीय पक्षातून नेत्यांचं येणं-जाणं नवीन नाही, पण अलिकडे त्याचा स्पीड जरा जास्त वाढलंय," असं म्हणत काँग्रेस खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांनी काँग्रेसमधून होणाऱ्या आऊटगोईंगवर पक्षाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

नवी दिल्लीत बीबीसी मराठीशी ते बोलत होते. आपण केवळ पक्षाचं काम करण्यासाठी आणि नरेंद्र मोदींचं होम पिच असलेल्या गुजरातमध्ये टक्कर देण्यासाठी उमेदवार म्हणून निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी म्हटलं.

हिंगोलीत बहुजन वंचित आघाडीनं मोठं आव्हान उभं केलंय, त्यातच अशोक चव्हाण आणि आपल्यात फारसं आलबेल नसल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये आहेत त्याचं काय? या प्रश्नावर बोलताना सातव म्हणाले, "आमच्यात कुठलाही दुरावा नाही. माध्यमांना मसाला कमी पडतो की काय अशी मला शंका येते. त्यामुळेच अशा प्रकारच्या चर्चा सुरू होतात. मात्र त्यात तथ्य नाही. मी सध्या गुजरातमध्ये काम करत आहे. तिथे गेल्या निवडणुकीत पक्षाला खातं उघडता आलं नव्हतं. त्यामुळेच गुजरातचा प्रभारी म्हणून मी तिथल्या निवडणुकीत लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे."

काँग्रेसमध्येही दोन प्रकारचे काँग्रेस नेते आहेत का? एक जे तुमच्याप्रमाणे पक्षासाठी उमेदवार म्हणून उभे राहात नाहीत. आणि दुसरे सुजय विखे किंवा साताऱ्याचे रणजित निंबाळकर किंवा प्रतिक पाटील अशीही उदाहरणं आहेत, त्यावरही राजीव सातव यांनी काँग्रेसी उत्तर दिलंय.

ते म्हणाले, "काँग्रेस हे समाजाचं प्रतिबिंब आहे. समाजात दोन्ही प्रकारची लोकं असतात. तशी ती काँग्रेसमध्येही आहेत. त्यामुळे ही नवी बाब नाहीए. याआधीही निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षातून नेत्यांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग झालेलं आहे."

याचवेळी राजीव सातव यांनी विखुरलेले विरोधक, किमान वेतनाची काँग्रेसची योजना आणि महाराष्ट्रात बहुजन वंचित आघाडीनं उभं केलेलं आव्हान यावरही भाष्य केलं.

"विखुरलेले विरोधक मोदींसमोर आव्हान उभं करणार नाहीत, असं म्हणणं चुकीचं आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही त्या जिंकू असं म्हटलं की लोक हसायचे. तुम्ही स्वप्नं पाहताय असं म्हणायचे. मात्र लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला. लोकसभा निवडणुकीतही लोक आमच्यावर विश्वास ठेवतील." असं सातव यांनी म्हटलंय.

Image copyright @SATAVRAJEEV

किमान वेतनाची योजना कितपत व्यवहार्य आहे, भाजपसारखा तो जुमला तर ठरणार नाही ना? या प्रश्नाचं उत्तर देताना सातव यांनी भाजप आणि मोदी-शाह जोडीवर निशाणा साधला.

ते म्हणाले, "आमच्याकडे मोदी-शाह यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ नाहीत. त्यामुळे ते अचानक रात्रीत उठून उद्यापासून हजार-पाचशेच्या नोटा बंद अशा प्रकारचे निर्णय घेत नाहीत. आमच्याकडे मनमोहन सिंग आणि त्यांच्यासारखे अभ्यासू अर्थतज्ज्ञ आहेत. गेली सहा-आठ महिने यावर चर्चा सुरू होती. पूर्ण अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतला आहे. देशातील 20 टक्के गरीब लोकांना वर्षाला 72 हजार रूपये देणं कठीण नाही. जर मोदी सरकार 10-15 उद्योजकांचे साडेतीन लाख कोटीचं कर्ज माफ करत असेल तर मग गोरगरीबांना सन्मानानं जगता यावं इतकं उत्पन्न का देता येणार नाही?" असा सवाल त्यांनी विचारला.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसमधील गोंधळाची स्थिती, उमेदवारांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग, गुजरातमध्ये काँग्रेसचा असलेला अजेंडा, पुलवामा इथं झालेला हल्ला आणि त्यानंतर देशभक्तीच्या मुदद्यावर होणारा प्रचार यावरही भाष्य केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)