लोकसभा 2019 : महाराष्ट्रात सर्वच पक्षांमध्ये घाऊक प्रमाणात इनकमिंग आणि आऊटगोईंग

अमोल कोल्हे Image copyright facebook
प्रतिमा मथळा अमोल कोल्हे

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे की, निवडणूक आयोगानं लोकसभेची निवडणूक एक महिना लांबवावी कारण इतकी पक्षांतरं होत आहेत की कोण कोणत्या पक्षात गेले आहे आणि कोणाकडून लढतंय हे समजायला मतदारांना वेळ लागेल!

निवडणुका म्हटल्या की पक्षांतरही ओघाने आलंच. त्याला अनेक पैलू आणि कारणं आहेत. ही पक्षांतरं कधी अपेक्षित तर कधी धक्कादायक असतात. येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या निवडणुकाही त्याला अपवाद नाहीत. देशभरात ही आवक जावक सुरू असताना महाराष्ट्रात काय स्थिती आहे यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

महाराष्ट्रातलं सर्वांत चर्चेतलं पक्षांतर राहिलं सुजय विखे पाटील यांचं. अहमदनगर मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यानं विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र सुजय विखेंनी काँग्रेस सोडून भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. आणि आता ते भाजप उमेदवार म्हणून अहमदनगरमधून रिंगणात आहेत. सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे काँग्रेसमध्येच आहेत. काँग्रेसनं त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिलं आहे.

दुसरा चर्चेतला पक्षप्रवेश ठरला माढा मतदारसंघातील रणजितसिंह मोहिते पाटलांचा. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र असलेले रणजितसिंह यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळापासून मुक्त होत हाती भाजपचं कमळ धरलं आहे.

अर्थात त्यांना माढा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. माढा मतदारसंघातच असलेल्या फलटणमधील काँग्रेसचे नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे सुद्धा भाजपवासी झाले आहेत. माढा लोकसभेसाठी त्यांचंही नाव चर्चेत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातलाच आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या हातकणंगले मतदारसंघात युतीकडून आयात उमेदवाराला उभं करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीत असलेल्या धैर्यशील मानेंना शिवसेनेत आणून त्यांना राजू शेट्टींच्या विरोधात मैदानात उतरवण्यात आलं आहे. धैर्यशील माने हे राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र आहेत.

प्रतिमा मथळा सुजय विखे पाटील

दिंडोरी मतदारसंघात भाजपनं डॉ. भारती पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात करून उमेदवारी दिली आहे. भाजपनं विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना डावलून भारती पवारांना दिंडोरीतून उभं केलं आहे. भारती पवार या माजी आमदार असून राष्ट्रवादीचे दिवंगत नेते ए. टी. पवार यांच्या सूनबाई आहेत.

भाजप-शिवसेनेतही 'आऊटगोइंग' जोरात

भाजप-शिवसेनेत फक्त इनकमिंगच होतंय असं नाही. तर या पक्षातूनही आऊटगोईंग सुरू असून काही नेते काँग्रेस-राष्ट्रवादीत गेले आहेत.

शिवसेनेचं शिवबंधन तोडून अभिनेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या आधी प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीनं त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांच्या विरोधात उतरवलं आहे.

चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसनं शिवसेनेचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांना पक्षात आणून उमेदवारी दिली आहे. भाजपचे हंसराज अहीर यांच्याशी धानोरकरांचा सामना होणार आहे. काँग्रेसला विनायक बांगडे यांना दिलेली उमेदवारी रद्द करून धानोरकरांना उमेदवारी द्यावी लागली आहे.

Image copyright facebook
प्रतिमा मथळा रणजितसिंह मोहिते पाटील

शिवसेनेचे आणखी एक माजी आमदार सुभाष वानखेडे यांनी शिवबंधन सोडून काँग्रेसचा हात धरला आहे. हिंगोली मतदारसंघातून राजीव सातव यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर वानखेडेंना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय रामटेक मतदारसंघात मुकुल वासनिकांना डावलून काँग्रेसनं बसपामधून आलेल्या किशोर गजभियेंना उमेदवारी दिलीय.

माजी सनदी अधिकारी असलेल्या गजभियेंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाकडून नागपूरमधून निवडणूक लढवली होती.

बरं पक्षांतरं युतीतून आघाडीत किंवा आघाडीतून युतीत असेच झाली आहेत असं नाही. भाजप-सेना युती आणि मित्रपक्षातही आपसात पक्षांतरं झाली आहेत.

शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना नांदेडमधून अशोक चव्हाणांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे.

शिनसेनेनं पालघरचे भाजप खासदार राजेंद्र गावित यांना पक्षात आणून उमेदवारी दिली आहे.

माथाडींचे नेते नरेंद्र पाटील यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसलेंच्याविरोधात शिवसेनेचे उमेदवार असतील.

Image copyright facebook
प्रतिमा मथळा भारती पवार

बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या विरोधात भाजपनं मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपची उमेदवारी दिली आहे.

बरं आता तुम्हा सगळ्यांना सविस्तर सांगून झालंय की कोणी कोणता पक्ष सोडलाय आणि आता कोणत्या पक्षातून निवडणूक लढवत आहे. निवडणूक आयोग तुमचा गोंधळ दूर होण्यासाठी काही मुदत वाढवणार नाहीये. त्यामुळे ही बातमी वाचूनच गोंधळ आता दूर झाला असेल अशी अपेक्षा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)