IPL 2019: ख्रिस गेल नावाच्या झंझावताचा नेमका अर्थ काय?

ख्रिस गेल Image copyright Getty Images

ख्रिस गेल या झंझावताचं वय 40 असलं तरी तो युवा खेळाडूंना लाजवेल अशी कामगिरी करत असतो.

वेस्ट इंडिजचा सलामीचा फलंदाज ख्रिस गेलने सोमवारी पुन्हा एकदा दाखवून दिलं की क्रिकेटच्या या स्वरुपात अजूनही युवा खेळाडूंपेक्षा तो सरस आहे. पंजाबकडून खेळताना त्याने 79 धावा केल्या आणि जयपूरमध्ये राजस्थान रॉयलवर 14 धावांनी विजय मिळवताना त्याची महत्त्वाची भूमिका होती.

गेल्यावेळी IPL च्या लिलावात गेलला फारसं महत्त्व कोणी दिलं नव्हतं. मात्र पहिल्याच सामन्यात आपल्या फलंदाजीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबचं नशीब बदलण्याचा उद्देश स्पष्ट दिसत होता.

गेल्या मोसमात पंजाबची टीम सातव्या क्रमांकावर होती. तेव्हा दोन कोटीच्या बेस प्राईजवर आलेला गेल फारसं काही करू शकला नाही. त्याने फक्त एक शतक केलं होतं. जायबंदी झाल्यामुळे त्याला मालिकाही अर्धवट सोडावी लागली.

किंग्स इलेवन पंजाबने आतापर्यंत एकही IPL जिंकलेली नाही. तसंच धावांचा डोंगर रचणारा ख्रिस गेल कोणत्याच विजेत्या संघाचा भाग नव्हता. मात्र सोमवारी गेलने जी खेळी केली त्यावरून पंजाबचं नशीब बदलण्याचा त्याचा स्पष्ट इरादा दिसून येतो.

त्याच्या खेळीमुळे पंजाबने राजस्थानचा त्यांच्या होम पीचवर पराभव केला.

जयपूरमध्ये गेल नावाचं वादळ

राजस्थानचा फलंदाज जोस बटलरनेही या सामन्यात रंग भरले. मात्र सामन्याचा खरा हिरो ख्रिस गेलच होता.

ख्रिस गेल मैदानात उतरल्यावर त्याने आपल्या खास शैलीत राजस्थानच्या गोलंदाजांचा आपल्या शैलीत समाचार घेतला. त्यांनी फक्त 47 चेंडूत आठ चौकार आणि सहा छटकारांसह 79 धावा केल्या.

Image copyright Getty Images

ख्रिस गेलला सूर गवसण्यास थोडा वेळ लागला खरा, मात्र एकदा सूर सापडल्यावर मात्र तो थांबायला तयार नव्हता. ख्रिस गेलची बॅट जगात वजनाने सगळ्यात जड असल्याचं सांगितलं जातं. त्याने अगदी अर्ध्या ताकदीने जरी चेंडू टोलावला तरी तो सीमापार जातो.

चार हजार धावा पूर्ण

पंजाबचा सलामीचा फलंदाज एल. राहुल फक्त चार धावा करू शकला. त्यामुळे ख्रिस गेलच्या खेळीचं महत्त्व आणखी आधोरेखित होतं.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की गेल संपूर्ण सामन्यादरम्यान तंदुरुस्त होता. धावा करताना त्याच्या हालचाली अगदी सहज होत्या. ख्रिस गेल जेव्हा 79 धावा करून माघारी परतला तेव्हा फक्त 15वी ओव्हर सुरू होती.

Image copyright AFP

गेल बाद झाला तेव्हा पंजाबचा स्कोअर तीन विकेटच्या मोबदल्यात 144 झाला होता. गेल बाद झाल्यानंतर सरफराज खानने धावफलकाला आकार आणला. त्याने केवळ 29 चेंडूंच्या मोबदल्यात सहा चौकार आणि एक छटकाराच्या मदतीने नाबाद 46 धावा केल्या.

गेलला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. "युवा खेळाडूंबरोबर खेळायला मजा येते." असं गेल म्हणाला

राजस्थानची खेळी

राजस्थानसमोर 185 धावांचं उद्दिष्ट होतं. मात्र संपूर्ण 20 ओव्हर खेळूनही 170 धावांपर्यंतच त्यांची मजल गेली.

जोस बटलरने 43 चेंडूत दोन चौकार आणि एका छटकाराच्या सहाय्याने 69 धावा करत राजस्थानला विजयाकडे वाटचाल करून दिली होती. मात्र त्याचवेळी अश्विनने त्याला 'मंकडेड आऊट' करत सामन्याची दिशाच बदलली.

त्यावेळी फक्त 13 वी ओव्हर सुरू होती. आणि राजस्थानने एक गडी गमावून 108 धावा केल्या होत्या.

Image copyright AFP

नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या बटलरने बॉल टाकण्याआधीच क्रीजच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला आणि अश्विनने ही संधी सोडली नाही. बटलरशिवाय संजू सॅमसनने 30 आणि स्टीव्ह स्मिथने 20 धावा केल्या.

पंजाबच्या विजयात कर्णधार अश्विनचंही योगदान होतं. त्याने चार ओव्हरमध्ये 20 धावांच्या मोबदल्यात एक गडी बाद केला.

मंकडेड आऊटमुळे विकेट घेण्याच्या पद्धतीवर काही दिवस चर्चा होईलही कदाचित. मात्र IPL असल्यामुळे चालून जातं. मात्र ख्रिस गेलने सामना गाजवला हे मात्र नक्की.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)