अश्विनने जोस बटलरला 'मंकडेड' केलं आणि मॅच फिरली....

आर अश्विन Image copyright Getty Images

जयपूर इथल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या बॉलर्सची यथेच्छ धुलाई करत होता. किंग्ज इलेव्हन पंजाबने सुरूवातीला बॅटिंग करताना १८४ धावांची मजल मारली होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १२.४ ओव्हर्समध्ये १ बाद १०८ अशा सुस्थितीत होता. त्याक्षणी राजस्थानला जिंकण्यासाठी ७.२ ओव्हर्समध्ये म्हणजेच ४३ चेंडूत ७७ रन्स हव्या होत्या. हे करण्यासाठी त्यांच्या हातात ९ विकेट्स होत्या. विजयाचं पारडं राजस्थानच्या बाजूने झुकलेलं आहे असं चित्र होतं.

पाचव्या चेंडूवर अश्विनने रनअप सुरू केला. अंपायरच्या इथे येताच त्याने बाजूला बघितलं. त्यावेळी बटलर क्रीझच्या बाहेर असल्याचं त्याच्या लक्षात आलं. अश्विनने झटकन रनअप थांबवून बटलरला आऊट केलं.

अश्विसनह किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंनी अपील केलं. तू खरंच अपील करतो आहेस का? असं बटलरने अश्विनला विचारलं. अश्विन तात्काळ हो म्हणाला. तू अपील कसं करू शकतोस असं बटलरने विचारलं. त्यावर इट्स माय स्पेस असं अश्विनने प्रत्युत्तर दिलं. अश्विनने मंकडेड आऊट केल्याने बटलर नाराज झाला.

मैदानावरील अंपायर्सनी निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला. अश्विनने बेल्स उडवल्या त्यावेळी बटलर क्रीझमध्ये नसल्याचं स्पष्ट होताच थर्ड अंपायर ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी बटलर बाद असल्याचा निर्णय दिला. नाराजी व्यक्त करत बटलर पॅव्हेलियनमध्ये परतला. बटलरने ४३ चेंडूत १० फोर आणि २ सिक्सेससह ६९ धावांची खेळी केली.

उत्तम सूर गवसलेला बटलर बाद होताच राजस्थान रॉयल्सची लय बिघडली. बटलर पिचवर असताना रनरेटचं आव्हान वाढतच होतं मात्र विकेट हातात असल्यामुळे बटलर राजस्थानला मॅच काढून देईल असं चित्र होतं. बटलर आऊट झाला आणि राजस्थानची घसरगुंडी उडाली.

बॉल टेंपरिंग प्रकरणात सहभागाची शिक्षा संपवून कमबॅक करणारा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्हन स्मिथ २० रन्स करून बाद झाला. त्यापाठोपाठ लगेचच संजू सॅमसन ३० धावांवर आऊट झाला. धोकादायक बेन स्टोक्सला आऊट करत मुजीब उर रहमानने राजस्थानच्या आशा धुळीस मिळवल्या. राजस्थानने २० ओव्हर्समध्ये १७० धावा केल्या आणि किंग्ज इलेव्हन पंजाबने १४ रन्सने थरारक विजय मिळवला.

अश्विनचं म्हणणं काय?

युक्तिवाद करण्याचा प्रश्नच नाही. मी जे केलं ती प्रतिक्षिप्त क्रिया होती. मी जेमतेम रनअपला सुरुवात केली होती, त्याचवेळी त्याने क्रीझ सोडलं होतं. त्यामुळे आऊट करणं साहजिक होतं. तो माझ्याकडे बघत देखील नव्हता. तो सहज क्रीझ सोडून पुढे गेला होता.

मंकडेड म्हणजे काय?

क्रिकेटमधला बॅट्समनला आऊट करण्याचा हा एक प्रकार आहे. बॉलर रनअपमध्ये असताना, नॉन स्ट्राईकला असलेला बॅट्समन क्रीझमध्ये नसेल तर त्याला रनआऊट करता येतं. अशा रनआऊटला मंकडेड असं म्हटलं जातं.

मंकडेडवरून एवढा वाद का?

बॅट्समनला आऊट करण्यासाठी अनेक प्रकार आहेत. मंकडेड हा आऊट करण्याचा नियमात बसणारा प्रकार आहे. मात्र नैतिकदृष्ट्या ते योग्य मानलं जात नाही. मंकडेड हा आऊट करण्याचा प्रकार स्पिरीट ऑफ दे गेमला धरून नाही असं मानणारा मोठा वर्ग आहे. प्रत्यक्षात मंकडेड नियमाअंतर्गत असल्याने तसं आऊट करण्यात काहीच गैर नाही.

मंकडेड हे नाव का पडलं?

1947 मध्ये भारताचे अष्टपैलू खेळाडू विनू मंकड यांनी अशा पद्धतीने ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊन यांना आऊट केलं होतं. विनू यांनी दोनदा अशाप्रकारे ब्राऊन यांना तंबूचा रस्ता दाखवला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर असताना, सराव सामन्यात आणि नंतर दुसऱ्या कसोटीत मंकड यांनी ब्राऊन यांना बाद करण्यासाठी ही क्लृप्ती वापरली होती. दरम्यान मंकड यांनी ब्राऊन यांना असं आऊट करण्यापूर्वी एकदा इशारा दिला होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जोस बटलर

ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी त्यावेळी मंकड यांच्यावर टीका केली होती. यातूनच आऊट करण्याच्या याप्रकाराला मंकडेड असं नाव मिळालं.

नियम काय सांगतो?

क्रिकेटचे नियम MCC अर्थात मेरलीबोन क्रिकेट क्लब तयार केले जातात. नियम ४२.१५ नुसार, बॉलरला गोलंदाजीच्या रनअपमध्ये असताना बॅट्समनला नॉन स्ट्राईक एन्डला आऊट करता येतं. नॉन स्ट्राईक एन्डला आऊट करण्याचा बॉलरने प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही तर अंपायरने तो बॉल डेड बॉल घोषित करावा. सर्वसाधारणपणे बॉलर बॉलिंग रनअपमध्ये असताना त्याचा मागचा पाय क्रीझमध्ये पडल्यानंतर नॉन स्ट्राईक एन्डचा बॅट्समन क्रीझ सोडू शकतो याला अनुसरून खेळाडू वागत होते. दरम्यान १ ऑक्टोबर २०११ पासून ICC च्या नियमांमध्ये बदल करण्यात

आला. सुधारित नियमानुसार, बॉलरला डिलिव्हिरी स्ट्राईड म्हणजेच बॉल टाकण्यापूर्वी नॉन स्ट्राईक एन्डच्या बॅट्समनला आऊट करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

डॉन ब्रॅडमन यांनी आत्मचरित्रात केला होता मंकडेडचा उल्लेख

मीडियाने विनू यांच्या खिलाडूवृत्तीवर शंका का घेतली याचं कोडं मला आयुष्यभर उलगडलं नाही. नियमांनुसार, बॉलरने चेंडू टाकेपर्यंत नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या बॅट्समनने क्रीझमध्ये असणं आवश्यक आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डॉन ब्रॅडमन

बॉलर रनअपमध्ये असताना नॉन स्ट्राईकचा बॅट्समन क्रीझमध्ये नसेल तर त्याला आऊट करण्याचा अधिकार बॉलरला आहे. असा अधिकार नियमाने दिलेला असताना बॉलरच्या खिलाडूवृत्तीवर शंका घेणं कसं रास्त ठरू शकतं?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मंकडेड आऊट देण्यात येतं?

तीन वर्षांपूर्वी U19 वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज आणि झिम्माब्बे यांच्यातला सामना मंकडेडमुळे चांगलाच गाजला होता. वेस्ट इंडिजच्या किमो पॉलने झिम्बाब्वेच्या रिचर्ड नगाराव्हा मंकडेड पद्धतीने आऊट केलं. नगाराव्हा आऊट होताच वेस्ट इंडिजने मॅच अवघ्या २ रन्सने जिंकली. या विजयासह वेस्ट इंडिजचा संघ क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरला.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊन यांना अशा पद्धतीने आऊट केलं होतं.

१९६९ मध्ये वेस्ट इंडिजच्या चार्ली ग्रिफिथ यांनी ऑस्ट्रेलियाच्या इयन रेडपॅथ यांना मंकडेड आऊट केलं होतं.

वनडे क्रिकेटमध्ये मंकडेड प्रकार पहिल्यांदा १९७५मध्ये घडला. ऑस्ट्रेलियाच्य ग्रेग चॅपेल यांनी इंग्लंडच्या ब्रायन लॅकहर्स्ट यांना मंकडेड आऊट केलं. मात्र असं करण्यापूर्वी ग्रेग यांनी लॅकहर्स्ट यांना दोनदा इशारा दिला होता.

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च टेस्ट मध्ये इव्हन चॅटफिल्ड यांनी डेरेक रँडाल यांना अशा पद्धतीने आऊट केलं होतं.

Image copyright Getty Images

ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे ऑस्ट्रेलियाच्या अलन हर्स्ट यांनी पाकिस्तानच्या सिकंदर बख्त यांना मंकडेड केलं होतं.

झिम्बाब्वेत, न्यूझीलंडचा फिरकीपटू दीपक पटेलने झिम्बाब्वेच्या ग्रँट फ्लॉवरला मंकडेड करत तंबूचा रस्ता दाखवला होता.

ृ२०१४ मध्ये इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम येथील वनडेमध्ये श्रीलंकेच्या सचित्र सेनानायकेने इंग्लंडच्या जोस बटलरला मंकडेड आऊट केलं होतं. या मॅचमध्ये बटलरला इशारा देण्यात आला होता मात्र त्याने हा इशारा गांभीर्याने घेतला नाही. बटलर आऊट झाल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी श्रीलंकेच्या खेळाडूंची हुर्यो उडवली.

रवीचंद्रन अश्विनने याआधी मंकडेड केलं होतं का?

2012 मध्ये ब्रिस्बेन येथे झालेल्या वनडेत अश्विनने श्रीलंकेच्या लहिरू थिरिमानेला मंकडेड आऊट केलं होतं. तसं करण्यापूर्वी अश्विनने थिरिमानेला इशारा दिला होता. मात्र त्या मॅचमधला भारताचा कॅप्टन वीरेंद्र सेहवागने या विकेटचं अपील मागे घेतलं. यामुळे थिरिमाने आऊट झाला नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)