लोकसभा निवडणूक 2019 : नितीन गडकरींच्या वार्षिक उत्पन्नात 140 टक्क्यांनी वाढ, #5मोठ्याबातम्या

नितीन गडकरी Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. नितीन गडकरींच्या वार्षिक उत्पन्नात 140 टक्क्यांनी वाढ

भाजपचे नागपूर लोकसभा मतदाररसंघाचे उमेदवार केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वार्षिक उत्पन्नात गेल्या 5 वर्षांत 140 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवभारत टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

2013-14मध्ये नितीन गडकरींचं वार्षिक उत्पन्न 2.7 लाख इतकं होतं, ते 2017-18मध्ये 6.4 लाख इतकं झालं आहे. नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे.

तर गडकरींच्या पत्नीच्या उत्पन्नात 10 पटींनी वाढ झाली आहे. 2013-14मध्ये त्यांच्या पत्नीचं उत्पन्न 4.6 लाख इतकं होतं, ते 2017-18मध्ये 40 लाख इतकं झालं आहे.

गडकरींच्या पत्नीजवळ 7.3 कोटी रुपयांची संपत्ती आहे,. 2017च्या तुलनेत संपत्तीत 127 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गडकरींकडे चार कोटी 25 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. ज्यात 2014च्या तुलनेत 12.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असं बातमीत म्हटलं आहे.

2. रावसाहेब दानवेंचा तो व्हीडिओ बनावट - भाजप

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पुलवामा हल्ल्यासंदर्भातला व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट असल्याचा दावा भाजपनं केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

प्रसिद्धीमाध्यमांनी या व्हिडिओबाबत शहानिशा करावी आणि बनावट व्हिडिओ तयार करून बदनामी करण्याच्या कारस्थानाला बळी पडू नये, असं भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

Image copyright Raosaheb Patil Danve/fACEBOOK
प्रतिमा मथळा रावसाहेब दानवें

पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देताना दानवेंनी जवानांऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला. 'पाकिस्ताननं आपले 40 अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला' असं दानवे या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोलापूरमध्ये भाषण करताना जे वक्तव्य केले त्या व्हिडिओमध्ये मोडतोड करुन प्रदेशाध्यक्षांविषयी गैरसमज निर्माण करणारी बनावट व्हिडिओ क्लिप एका राजकीय पक्षाने सोशल मीडियामध्ये सोमवारी दुपारी व्हायरल केली.

तीन दिवसांमध्ये आपल्या सैन्याने पाकिस्तानात जाऊन आपल्या जवानांनी त्याठिकाणी चारशे अतिरेकी मारले आणि हे दाखवून दिले की, आमचे सैनिक हे काही कमी नाही हे दानवेंचे मूळ वक्तव्य आहे. पण बोलताना घेतलेल्या पॉजचा दुरुपयोग करुन बनावट व्हिडिओ तयार करुन बदनामीचा प्रयत्न करण्यात आलां असा भाजपानं दावा केला आहे.

3. गरिबांना वर्षाला ७२ हजार देणार ही काँग्रेसची घोषणा म्हणजे फसवणूक - अरुण जेटली

देशातील गरीब कुटुंबांना दरवर्षाला ७२ हजार रुपये देण्याची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची घोषणा म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. एबीपी न्यूजनं ही बातमी दिली आहे.

"काँग्रेसनं केलेली घोषणा अंकगणिताच्या आधारावर तपासली तर काँग्रेस पाच कोटी कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणार आहे. म्हणजे एकूण मिळून ३.६ लाख कोटी रुपये होतात. विद्यमान सरकारकडून खर्च होणाऱ्या रक्कमेच्या तुलनेत ही रक्कम दोन तृतीयांशही नाही.

ही घोषणा फसवणूक आहे असे जेटली म्हणाले. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना देशातील गरीबांची इतकी चिंता आहे मग काही राज्यांमध्ये पंतप्रधान किसान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या योजनेवर धीम्या गतीने काम का सुरु आहे?," असं त्यांनी म्हटलं आहे.

4. येत्या निवडणुकीत बेरोजगारी आणि कट्टरतावाद ही चिंता - सर्वे

येत्या लोकसभा निवडणुकीत देश कोणत्या दिशेला जात आहे, याबाबत मतदारांमध्ये चर्चा आहे. याच बेरोजगारी आणि कट्टरतावाद यांविषयी अधिक बोललं जात आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

अमेरिकास्थित Pew Research Centre नं केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. बहुसंख्य भारतीय मतदारांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या कट्टरवादाविषयी चिंता व्यक्त केली आहे.

देशाची आर्थिक स्थिती गेल्या 20 वर्षांपेक्षा आता उत्तम आहे, असं जवळपास 65 टक्के लोकांनी म्हटलं आहे, तर 15 टक्के लोकांनी स्थिती वाईट असल्याचं म्हटलं आहे.

पाकिस्तानपासून देशाला धोका आहे, असं 76 टक्के लोकांनी म्हटलं आहे. यातल्या 63 टक्के लोकांना गंभीर धोका वाटत आहे. 55 टक्के लोकांनी काश्मीरहा खूप मोठा प्रश्न आहे, असं वाटत आहे. मे ते जुलै 2018मध्ये 2521 जणांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे.

5. 'मणिकर्णिका'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा'

'मणिकर्णिका' हा चित्रपट यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट असून या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा, असं मत अभिनेत्री कंगना रणौतनं व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

Image copyright YOUTUBE

'मणिकर्णिका'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही तर राष्ट्रीय पुरस्कार संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतील, असंही तिनं म्हटलं आहे.

या वर्षी 'मणिकर्णिका'व्यतिरिक्त इतर कुठलाही चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासाठी योग्य नाही, असंही कंगनानं म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)