लोकसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे का?

अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे आणि संजय निरुपम Image copyright FACEBOOK

लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यासारख्या महत्त्वाच्या जागेवर काँग्रेस पक्षानं अद्यापही उमेदवारचं नाव जाहीर केलेलं नाही. चंद्रपूरमध्ये पक्षाला उमेदवार बदलावा लागला आहे, तर रत्नागिरीच्या उमेदवारावर सनातन संस्थेशी संबंध असल्याचा आरोप आहे. औरंगाबादमधील उमेदवार सुभाष झांबड यांनी अब्दुल सत्तार यांच्यासाठी उमेदवारी मागे घ्यायचं जाहीर केलं आहे, तर सांगलीत विशाल पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढवायची घोषणा केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा मिलिंद देवरा यांच्याकडे दिली आहे, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वत:हून राजीनामा द्यायच्या मनस्थितीत असल्याचं म्हटलं आहे. ही सर्व परिस्थिती पाहता, महाराष्ट्र काँग्रेसचं नेमकं चाललं काय, हा प्रश्न उपस्थित होतो.

राज्यातल्या काँग्रेसच्या या परिस्थितीला राज्यातल्या काँग्रेसच्या नेतृत्वातील आत्मविश्वास आणि राज्य आणि केंद्रीय नेतृत्व यांच्यात योग्य समन्वय नसणं, या गोष्टी कारणीभूत असल्याचं महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे सांगतात.

त्यांच्या मते, "काँग्रेसमध्ये सध्या गोंधळाचं जे वातावरण दिसतं आहे, त्याला मूळ कारण म्हणजे नेतृत्वाचा अभाव. म्हणजे काँग्रेसनं राज्यातल्या नेतृत्वाला ताकद द्यायला पाहिजे आणि त्याला काहीएक अधिकार असायला पाहिजेत. पण, राज्यात तशी परिस्थिती नाही. अशोक चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, पण दिल्लीशी कनेक्ट असलेले नेते पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक ही मंडळी आहेत. यामुळे मग निर्णय घेताना ढवळाढवळ होते. राज्यातल्या कमिटीनं काही निर्णय घ्यायचे आणि केंद्रीय नेतृत्वाच्या जवळील लोकांनी त्यात फेरफार करायचा, असा प्रॉब्लेम यामुळे निर्माण होत आहे."

"दुसरं म्हणजे अशोक चव्हाण यांनी ज्या आत्मविश्वासानं पक्षाचं नेतृत्व सांभाळायला पाहिजे होतं, तो आत्मविश्वास त्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये दाखवला नाही. निवडणुकीच्या काळातही तो त्यांच्यात दिसत नाही. उलट आपण हतबल आहोत, असं चित्र त्यांनी निर्माण केलंय," ते पुढे सांगतात.

"खरं तर ही वेळ अशी आहे ज्यावेळी काँग्रेसनं सगळे मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत निवडणुकीला सामोरं जायला हवं. पण अशावेळी महत्त्वाची माणसं म्हणजे अब्दुल सत्तार यांच्यासारखी माणसं नाराजीचं कारण देऊन बंडाचं राजकारण करताना दिसून येत आहेत. पक्षाचं कुणाला काही देणंघेणं नाही, अशी गोंधळाची परिस्थिती आहे. या गोंधळाचा परिणाम उमेदवारांवर, त्यांच्या तयारीवर होताना दिसून येतो. मुंबईत निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसनं अध्यक्ष बदलला आहे. मिलिंद देवरा जे स्वत: लोकसभेचे उमेदवार आहेत, त्याच्याकडे ही जबाबदारी देणं यासारखी वाईट गोष्ट दुसरी नाही. या काळात त्यांनी स्वत:ची निवडणूक लढवावी की मुंबई सांभाळावी?", चोरमारे सांगतात.

'स्थानिक नेत्यांचा मनमानी कारभार'

राज्यातल्या काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते कह्यात राहिलेले नाहीत, यामुळे राज्यात काँग्रेसची गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली दिसते, असं राजकीय विश्लेषक प्रतास आसबे यांना वाटतं.

Image copyright Getty Images

"काँग्रेसमधील स्थानिक लोक कुणाच्या कह्यात राहिलेले नाहीत. त्यांना जे हवंय तसं ते करतात. उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये सगळे काँग्रेसवाले शिवसेनेबरोबर गेले. उस्मानाबादमध्येही तसाच प्रकार चाललाय. खालच्या लोकांवर कुणाचा वचक नाही आणि वरच्या लोकांचा काही संपर्क राहिलेला नाही."

"काँग्रेसनं मुंबई प्रदेशचा अध्यक्ष बदलला आहे. निवडणुकाच्या तोंडावर या गोष्टी करण्याबदद्ल पक्षानं विचार करायला हवा. खरं तर राधाकृष्ण विखे पाटलांचा अशोक चव्हाणांनी राजीनामा घ्यायला हवा होता, पण कौंटुबिक संबंध असल्यामुळे त्यांनी तसं केलं नाही. महाराष्ट्रात काँग्रेस कमकुवत आहे, असाच या सर्व गोष्टींचा अर्थ निघतो," ते पुढे सांगतात.

'पक्षाला शिस्त राहिली नाही'

ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते, काँग्रेस पक्षाला काही शिस्त राहिली नाही, त्यामुळे काँग्रेसमध्ये गोंधळाचं वातावरण आहे.

त्या सांगतात, "महाराष्ट्रातली काँग्रेस ही कायम गटातटाची काँग्रेस राहिली आहे. या सगळ्या गटांना एकसंध बांधून ठेवणारा नेता महाराष्ट्रात कुणी नव्हता. एकीकडे शरद पवारांना विरोध आणि त्याजोडीलाच पवारांच्या नेतृत्वगुणांविषयी आश्चर्य यात काँग्रेसची वाटचाल सुरू राहिली.

"विलासराव देशमुख यांच्यानंतर काँग्रेसला त्या प्रमाणात एकसंध ठेवणारा कोणता नेता राहिला नाही. दिल्लीनंसुद्धा राज्यातल्या नेत्यांचे पंख कापत नेले. म्हणजे राज्यात कुणाला मोठं होऊ द्यायचं नाही आणि सगळ्या दोऱ्या आपल्या हातात ठेवायच्या हा जो काही काँग्रेस राजकारणाचा देशस्तरावरचा भाग आहे, त्याचे राज्यात परिणाम दिसायला लागले आहेत."

Image copyright Twitter

"उमेदवार ठरवताना चर्चा व्हायला पाहिजे, गावागावातल्या नेत्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे, त्यांचं मत जाणून घ्यायला पाहिजे, तसं काही काँग्रेसच्या बाबतीत झालं नाही. दुसरं स्वत:चं अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे त्यातून बाहेर निघण्यासाठी त्यांना जी धडपड करावी लागली, त्यामुळे त्यांना संघटना बांधणीसाठी वेळ देता आला नाही. गेल्या काही वर्षांत काँग्रेस सतत सत्तेत असल्यामुळे हा सत्तेतल्या लोकांचा पक्ष आहे, विरोधातल्या लोकांचा पक्ष झालाच नाही अजून, अशी मानसिकता राहिली आहे.

"यामुळे पक्षाला काही शिस्त राहिली नाही. काँग्रेसने राज्यात प्रभारी म्हणून मध्ये मोहन प्रकाश यांची नियुक्ती केली. त्यानंतर अचानक मल्लिकार्जुन खर्गे आले. यामुळे मग काँग्रेसकडे पूर्णपणे कुणी लक्ष दिलं नाही आणि मग आपणच नेता आहोत, असं प्रत्येकाला वाटायला लागलं. यामुळे मग सत्ता भाजपकडे दिसतेय, त्यामुळे मग तत्वांना तिलांजली देऊन तिकडे जायला कुणाला काही वाटलं नाही," त्यापुढे सांगतात.

"संजय निरुपम मुंबईत सगळ्या गटांना बरोबर घेऊन चालले नाहीत. पण त्याच वेळेला त्यांनी सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढली. पण या प्रकरणांना काँग्रेसवाल्यांनी विधीमंडळात आवाज दिला नाही. शिवसेनेतून आलेले, अशीच निरुपम यांची इमेज राहिली. गेल्या वेळी पराभूत झालेल्या नेत्याला काँग्रेसनं अध्यक्षपद देऊन काय केलं? सांगली हा वसंतदादांचा मतदारसंघ आहे. महाराष्ट्रात सर्वांत जास्त लोकांमध्ये राहिलेले ते नेते आहेत. त्यांच्या जिल्ह्यात काँग्रेसला उमेदवारच मिळत नाहीये. याहून दारुण परिस्थिती दुसरी कोणती असू शकते. यामुळे राज्यातल्या काँग्रेसबद्दल मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे."

Image copyright Getty Images

"या सर्व बाबी लक्षात घेता सध्या काँग्रेस लढण्याआधीच पराभूत मानसिकतेत आली आहे, असं वाटतं. प्रदेशाध्यक्ष स्वत: मी राजीनामा द्यायच्या तयारीत आहे, असं म्हणताहेत, यावरून काँग्रेससाठी किती चिंतेचं वातावरण आहे, हे दिसून येतं," नानिवडेकर सांगतात.

दरम्यान, काँग्रेस पक्षात गोंधळाचं वातावरण नसून सर्व काही ठीक आहे, असं काँग्रेस नेते राजीव सातव यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

"काँग्रेस हे समाजाचं प्रतिबिंब आहे. समाजात दोन्ही प्रकारची लोकं असतात. तशी ती काँग्रेसमध्येही आहेत. त्यामुळे ही नवी बाब नाहीये. याआधीही निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षातून नेत्यांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग झालेलं आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)