IPL: राजस्थान रॉयल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सामन्यात 'चौकीदार चोर है'च्या घोषणा? - फॅक्ट चेक

जयपूर, आयपीएल Image copyright viral post
प्रतिमा मथळा जयपूर येथे IPL सामन्याला उपस्थित प्रेक्षक

2019 IPL हंगाम सुरू होऊन अजून एक आठवडाही उलटला नाहीये. पण वादांना सुरुवात झाली आहेच.

सोमवारी घडलेलं 'मंकडेड' प्रकरण त्यापैकीच एक. त्यातल्या त्यात देशात निवडणुकांचं वारं वाहत असताना ते IPLच्या स्टेडियममध्ये नाही पोहोचलं तर नवलच.

सोमवारी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातला IPL सामना रंगला होता. पण मॅच सुरू असताना 'चौकीदार चोर है' अशा घोषणा प्रेक्षकांनी दिल्या, असा दावा समोर आला आहे. तो खरा आहे का?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या 24 सेकंदांच्या व्हीडिओमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा बॅट्समन निकोलस पूरन खेळताना दिसत आहे. राजस्थानतर्फे जयदेव उनाडकट गोलंदाजी करताना दिसत आहे.

मैदानावर बॅट आणि बॉलदरम्यानची लढाई सुरू असताना प्रेक्षकांमध्ये 'चौकीदार चोर है' घोषणा ऐकू येतात... त्याही पाचवेळा.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा मॅचमधला घोषणांचा शेअर होणारा व्हीडिओ

रफाल लढाऊ विमानांच्या खरेदीत गैरव्यवहार झाला, असा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर 'चौकीदार चोर है' अशी घोषणा देत हल्ला चढवला होता.

त्यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मैं भी चौकीदार' अशी मोहीम सुरू केली. मी देशाचा चौकीदार आहे, त्यामुळे देश सुरक्षित माणसाच्या हाती आहे, असंही ते सांगतात.

लोकसभा निवडणुकांपूर्वी अशी खडाजंगी तर सोशल मीडियावरही चांगलीच रंगत आहे. पण IPL सामन्यात ती पाहायला मिळणं, हे काहीतरी भलतंच आहे.

सोमवारच्या IPL मॅचचा हा व्हीडिओ व्हॉट्सअॅप, शेअरचॅटसह फेसबुक तसंच ट्विटरवर शेकडो लोकांनी शेअर केला आहे.

राजस्थानचे रहिवासी असणाऱ्या ललित देवासी या ट्विटर युजरने लिहिलं आहे की, "काळाचा महिमा बघा. ज्या IPLमध्ये मोदी-मोदी घोषणा दिल्या जायच्या, त्याच IPLमध्ये 'चौकीदार चोर है'च्या घोषणा दिल्या जात आहेत. काळ हेच सगळ्यावरचं उत्तर आहे."

फेसबुकवर याच दाव्यानिशी कमीतकमी 6 विविध भाषांमध्ये असंख्य ग्रुप्समध्ये हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

पण ही पूर्ण गोष्ट नाही.

स्टेडियममध्ये एकच घोषणा?

जयपूरमध्ये रात्री 8 वाजता मॅच सुरू झाली. सवाई मानसिंह स्टेडियम सरासरी भरलं होतं.

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली. त्यांच्या इनिंग्जच्या 14व्या ओव्हरदरम्यान 'जीतेगा भाई जीतेगा' अशी स्पीकरवरून घोषणा देण्यात आली. त्याला प्रेक्षकांनी 'राजस्थान जीतेगा' असं आवाजी उत्तर दिलं.

15 आणि 17व्या ओव्हरदरम्यान ही घोषणा पुन्हा झाली आणि प्रेक्षकांनी पुन्हा जोरदार आवाजात हेच उत्तर दिलं.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा स्टेडियमध्ये नक्की किती आणि कोणत्या घोषणा दिल्या जात होत्या?

राजस्थान रॉयल्सच्या जयदेव उनाडकतने 18व्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू टाकला, त्याचवेळी स्टेडियमच्या नॉर्थ स्टँडमध्ये 'मोदी-मोदी'च्या घोषणांचा आवाज ऐकू येऊ लागला.

स्टेडियममध्ये वेस्ट स्टँडमध्ये बसलेल्या 23वर्षीय बी. टेक.चा विद्यार्थी जयंत चौबेने सांगितलं की, "स्टेडियममध्ये प्रवेश करताना मोठ्या प्रमाणावर चेकिंग करण्यात आलं होतं. राजकीय स्वरूपाचा मजकूर असलेलं काहीही स्टेडियममध्ये नेण्यास परवानगी नव्हती. मॅचच्या सुरुवातीला मोठ्या आवाजात संगीत सुरू होतं. मात्र 18व्या ओव्हरमध्ये देण्यात आलेल्या घोषणा स्पष्ट ऐकू आल्या."

Image copyright viral post
प्रतिमा मथळा स्टेडियमचं चित्र

18व्या ओव्हरमध्येच दुसऱ्या चेंडूवर पंजाबच्या निकोलस पूरनने जयदेवच्या गोलंदाजीवर चौकार लगावला तेव्हा वेगळ्या घोषणा ऐकायला मिळाल्या.

गर्दीतून आवाज आला - 'चौकीदार चोर है'. पाचवेळा ही घोषणाबाजी ऐकू आली.

हॉटस्टार या IPLचं प्रक्षेपण करणाऱ्या अधिकृत वेबसाईटवर ही घोषणाबाजी पूर्ण ऐकायला मिळते.

स्टेडियममध्ये 'चौकीदार चोर है'च्या घोषणा मोदी-मोदी घोषणेला प्रत्युत्तर म्हणून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे स्टेडियममध्ये फक्त 'चौकीदार चोर है' ही एकच घोषणा दिली गेली, असं नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)