लोकसभा 2019: कोण कोणत्या पक्षात आहे, कळेनासं झालंय? - बीबीसी मराठी राउंडअप

Image copyright Getty / BBC

कोण कोणत्या पक्षात आहे?

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे की, निवडणूक आयोगानं लोकसभेची निवडणूक एक महिना लांबवावी कारण इतकी पक्षांतरं होत आहेत की कोण कोणत्या पक्षात गेलंय आणि कुणाकडून लढतंय, हे समजायला मतदारांना वेळ लागेल!

निवडणुका म्हटल्या की पक्षांतरही ओघाने आलंच. त्याला अनेक पैलू आणि कारणं आहेत. ही पक्षांतरं कधी अपेक्षित तर कधी धक्कादायक असतात. येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या निवडणुकाही त्याला अपवाद नाहीत.

देशभरात ही आवक जावक सुरू असताना महाराष्ट्रात काय स्थिती आहे यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप वाचा.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एवढा गोंधळ कशामुळे?

लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यासारख्या महत्त्वाच्या जागेवर काँग्रेस पक्षानं अद्यापही उमेदवारचं नाव जाहीर केलेलं नाही. चंद्रपूरमध्ये पक्षाला उमेदवार बदलावा लागला आहे, तर रत्नागिरीच्या उमेदवारावर सनातन संस्थेशी संबंध असल्याचा आरोप आहे.

औरंगाबादमधील उमेदवार सुभाष झांबड यांनी अब्दुल सत्तार यांच्यासाठी उमेदवारी मागे घ्यायचं जाहीर केलं आहे, तर सांगलीत विशाल पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढवायची घोषणा केली आहे.

Image copyright Facebook
प्रतिमा मथळा अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, संजय निरुपम

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा मिलिंद देवरा यांच्याकडे दिली आहे, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वत:हून राजीनामा द्यायच्या मनस्थितीत असल्याचं म्हटलं आहे.

ही सर्व परिस्थिती पाहता, महाराष्ट्र काँग्रेसचं नेमकं चाललं काय, हा प्रश्न उपस्थित होतो. वाचा सविस्तर बातमी इथे

अमित शहा हे नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी?

भाजपने आपले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना निवडणुकांच्या राजकारणातून बाजूला करत अमित शाह यांच्या आगमनाची घोषणा केली आहे. अडवाणी यांना निवृत्त केले जाईल, असं निश्चित होतंच परंतु औपचारिक घोषणेची सर्व वाट पाहात होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अमित शाह आणि नरेंद्र मोदी

परंतु अमित शाह यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवणं भाजपच्या भविष्यातील राजकारणाचे संकेत देणारं आहे.

वाचा वरिष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांचा दृष्टिकोन.

पाकिस्तानातील हिंदू मुलींच्या धर्मांतर प्रकरणाला नवं वळण

पाकिस्तानात दोन हिंदू मुलींचं कथित अपहरण आणि त्यानंतर त्यांच्या धर्मांतराचा मुद्दा आता इस्लामाबाद इथल्या हायकोर्टात पोहोचला आहे.

या मुलींनी न्यायालयात सरन्यायाधीशांना सांगितलं की त्यांचं वय अनुक्रमे 18 आणि 20 वर्षं असून त्यांनी स्वतःच्या मर्जीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी फरहान रफी म्हणाले, "या दोन्ही मुलींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की सरकारी संस्था आणि माध्यमं आम्हाला त्रास देत असून या प्रकरणी त्यांच्यावर योग्य ते निर्बंध लादले जावेत.

"आमच्या जिवाला धोका असून सुरक्षा पुरवली जावी," अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

वाचा काय होतंय या प्रकरणात.

अश्विनने जोस बटलरला 'मंकडेड' केलं आणि मॅच फिरली...

जयपूर इथल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या बॉलर्सची यथेच्छ धुलाई करत होता. किंग्ज इलेव्हन पंजाबने सुरूवातीला बॅटिंग करताना १८४ धावांची मजल मारली होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १२.४ ओव्हर्समध्ये १ बाद १०८ अशा सुस्थितीत होता. त्याक्षणी राजस्थानला जिंकण्यासाठी ७.२ ओव्हर्समध्ये म्हणजेच ४३ चेंडूत ७७ रन्स हव्या होत्या. हे करण्यासाठी त्यांच्या हातात ९ विकेट्स होत्या. विजयाचं पारडं राजस्थानच्या बाजूने झुकलेलं आहे असं चित्र होतं.

पाचव्या चेंडूवर अश्विनने रनअप सुरू केला. अंपायरच्या इथे येताच त्याने बाजूला बघितलं. त्यावेळी बटलर क्रीझच्या बाहेर असल्याचं त्याच्या लक्षात आलं. अश्विनने झटकन रनअप थांबवून बटलरला आऊट केलं.

हे नियमात बसणारं असलं तरी कितपत योग्य होतं, असा प्रश्न आता सर्व स्तरांवर विचारला आणि चर्चिला जात आहे, तेही ती विकेट पडल्याच्या 40 तासांनंतरही. वाचा नेमकं काय घडलं ते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)