इम्रान खान यांना वाटतं भारत आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करू शकतो #5मोठ्याबातम्या

मोदी आणि इम्रान खान Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूयात

1. भारत आणखी सर्जिकल स्ट्राइक करू शकतो, पाकिस्तानला भीती

लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकार पाकिस्तानात घुसून आणखी एखादी कारवाई करु शकते अशी शक्यता इम्रान खान यांनी बोलून दाखवली. भारत-पाकिस्तानवर अजूनही युद्धाची छाया आहे कारण मोदी सरकार पाकिस्तानात घुसून आणखी एखादी कारवाई करु शकते असे इम्रान म्हणाले. हे वृत्त फायनांशिएल टाइम्सनं दिलं आहे.

धोका अजून संपलेला नाही. भारतातील लोकसभा निवडणुकीपर्यंत तणाव कायम राहिल. भारताने कोणतेही आक्रमक पाऊल उचलल्यास आम्ही सज्ज आहोत असे इम्रान म्हणाले. पाकिस्तानचं आणि जैश ए मोहम्मदचं काही नातं नाही हे देखील त्यांनी पुन्हा बोलून दाखवलं.

2. नरेंद्र मोदींवर आधारित चित्रपटाला निवडणूक आयोगाची नोटीस

विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट PM नरेंद्र मोदी'ला निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून निर्मात्यांकडून आम्ही स्पष्टीकरणाची वाट पाहत आहोत असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

या चित्रपटाने आचारसंहितेचा भंग केला असं निवडणूक आयोगाला वाटल्यानंतर त्यांनी नोटीस पाठवली आहे अशी माहिती दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंह यांनी दिली असं वृत्त द वायरनं दिलं आहे.

निर्मात्यांना 30 मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे असं ते म्हणाले. निवडणुकीच्या काळात राजकीय जाहिराती प्रसिद्ध करण्याआधी निवडणूक आयोगाच्या मीडिया सर्टिफिकेशन अॅंड मॉनिटरिंग कमिटीची परवानगी घेणं आवश्यक आहे पण ती निर्मात्यांनी घेतली नाही त्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

3. एक एप्रिलपासून महाराष्ट्रात सहा टक्के वीज दरवाढ

राज्य वीज नियामक आयोगाने सप्टेंबर २०१८ मध्ये दिलेल्या वीजदरवाढ आदेशानुसार राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणचे वीजदर आता १ एप्रिल २०१९ पासून पुन्हा वाढणार आहेत. घरगुती वीजग्राहकांना सरासरी सहा टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे, असं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.

राज्य वीज आयोगाने १२ सप्टेंबर २०१८ रोजी राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीजदरांना मान्यता दिली होती. त्यानुसार महावितरण, अदानी, टाटा पॉवर यांचे वीजदर वाढले होते. तर बेस्टचे वीजदर कमी झाले होते. महावितरणला ८२६८ कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली होती. आता १ एप्रिल

4. निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यात आचारसंहिता भंगाचे ४,४२८ गुन्हे

लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग, तसेच बेकायदा दारू बाळगणे आदी प्रकरणांत चार हजार ४२८ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. शस्त्र परवानाधारकांकडून खबरदारीचा उपाय म्हणून ३२ हजार ७९७ शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत.

Image copyright Getty Images/ Sam Panthaky
प्रतिमा मथळा निवडणूक प्रचारादरम्यानचे दृश्य.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता अंमलात आली आहे. राज्यात काटेकोर पद्धतीने निवडणूक प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. ११ मार्चपासून आजपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने राज्यभरात पोलिस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे.

5. युतीमधील वाद मिटविण्यासाठी उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री यांच्यात बैठक

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. शिवसेना भाजपमधल्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामधलें उरले सुरले वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. या बैठकीला सेना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते, हे वृत्त झी 24 तासनं दिलं आहे.

पुढच्या दोन - चार दिवसांत शिवसेना भाजपच्या संयुक्त सभा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यात विविध ठिकाणी सुरू होणार आहेत. त्याआधी काही ठिकाणी असलेले वाद मिटवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. यानिमित्ताने राज्यातील चार टप्प्यातील निवडणूक प्रचाराची रणनीतीवरही चर्चा झाली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)