IPL 2019: ड्वेन ब्राव्हो आणि शेन वॉटसनने दिल्लीला नमवलं

शेन वॉटसन Image copyright Pti

आयपीएलच्या बाराव्या सिझनमध्ये दिल्ली कॅपिटलला आपल्याच होम पिचवर चेन्नई सुपर किंग्सला विजयापासून रोखता आलं नाही.

चेन्नईच्या विजयात ब्रावोच्या तीन विकेट्सचा आणि त्यानंतर शेन वॉटसनच्या 44 धावांच्या तुफानी खेळीचा महत्त्वाचा वाटा होता.

चेन्नईनं सहा विकेट्स राखून हा सामना खिशात घातला.चेन्नईसमोर विजयासाठी 148 धावांचं लक्ष्य होतं. जे त्यांनी 19.4 ओव्हरमध्येच साध्य केलं. आणि तेही फक्त 4 विकेट्सच्या बळावर.

नेहमीप्रमाणे चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी संकटमोचक बनून धावून आला. त्यानं दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 35 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी केवळ दोन धावांची गरज होती.

अशावेळी कॅसिगो रबाडाच्या स्विंगवर केदार जाधव झेलबाद झाला. त्यानं 27 धावांची खेळी केली होती. मात्र त्यानंतर ब्राव्होनं रबाडाच्या चेंडूवर चौकार ठोकून टीमला विजय मिळवून दिला.

चेन्नईच्या विजयात सदाबहार फलंदाज सुरेश रैनानंही 30 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलं. याआधी ब्राव्होनं तीन विकेट्स घेऊन मैदानावर आपली जादू दाखवून दिली होती.

शेन वॉटसनचं योगदान

या मॅचमध्ये शेन वॉटसनच्या योगदानाची आठवण ठेवली नाही तर तो त्याचावरचा अन्याय ठरेल.

Image copyright Getty Images

शेन वॉटसननं केवळ 26 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 44 धावा करून विजयाचा पाया रचला.

मात्र अमित मिश्राच्या चेंडूवर ऋषभ पंतनं झेल पकडून वॉटसनला तंबू दाखवला. मात्र 44 धावांची दमदार खेळी करणाऱ्या वॉटसनला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला.

मॅचनंतर पिचबद्दल जेव्हा वॉटसनला विचारण्यात आलं तेव्हा तो गंमतीनं म्हणाला की आयपीएलच्या पहिल्या मॅचचं पिच चेन्नईपेक्षा वाईट नक्कीच नव्हतं. यावेळी वॉटसननं पीएसएल म्हणजेच पाकिस्तान प्रिमियर लीग खेळल्याचा फायदा मिळाल्याचंही मान्य केलं.

गेल्या वर्षी 2018 मध्ये वॉटसननं आयपीएलच्य फायनमध्ये 57 चेंडूत 117 धावांची झंझावाती खेळी करून चेन्नईला एकट्याच्या बळावर चँपियन बनवलं होतं. वॉटसनच्याच जीवावर चेन्नईनं विजयासाठी असलेलं 179 धावांचं लक्ष्यं केवळ 18.3 ओव्हरमध्येच गाठलं होतं.

विशेष म्हणजे शेन वॉटसन आईपीएलमधील सर्वात जास्त कमाई करणारे खेळाडू म्हणूनही ओळखला जातो. 2011 मध्ये 20 कोटी रूपये कमावल्याने ते चर्चेच्या केंद्रस्थानी होते.

एकेकाळी वॉटसन ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात उत्तम ऑलराऊंडर म्हणून ओळखला जायचा. आयपीएलमध्ये वॉटसननं 119 सामन्यांमध्ये 4 शतक आणि 16 अर्धशतकांच्या मदतीनं 3221 धावांचा डोंगर रचलाय.

वादांशी जुनं नातं

शेन वॉटसन बऱ्याचदा वादाच्या केंद्रस्थानीही राहिलाय. दिल्लीचा फास्ट बॉलर रबाडासोबत मैदानावर किरकोळ बाचाबाचीही झाली

2013 साली मायकल क्लार्कच्य नेतृत्वात ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौऱ्यावर होती. मात्र वॉटसन आपल्या पूर्ण क्षमतेनं खेळत नसल्याचं म्हणत क्लार्कनं त्यांना सीरीज सुरू असताना टीममधून बाहेर ठेवलं.

मात्र सीरीजच्या चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात क्लार्क कंबरदुखीमुळे मैदानापासून दूर राहिला आणि यावेळी दिल्लीत झालेल्या सामन्यात अनुभवी वॉटसननं ऑस्ट्रेलियाची मदार आपल्या खांद्यावर घेतली.

त्या कसोटी सामन्यातही भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवला. आणि चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-0 ने पराभव केला. त्यावेळी भारताच्या टीमची मदार महेंद्र सिंग धोनीच्या खांद्यावर होती.

आणि आता चेन्नईच्या टीमचा कॅप्टन असलेल्या धोनीचा शेन वॉटसन हा फेव्हरेट खेळाडू आहे.

टॉस जिंकला मात्र मॅच हरली

याआधी फिरोजशाह कोटला मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या टीमनं निर्धारीत 20 ओव्हरमध्ये सहा विकेट्स गमावून 147 धावा केल्या.

चेन्नई सुपर किंग्सनं पहिल्याच सामन्यात आपल्या स्पिनर्सच्या जोरावर विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू टीमला केवळ 70 धावांमध्ये तंबूत धाडलं.

पण दिल्लीत मात्र रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूच्या ब्राव्होनं कमाल केली. त्यांच्या गोलंदाजीसमोर दिल्लीचे बॅट्समन आपली ताकद दाखवू शकले नाहीत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ब्राव्हो आणि धोनी

ब्राव्होने चार ओव्हर्समध्ये 33 रन देऊन तीन विकेट्स खिशात घातल्या. दिल्लीची सलामीची जोडी शिखर धवन आणि पृथ्वी शॉने पहिल्या विकेट्साठी 4.3 ओव्हरमध्ये 36 धावा ठोकून चांगली सुरूवात करून दिली.

पृथ्वी शॉने 16 चेंडूत 5 चौकार ठोकून 24 धावांची खेळी केली. यानंतर शिखर धवनच्या बॅटलाही लगाम लागला. शिखर 18 व्या ओव्हरमध्ये तंबूत परतला. त्यानं 47 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीनं 51 धावा केल्या.

मुंबईविरोधात 2 चेंडूत 78 धावा ठोकून सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ऋषभ पंतने 13 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 25 धावा केल्या. पण ब्राव्होच्या चेंडूवर शार्दूल ठाकूरने कॅच घेऊन धोनीला दिलासा दिला.

दिल्लीचा कॅप्टन श्रेयस अय्यरने 20 चेंडूत 18 धावा केल्या. पण स्पिनर ताहिरनं त्याला क्लीन बोल्ड केलं.

बंगलोरविरोधात तीन विकेट्स घेऊन आपली कमाल दाखवणाऱ्या हरभजन सिंगला चार ओव्हर्समध्ये एकही विकेट मिळाली नाही. मात्र त्यानं दिल्लीच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून दूर ठेवलं.

फिरोजशाह कोटलाचं मैदान स्पिनर्ससाठी चांगलं मानलं जातं. मात्र रविंद्र जाडेजा अशा विकेटवर फलंदाजांना चकवा देण्यात माहिर मानला जातो. जाडेजानं 4 ओव्हर्समध्ये 23 धावा देऊन किमो पॉलला तंबूत धाडलं.

या विजयासह चेन्नईनं पुन्हा एकदा आपण बाकीच्या टीम्ससाठी धोक्याची घंटा ठरणार असं सूचित केलंय. आता बुधवारी म्हणजे आज कोलकाता नाइटरायडर्स आपल्याच ईडन गार्डंन्स स्टेडियमवर किंग्स इलेव्हन पंजाबचा सामना करणार आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)