नरेंद्र मोदी : भारतानं एक लाईव्ह सॅटेलाईट उदध्वस्त केलं

नरेंद्र मोदी Image copyright Getty Images

अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारतही अंतराळ विश्वात महाशक्ती बनला आहे. भारतानं 'मिशन शक्ती'च्या अंतर्गत लो अर्थ ऑर्बिटमध्ये भारतानं एक लाईव्ह सॅटेलाईट नष्ट केलं आहे. ही एक नियोजित मोहीम होती. हे मिशन केवळ तीन मिनिटात पार पाडल्याचंही मोदींनी देशाला सांगितलं.

तब्बल अर्धा-पाऊण तास देशाची उत्कंठा शिगेला पोहोचवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत देशाला संबोधित करताना महत्त्वाची माहिती दिली.

लो अर्थ ऑर्बिटमध्ये भारतानं सॅटेलाईट नष्ट केल्यानंतर भारत अंतराळ विश्वात महाशक्ती बनला आहे. याआधी अमेरिका, चीन आणि रशिया या तीन देशांनीच ही कमाल करून दाखवली होती.

देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी 'मिशन शक्ती'साठी आपली ताकद पणाला लावणाऱ्या डीआरडीओच्या सगळ्या शास्त्रज्ञांचंही अभिनंदन केलं.

यावेळी देशवासियांशी बोलताना मोदी म्हणाले की, "हा देशासाठी सर्वांत महत्त्वपूर्ण क्षण आहे. आपल्या सॅटेलाइटचा फायदा सर्वांनाच होत आहे. यापुढे अंतराळ आणि सॅटेलाइटचं महत्त्व वाढतच जाणार आहे. अॅंटी सॅटेलाइट - A SAT मिसाईल ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. भारतानं जी नवी क्षमता प्राप्त केली आहे ती देशाच्या सुरक्षेसाठी आहे. भारताचं हे परीक्षण कुणाच्या विरोधात नाही. आजची चाचणी ही कोणत्याच आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करणारी नाही, असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे."

तसंच आजच्या चाचणीमुळे भारत सुरक्षित राष्ट्र बनला आहे अशी ग्वाहीसुद्धा मोदींनी दिली.

राहुल गांधींनी काढला चिमटा

राहुल गांधी यांनी ट्वीट करून डीआरडिओचं अभिनंदन केलं आहे. डीआरडीओचा अभिमान असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नेरंद्र मोदी यांना चिमटा काढत जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

'मिशन शक्ती' यशस्वी झालं म्हणजे नेमकं काय झालं?

पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरत असणारे अर्थात भारतावर नजर ठेवणारे सॅटेलाईट असतात. त्या सॅटेलाईट्सना उध्वस्त करणारं क्षेपणास्त्र तयार केलं आहे.

लो अर्थ ऑर्बिट 200 ते 500 किलोमीटर पर्यंत असतं. या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या सॅटेलाईट्सचा वेग ताशी काही हजार किलोमीटरचा असतो. हे सॅटेलाईट्स 90 मिनिटात पृथ्वीभोवतीची एक फेरी पूर्ण करतात.

एवढ्या वेगात पृथ्वीभोवती फिरणारे हे सॅटेलाईट्स आहेत, त्यांना एका बिंदूत गाठून उध्वस्त करण्याची अचूकता आपल्याकडे नव्हती. ती अचूकता डीआरडीओनं साधली.

त्यामुळे यापुढे भारतावर नजर ठेवणाऱ्या किंवा भारतासाठी धोकादायक असलेल्या सॅटेलाईट्सना उध्वस्त करणं शक्य होणार आहे.

याआधी ही अचूकता फक्त अमेरिका, चीन आणि रशियाकडेच होती.

DRDOचे निवृत्त अधिकारी W. सेल्वामुर्ती यांच्या मते, "सध्या देशाला कोणत्याही राष्ट्राकडून सुरक्षेविषयी धोका नाहीये. पण, आजच्या उपलब्धतेमुळे भारताची बाजू मजबूत झाली आहे. याचा अर्थ अंतराळातील धोक्यांपासून भारत स्वत:चा बचाव करू शकेल. एखाद्या देशानं भारतीय अंतराळात हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तर भारत त्याला तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर देईल, असा यातून मेसेज जाईल." बीबीसी तामिळचे प्रतिनिधी बाल सुब्रह्मण्याम यांनी सेल्वामुर्ती यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

ते पुढे म्हणाले, "बुधवारचं परीक्षण यशस्वी ठरलं आहे. हे मिसाईल सॅटेलाईट जमिनीवरून मारा करू शकतं आणि ते शत्रूच्या कोणत्याही उपग्रहाला टार्गेट करू शकेल. यासाठी फक्त टार्गेट आणि मिसाईलचा वेग मॅच करावा लागेल."

अॅंटी सॅटेलाइट मिसाइलचं महत्त्व काय?

अवकाशात असलेला उपग्रह भेदू शकणारं जे मिसाइल आहे त्याला अॅंटी सॅटेलाइट मिसाइल म्हणतात. या मिसाइलच्या साहाय्याने अवकाशात असलेल्या उपग्रहाला नष्ट करता येऊ शकतं किंवा त्यात हस्तक्षेप करता येऊ शकतो.

चीनने 2007मध्ये अॅंटी सॅटेलाइट मिसाइलची चाचणी केली होती. चीनने त्यांच्याच देशाचा फेंग युन- 1C, हा सॅटेलाइट नष्ट केला होता असं म्हटलं जातं. पृथ्वीपासून 800 किमी दूर हा सॅटेलाइट होता.

या सॅटेलाइटचं संरक्षणाच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे?

सॅटेलाइटचं सर्वांत महत्त्वाचं काम असतं ते माहिती गोळा करणं. जर आपल्या देशावर एखाद्या सॅटेलाइटने पाळत ठेवली असेल तर तो सॅटेलाइट आपल्याला पाडता येऊ शकतो.

ज्या देशाकडे अॅंटी सॅटेलाइट तंत्रज्ञान आहे तो देश सामरिकदृष्ट्या सशक्त समजला जातो. हे तंत्रज्ञान असलेला देश आपल्या शत्रू राष्ट्राची दूरसंचाराची साधनं उद्ध्वस्त करू शकतो त्यामुळे या शत्रू राष्ट्राच्या शक्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान मानलं जातं असं काउंसिल ऑन फॉरेन रिलेशन या संस्थेनं म्हटलं आहे.

2012 पासून भारताने अॅंटी सॅटेलाइट मिसाइल बनवण्याचे प्रयत्न सुरू केले असावेत असा अंदाज द डिप्लोमॅट या वेबसाइटनं दिला आहे. द डिप्लोमॅट ही साइट आंतरराष्ट्रीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखांसाठी प्रसिद्ध आहे. पण टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अॅंटी सॅटेलाइट मिसाइलचे प्रयत्न भारताने 2008लाच सुरू केले असावेत.

'UPAच्याच काळात तंत्रज्ञान विकसनाची सुरुवात'

2008 साली तत्कालीन संरक्षण मंत्री ए. के. अॅंटनी यांनी 'समग्र अवकाश विभाग' नावाच्या एका कार्यक्रमाची घोषणा केली होती. अवकाशात असलेली आपली साधन संपत्ती सुरक्षित राहावी या दृष्टीने डिफेन्स स्पेस व्हिजन 2020 या कार्यक्रमाची केली होती.

आज पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेबद्दल काय वाटतं असं विचारलं असता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण 'ABP माझा'ला म्हणाले, "2012 सालीच व्ही. के. सारस्वत यांनी सांगितलं होतं की हा अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित झालं आहे. सारस्वत हे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. पण या तंत्रज्ञानाची चाचणी घ्यायची नाही असा निर्णय UPA सरकारनं घेतला होता. पण या सरकारने तो घेतला." चव्हाण हे अवकाश आयोगाचे सदस्य होते.

"ही निश्चितच मोठी उपलब्धी आहे ही मोठी उपलब्धी आहे पण पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करून करावा का हा प्रश्न देखील उपस्थित होतो," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी देखील म्हटलं की आज ज्या अॅंटी सॅटेलाइटच्या यशस्वी चाचणीची घोषणा केली ते UPA सरकारच्याच दूरदृष्टीमुळे बनलं आहे. त्याबद्दल डॉ. मनमोहन सिंग यांचं मी अभिनंदन करतो.

देशाला संबोधित करण्यापूर्वी मोदी कुठे होते?

देशाला संबोधित करण्याआधी नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी म्हणजे सात रेसकोर्सवर कॅबिनेटची बैठक झाली. सुक्षेच्या मुद्द्यावर असलेल्या या बैठकीसाठी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांनी 'मिशन शक्ती'यशस्वी झाल्याची घोषणा केली.

नरेंद्र मोदी मौनात का होते?

नरेंद्र मोदी हे होळीच्या आधीपासून मौनात असल्याचं सांगितलं जातंय. आणि त्याचं कारण आहे होलाष्टक. हिंदू धर्मानसार होळीच्या आधी येणारं होलाष्टक अशुभ मानलं जातं. या काळात शक्यतो कुठलेही शुभ काम केलं जात नाही. आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी या काळात प्रचारापासून दूर राहणं पसंत केलं होतं, असं बोललं जात आहे.

त्यामुळे थोड्याच वेळात देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी काय बोलणार याची उत्सुकता आहे.

त्यांनी ट्वीटरवरून देशवासियांना माहिती देताना म्हटलंय की, "माझ्या प्रिय देशवासियांनो, आज सकाळी सुमारे 11.45 - 12.00 वाजण्याच्या दरम्यान मी एक महत्त्वपूर्ण संदेश घेऊन तुमच्यामध्ये येत आहे. हा संदेश तुम्ही टीव्ही, रेडिओ और सोशल मीडियावर ऐकू आणि पाहू शकता."

आचारसंहितेचा भंग?

नरेंद्र मोदी यांच हे भाषण आचारसंहितेचा भंग करत नसल्याचं माजी निवडणूक आयुक्त टी.एस. कृष्णमुर्ती यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. ते सांगतात, "असा दावा करणं म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे अशी तरतूद आदर्श आचारसंहितेत नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून भाषण केलं. यामुळे आचारसंहितेचा भंग होईल असं वाटत नाही. अर्थात निवडणूक आयोग याप्रकरणी शहानिशा करू शकतं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)