पंतप्रधान, तुम्हाला जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा -राहुल गांधी

Image copyright @RahulGandhi

भारतानं मिशन शक्तीच्या अंतर्गत लो अर्थ ऑर्बिटमध्ये एक लाईव्ह सॅटेलाईट नष्ट केलं. अमेरिका, चीन आणि रशिया देशांप्रमाणे भारताने ही आघाडी बळकट केली आहे. यानिमित्ताने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे.

डीआरडीओची दिमाखदार कामगिरी. तुमचा अभिमान वाटतो अशा शब्दांत राहुल गांधी यांनी शास्त्रज्ञांची पाठ थोपटली आहे. याबरोबरीने राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा कढत जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

'UPAच्याच काळात तंत्रज्ञान विकसनाची सुरुवात'

2008 साली तत्कालीन संरक्षण मंत्री ए. के. अॅंटनी यांनी 'समग्र अवकाश विभाग' नावाच्या एका कार्यक्रमाची घोषणा केली होती. अवकाशात असलेली आपली साधन संपत्ती सुरक्षित राहावी या दृष्टीने डिफेन्स स्पेस व्हिजन 2020 या कार्यक्रमाची केली होती.

आज पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेबद्दल काय वाटतं असं विचारलं असता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण 'ABP माझा'ला म्हणाले, "2012 सालीच व्ही. के. सारस्वत यांनी सांगितलं होतं की हा अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित झालं आहे. सारस्वत हे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. पण या तंत्रज्ञानाची चाचणी घ्यायची नाही असा निर्णय UPA सरकारनं घेतला होता. पण या सरकारने तो घेतला." चव्हाण हे अवकाश आयोगाचे सदस्य होते.

"ही निश्चितच मोठी उपलब्धी आहे ही मोठी उपलब्धी आहे पण पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करून करावा का हा प्रश्न देखील उपस्थित होतो," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी देखील म्हटलं की आज ज्या अॅंटी सॅटेलाइटच्या यशस्वी चाचणीची घोषणा केली ते UPA सरकारच्याच दूरदृष्टीमुळे बनलं आहे. त्याबद्दल डॉ. मनमोहन सिंग यांचं मी अभिनंदन करतो.

आचारसंहितेचा भंग?

नरेंद्र मोदी यांच हे भाषण आचारसंहितेचा भंग करत नसल्याचं माजी निवडणूक आयुक्त टी.एस. कृष्णमुर्ती यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. ते सांगतात, "असा दावा करणं म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे अशी तरतूद आदर्श आचारसंहितेत नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून भाषण केलं. यामुळे आचारसंहितेचा भंग होईल असं वाटत नाही. अर्थात निवडणूक आयोग याप्रकरणी शहानिशा करू शकतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)