'काँग्रेस सत्तेत आल्यास पंतप्रधानपदी राहुल गांधी'#5मोठ्याबातम्या

प्रियंका गांधी Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात

1. 'काँग्रेस सत्तेत आल्यास पंतप्रधानपदी राहुल गांधी'

"यंदाच्या निवडणुकीत तुमचे भाऊ (राहुल गांधी) अमेठीतून ऐतिहासिक विजय मिळवून पंतप्रधान होणार आहेत. काँग्रेसचाच विजय होणार आहे." असं विधान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी अमेठीमध्ये प्रचार करताना केले.

"यापुढेही मी राजकारणात सक्रीय राहाणार आहे. ज्या ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये (काँग्रेसला) यश मिळत नाही त्या त्या ठिकाणी पूर्ण लक्ष देण्यात येईल". असंही प्रियांका गांधी यांनी यावेळेस सांगितलं.

"तुम्ही प्रत्येक वेळेस आपल्या (गांधी ) परिवाराला निवडलं आहे. यंदाही आपल्याच परिवाराची निवड करा", असं त्यांनी अमेठीतल्या नागरिकांना आवाहन केलं. "पक्षानं सांगितल्य़ास नक्कीच निवडणूक लढवेन पण अद्याप निवडणूक लढवण्यासंदर्भात मी कोणताही निर्णय घेतलेला नाही", असा खुलासाही प्रियंका यांनी केला. न्यूज 18 लोकमतने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

2. इलेक्टोरोल बाँड्स पारदर्शी वाटत नाही- निवडणूक आयोग

इलेक्टोरोल बाँड्सबाबत केंद्र सरकारने केलेल्या दाव्यांप्रमाणे राजकीय निधीमध्ये पारदर्शकता दिसत नाही असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.

परदेशातून येणाऱ्या निधीवरील मर्यादा काढून टाकण्य़ात आल्यामुळे परदेशातील कॉर्पोरेट शक्तींना भारतीय राजकारणावर प्रभाव टाकण्याची स्थिती निर्माण झाली असेही आयोगाने आपले मत न्य़ायालयात मांडले आहे.

परदेशातील बेनामी कंपन्यांमधून काळा पैसा भारतातील राजकीय पक्षांकडे येईल आणि भारतीय राजकारणावर या परदेशी कंपन्याचा प्रभाव पडेल असेही आयोगाने सांगितले आहे. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीबाबत आयोगाने वारंवार आपली मते संबंधित मंत्रालयांना कळवल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. द हिंदूने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

3. आयएएनएस-सी-व्होटरच्या सर्वेक्षणात रालोआची आघाडी

येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पारडे जड असल्याचा कल आयएएनएस आणि सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे.

Image copyright Getty/BBC

निवडणूक पूर्व आघाडीमुळे रालोआला 261 जागा मिळू शकतील असे स्पष्ट झाले होते तर 10 मार्च रोजी झालेल्या सर्वेक्षणातून रालोआच्या जागा 3 ने वाढतील असे दिसते. भाजपाला एकूण 241 जागा मिळतील असे यातून स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस प्रणित संपुआला 143 जागांवर विजय मिळेल. त्यामध्ये काँग्रेसला 91 जागांवर तर सहकारी पक्षांना 52 जागांवर विजय मिळेल असं या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. बिझनेस स्टँडर्डने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

4. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 47 बिबटे

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणामध्ये 47 बिबट्यांचे अस्तित्त्व आढळून आले आहे. 2015 आणि 2017 साली झालेल्या सर्वेक्षणापेक्षा 22 नवे बिबटे उद्यानात दिसून आले आहेत.

वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडियाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्य़ानाचा 140 चौ.किमी परिसर दोन विभागांमध्ये विभागला जातो. त्यात एकूण 50 ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र टाइम्सने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

5. दुष्काळाची तीव्रता वाढली

महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता वाढली असून पाणी आणि चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र दोनच जिल्ह्यांमध्ये महसूल विभागाने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. मराठवाड्यामध्ये मार्च महिन्यातच पाण्याचे 2 हजार टँकर सुरू झाले आहेत.

Image copyright Huw Evans picture agency

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिलह्यांना दुष्काळाच्या झळा सर्वाधीक बसत आहेत. मराठवाड्यातील प्रकल्पामध्ये 4 टक्के पाणी साठा आहे. एकूण 8550 गावांपैकी 1455 गावे आणि 501 वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासू लागली आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)