लोकसभा निवडणूक 2019 : कट्टर शरद पवार विरोधक ते आता समर्थक, राजू शेट्टींवर ही वेळ का आली?

राजू शेट्टी

साखर कारखानदार असोत वा प्रस्थापित नेते यासर्वांना विरोध करत राजकारणाची सुरुवात करणारे राजू शेट्टी यांचं यंदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वर्तुळ पूर्ण झालं आहे.

हातकणंगले मतदारसंघात ते पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत.

गेल्या निवडणुकीत भाजपा-सेना महायुतीचा त्यांना पाठिंबा होता. यंदा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणुकीत उतरले आहेत.

राजू शेट्टी यावेळी तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. गेल्या दोन्ही वेळेस त्यांना विजय मिळाला होता. यावेळी ते विजयाची हॅटट्रीक करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शेट्टी राजकारणातील प्रवेशाआधी शेतकरी आंदोलनांमध्ये आंदोलक म्हणून कार्यरत होते.

शेतकरी संघटनेतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात

कोल्हापूरमध्ये 1980 साली शेतकरी संघटनेची स्थापना झाली. त्यावेळी कांदा, ऊस, तंबाखू, भात अशी पिकं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य पैसे मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना प्रयत्नशील होती.

कारखानदारांच्या दबावामुळे प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी संघटना रुजली होती. त्यावेळी शिरोळ ग्रामपंचायत सदस्य होण्याची महत्वाकांक्षा बाळगून राजू शेट्टी नावाचा तरुण झटत होता. पण ऐनवेळी ग्रामपंचायत निवडणुकीत माघार घ्यावी लागल्याने शेट्टी नाराज झाले होते.

साधारणपणे 1993-94 च्यादरम्यान शेट्टी यांना शेतकरी संघटनेत सामिल करून घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते अजित नरदे यांनी फार प्रयत्न केले होते. त्यांच्याकडे शेतकरी संघटनेचे शिरोळ तालुकाप्रमुख म्हणून काम सोपवण्यात आलं होतं.

2002 साली उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस आंदोलन करण्यात आलं. 1200 रुपये ऊस दर मिळावा या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात शेट्टी जखमी झाले होते. हे आंदोलन यशस्वी झाले आणि शेट्टी शेतकरी नेते म्हणून नावारूपाला आले. 2003 मध्ये शेट्टी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर निवडून आले.

2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेने भाजप-शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे संजय पाटील हे सेनेचे उमेदवार होते आणि रघुनाथ पाटील हे शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष होते.

शेट्टी आणि रघुनाथदादा यांच्यात जातीयवादी शिवसेनेला पाठिंबा दिला या कारणामुळे वाद झाला. पण कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही अशी भूमिका घेत राजू शेट्टी तटस्थ राहिले.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेची स्थापना

अजित नरदे आणि कार्यकर्त्यांकडून त्यावेळी रघुनाथ पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात समेट घडवण्यासाठी प्रयत्न केले गेले. पण त्यांना यश आलं नाही. शेवटी शेट्टी संघटनेतून बाहेर पडले.

शेट्टी यांनी 2004 मध्येच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी शिरोळ मतदारसंघात विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला. त्यावेळी शिरोळ हेच शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचं प्रमुख केंद्र होतं. आंदोलनामुळे त्यांना प्रसिद्धीही मिळाली.

Image copyright FACEBOOK

आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी 2009 मध्ये राजू शेट्टी लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले. एकेकाळी हातकणंगले म्हणजे पूर्वीच्या इचलकरंजी मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब माने यांचं वर्चस्व होतं. ते तब्बल पाच वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते.

बाळासाहेब माने यांच्या स्नुषा निवेदिता माने या राष्ट्रवादी कॉग्रेसकडून शेट्टीच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या. माने घराण्याला हरवण्याच्या हेतूने त्यावेळी काँग्रेसच्या गटाने शेट्टी यांना मदत केली होती. त्यावेळी शेट्टी ही निवडणूक जिंकले होते.

त्यानंतर 2014मध्ये काँग्रेसचे कलाप्पाण्णा आवाडे यांचा पराभव करत शेट्टी दुसऱ्यांदा खासदार झाले. आता तिसऱ्या वेळी ते खासदार होण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

शरद पवारांबरोबर जाणे ही अपरिहार्यता?

राजू शेट्टी यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सोबत जाणं ही त्यांची राजकीय अपरिहार्यता आहेच, मात्र यासाठी गेल्या काळातल्या काही गोष्टींचा संदर्भ लक्षात घेणे गरजेचे आहे, असं दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार विश्वास पाटील यांना वाटतं.

"गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला विरोध करण्यासाठी शेट्टी यांच्या पुढाकाराने महायुती स्थापन झाली. विशेष म्हणजे महायुतीची पहिली सभा इचलकरंजीमध्ये झाली त्यानंतर तपोवन मैदानावर झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी 'मेरे प्यारे मित्रट म्हणून राजू शेट्टी यांचा उल्लेख केला होता. मात्र गेल्या काही वर्षांत नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात चुकीचं धोरण राबविल्याने शेट्टी नाराज झाले शेट्टी यांनी अवघ्या दोन वर्षांतच नरेंद्र मोदी यांना घरी बसवण्याचा एल्गार पुकारला. असं करणारे ते पहिले नेते होते.

"दरम्यानच्या काळात सदाभाऊ खोत आणि शेट्टी यांच्यात देखील वाद झाले. शेट्टी यांना कमजोर करण्यासाठी भाजपनं सदा भाऊंच्या राजकारणाला बळ दिलं. मात्र त्याचा राजू शेट्टी यांच्या संघटनेवर किंवा राजू शेट्टी यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. यंदाच्या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल देणाऱ्या मोदी सरकारला विरोध करण्यासाठी राजू शेट्टी यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक केली आहे. सत्तेत असणाऱ्या शरद पवारांना विरोध करणारे शेट्टी आज त्यांचे समर्थक म्हणून समोर आले ही राजू शेट्टींची राजकीय अपरिहार्यता असली तरी ही राजकीय गरज आहे.

Image copyright FACEBOOK
प्रतिमा मथळा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी यांच्यासह

विश्वास पाटील पुढे सांगतात, "राजू शेट्टी हे चळवळीच्या बळावर निवडून येऊ शकतात. मात्र संघटना चालवण्यासाठी आणि मोठ्या प्रकारचं राजकारण करण्यासाठी त्यांना या राजकीय पक्षांची गरज आहे. त्यामुळे आतापर्यंत विरोध करत असलेल्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय राजू शेट्टी यांनी घेतला .आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात राजू शेट्टी यांचे काँग्रेससोबत संबंध तसे चांगले राहिलेले आहेत. त्यांनी टीका केली ती खास करून राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यातही जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. पण हातकणंगले हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. फक्त मोदींना विरोध करण्यासाठीच राजू शेट्टी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केलं आहे."

'मी शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारा नेता'

शेट्टी यांच्या राजकीय वर्तुळाबाबत बोलताना शेतकरी संघटनेचे नेते अजित नरदे यांनी काही गोष्टींवर प्रकाश टाकला.

ते म्हणाले, "निवडणुका म्हणजे बेरजेचं राजकारण असतं. अशा वेळी जातीयवादी पक्ष म्हणून विरोध करत संघटनेशी शेट्टी यांनी फारकत घेतली. पण हेच शेट्टी 2014 च्या निवडणूकीत भाजप-सेनेसोबत निवडणूक रिंगणात उतरले. त्यामुळं जर त्यांची ही भूमिका योग्य म्हणावी तर मग त्यावेळी शेतकरी संघटनेने भाजप-सेनेसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य नव्हता. येणाऱ्या काळात पुन्हा शेट्टी भाजपसेनेसोबत जाणार नाहीत असंही नाही. राजकीय गरज म्हणून ते हा निर्णय घेऊ शकतात."

ऊस आणि दूध उत्पादकांसाठी तत्कालीन सरकार विरोधात आंदोलन करत शेट्टी लोकप्रिय झाले. त्याचा परिणाम म्हणून ते संसदेत पोहोचले.

पण त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टिका करणारे राजू शेट्टी यावेळी मात्र त्यांच्यासोबतच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यावर राजू शेट्टी यांनी आपली भूमिका बीबीसी मराठीला सांगितली.

ते सांगतात, "मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी चळवळ केली. त्यामागे व्यक्तीद्वेष नव्हता. तत्कालीन कृषीमंत्री असलेल्या पवारांवर मी टीका केली. पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला टिका करावी लागली. आता आज सत्तेत असणाऱ्यावर टीका करावी लागते. बैलगाडीतून भ्रष्टाचाराचे पुरावे घेउन येणारे आज कुठे गेले? मी कालही भ्रष्टाचाराच्या विरोधात होतो आणि आजही आहे, मी फक्त शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारा नेता आहे."

माने यांची तिसरी पिढी निवडणूक रिंगणात

काँग्रेसचे बाळासाहेब माने हे तब्बत पाच वेळा काँग्रेसचे खासदार राहिले. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला होता.

बाळासाहेब माने यांच्या निधनानंतर त्यांची सून निवेदिता माने यांनी उमेदवारी मागितली, पण काँग्रेसने ही उमेदवारी कल्लाप्पाणा आवाडे यांना दिली. त्यामुळे नाराज निवेदिता यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

Image copyright FACEBOOK
प्रतिमा मथळा धैर्यशील माने

शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून त्या लढल्या परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर निवेदिता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या सलग दोनवेळा खासदार म्हणून लोकसभेत गेल्या. पण तिसऱ्या वेळी शेट्टी यांनी माने यांचा पराभव केला.

आता या निवडणुकीत निवेदिता माने यांनी आपला मुलगा धैर्यशील याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मागितलं होतं. मात्र शेट्टी यांच्यासोबत आघाडी केल्यानं हा मतदारसंघ राष्ट्रवादीने शेट्टी यांच्यासाठी सोडला.

त्यामुळे नाराज झालेल्या निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता शिवसेनेनं धैर्यशील यांना उमेदवारी दिली आहे. धैर्यशील माने यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे,

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)